निरुपणकार धनश्री लेले यांच्या दोन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन! राजस्थान युवक मंडळ; ज्ञानेश्वरीतील वैचारिक वैभव श्रवण्याची संगमनेरकरांना संधी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील राजस्थान युवक मंडळाने प्रसिद्ध निरुपणकार व प्रेरक व्याख्यात्या धनश्री लेले यांच्या दोन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन केले आहे. संगमनेरमध्ये प्रथमच लेले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी केले आहे.

आजच्या घडीला लेले यांना रसाळ निरुपणकार व प्रेरक व्याख्यात्या म्हणून सर्वत्र ओळखले जाते. आध्यात्मिक विषयांवरील त्यांची व्याख्याने भारतातील अनेक शहरांसह दुबई, अमेरिका यांसह अनेक देशात झाल्याने त्यांचे नाव देश-विदेशात पोचले आहे. शेकडो कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आजवर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. आदर्श निवेदिका, अभ्यासू मुलाखतकार, हजरजबाबी सूत्रसंचालिका, सिद्धहस्त ललित लेखिका असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांना लाभले आहे.

ग्रंथराज ज्ञानेश्वरी, गीता, रामायण, भागवत या विषयांवर श्रोत्यांना श्रवणानंद देण्याचे महत्कार्य धनश्री लेले करीत आहेत. महाकवी कालिदासांचे महाकाव्य मेघदूत, दासबोधातील विचार सौंदर्य, विनोबांचे विचार सौंदर्य, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक या व अशा असंख्य अभ्यासपूर्ण व्याख्यानातून विषयाची उत्तम मांडणी करण्याचे पैलू त्यांच्या वाणीतून आपल्याला सहजपणे वेचता येतात. सोनचाफ्याची फुलं आणि नुकतेच प्रकाशित झालेले अलगद ह्या ललित लेखपर पुस्तकांतून त्या आपल्याशी सहज संवाद साधत आहेत असाच आपल्याला अनुभव येतो. यु-ट्यूबवर त्यांच्या व्याख्यानांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. स्वातंत्रवीर सावरकर शब्दप्रभू पुरस्कार, रसिकाग्रणी रामुभैय्या दाते पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार, राजहंस पुरस्कार, ग.दि.मा.पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरविण्यात आले आहे.

‘अमृत मंथन’च्या निमित्ताने श्रोत्यांना दोन दिवस धनश्री लेले यांच्या ओजस्वी वाणीतून ज्ञानेश्वरीमधील वैचारिक वैभव सोप्या व रसाळ भाषेत श्रवण करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. येत्या शनिवार 19 व रविवार 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मालपाणी लॉन्स येथे होणार्‍या या व्याख्यानांचा संगमनेरकरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, सचिव आशिष राठी, खजिनदार उमेश कासट, सहसचिव ओम इंदाणी, सहखजिनदार व्यंकटेश लाहोटी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश खुला असून बैठकीसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *