रायतेवाडी फाट्याजवळ बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार अज्ञात बसचालकाविरोधात संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाट्याजवळ जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नवजीवन बेकरीजवळ बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.9) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावरुन महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत होत आहे.

नवीन पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती केल्यानंतर सुखकर व विनाअपघात प्रवास होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वीच पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. तरी देखील अपघात थांबण्याचे काही नाव घेईना. जुन्या महामार्गावरील नवजीवन बेकरीजवळ मिरज (सांगली) – नाशिक (एमएच.14, बीटी.4589) ही बस पुणेच्या दिशेकडून संगमनेरच्या दिशेने येत होती.

दरम्यान, नवीन महामार्ग सोडून जुन्या महामार्गावर येवून काही अंतरावरील नवजीवन बेकरीजवळ बसने दुचाकीला (एमएच.17, एक्यू.8448) समोरुन जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार अशोक राघू काळे (वय 37, रा.आनंदवाडी, चंदनापुरी, ता.संगमनेर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ सुभाष काळे यांनी संगमनेर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन बसवरील अज्ञात चालकाविरोधात गुरनं.960/2022 भादंवि कलम 304 अ, 279, 337, 338, 427 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ. अमित महाजन हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *