सप्टेंबरने वाढवला तालुक्यातील कोविड रुग्णवाढीचा दर! एकुण रुग्णसंख्येतील तब्बल 81 टक्के दराने वाढतेय ग्रामीण भागातील रुग्णसंख्या


नायक वृत्तसंस्था, संगमनेर
गेल्या दोन महिन्यांपासून संगमनेर तालुक्यातील कोविड बाधितांच्या संख्येत भर पडण्याची गती तीव्र झाली आहे. त्यातही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातील सण-उत्सवांपासून वाढलेला रुग्णदर आज प्रती दिवस सरासरी 51 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरात तालुक्यातील मृत्युसंख्येतही वाढ झाली असून आजवर झालेल्या एकुण मृत्यूमधील निम्मे बळी एकट्या सप्टेंबरने घेतले आहेत. कोविडची बाधा वयस्कर व्यक्तिंना अधिक होते असा समजही सप्टेंबरने खोडून काढला असून या महिन्यात एकुण रुग्णसंख्येतील 10 वर्षांपेक्षा अधिक व पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाच्या 65 टक्के जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. सप्टेंबरच्या 30 दिवसांत शहरातील 288 जणांसह तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 1 हजार 531 रुग्णांची भर पडली आहे.


सण-उत्सवांचा महिना ठरलेल्या ऑगस्टमध्ये तालुक्यातील कोविड बाधितांची संख्या वाढणार याचा पूर्वानुमान होता. त्यानुसार शेवटच्या आठवड्यातील गणेशोत्सवाच्या रुपाने तसे घडलेही. घराघरात विराजमान होणार्‍या बाप्पांच्या स्वागतासाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले, याचा सर्वाधीक मोठा फटका ग्रामीण क्षेत्राला बसला. गणेशोत्सवानंतर पितृपक्षाचा पंधरवडा आणि दहाव्या-बाराव्याच्या कार्यक्रमांनाही झालेली मोठी गर्दी तालुक्याचा रुग्णदर वाढवण्यास कारणीभूत ठरली.


गेल्या महिन्याभराचा विचार करता अधुनमधून 60 पेक्षा अधिक आणि 86 पेक्षा कमी रुग्णसंख्या आढळणारे काही दिवस वगळता 40 ते 55 या दरम्यान दररोज तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडत राहीली. सप्टेंबरच्या 30 दिवसांचा विचार करता शहरात 26 सप्टेंबररोजी 19, 4 सप्टेंबररोजी 18 व 24 सप्टेंबररोजी 17 उच्चांकी रुग्ण समोर आले. तर तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राचा विचार करता 15 सप्टेंबररोजी 73, 9 व 26 सप्टेंबररोजी प्रत्येकी 67, 10 सप्टेंबररोजी 65 तर 4 व 25 सप्टेंबररोजी प्रत्येकी 61 इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत राहीले. त्यातून या महिन्यात ग्रामीणभागात मोठ्या प्रमाणात कोविडचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.


सप्टेंबरच्या 30 दिवसांत तालुक्याच्या एकुण रुग्णसंख्येत 1 हजार 531 रुग्णांची भर पडली. त्यात 1 हजार 243 रुग्ण (81.18 टक्के) ग्रामीणभागातून समोर आले, तर शहरात अवघे 288 रुग्ण (18.82 टक्के) सापडले. या महिन्यात सापडलेल्या रुग्णातील पुरुषांची संख्या 901 (58.85 टक्के) इतकी आहे, तर महिलांची संख्या 624 म्हणजे 40.75 टक्के आहे. गेल्या महिन्याभरात बाधित आढळलेल्यांमध्ये 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांची संख्या 527 (34.42 टक्के) आहे. तर 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची संख्या अवघी 74 (0.20 टक्के) इतकीच आहे. विशेष म्हणजे कोविडची बाधा वयोवृद्धांना अधिक प्रमाणात होते असे आजवर सांगीतले जात असले तरीही त्यात तथ्य नसल्याचे या महिन्याने दाखवून दिले असून या एकाच महिन्यात 10 वर्षांपेक्षा अधिक व 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तब्बल 930 जणांना (65.38 टक्के) कोविडचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


या एकाच महिन्यात मृत्युचा दरही वाढला आहे. 1 सप्टेंबरपासून सुरु झालेले कोविड मृत्युचे तांडव संपूर्ण महिनाभर कायम राहीले. सप्टेंबरच्या 30 दिवसांत शहरातील तिघांसह तालुक्यातील एकुण 20 जणांचे कोविडने बळी गेले. यामध्येही मालदाड येथील 35 वर्षीय छायाचित्रकार, चंदनापूरी येथील 39 वर्षीय व सायखिंडी येथील 40 वर्षीय तरुणांचा समावेश आहे. उर्वरीत सतरा जणांचे वय 50 पेक्षा अधिक आहे. त्यात केवळ दोघा महिलांचा समावेश आहे. एकंदरीत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात वाढलेले कोविडचे संक्रमण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम असून नागरिकांनी सतर्कता न बाळगल्यास कोविडची दाहकता अशीच वाढत राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

अनलॉक प्रक्रीया सुरु झाल्यानंतर शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नागरिकांनी कोविडसोबत जगणे अपेक्षित होते. मात्र अनलॉक म्हणजे कोविडचा प्रादुर्भाव संपल्यागत नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली, दहावे, लग्न समारंभ, श्राद्ध, वाढदिवसाच्या पार्ट्या अशा सामुदायिक कार्यक्रमांमध्ये मोठी गर्दी जमल्याने व त्यातही नियमांची पायमल्ली झाल्याने ग्रामीणभागातील संक्रमणाला गती मिळाल्याचेही सिद्ध झाले आहे. जो पर्यंत प्रत्येक नागरिक नियमांचे पालन करीत नाही तो पर्यंत कोविडचा प्रादुर्भाव रोखणं अशक्य ठरणार आहे, त्यामुळे संगमनेरकरांनी आतातरी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *