उंबरी शिवारातील अवैध वाळूउपशावर पोलिसांचा छापा

उंबरी शिवारातील अवैध वाळूउपशावर पोलिसांचा छापा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील उंबरी शिवारातील प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र, उपसा करणारे वाळूतस्कर पसार झाले आहेत. या प्रकरणी आश्वी पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या आदेशावरुन फरार आरोपीचा शोध घेत असताना खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीवरुन उंबरी परिसरातील प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर पोलीस नाईक सचिन अडबल, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, सागर सुलाणे यांच्या पथकाने छापा टाकला असता पांढर्‍या रंगाच्या झेनॉन वाहनामध्ये वाळू भरत असताना आढळून आले. मात्र, अंधार असल्याने वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी पोलीस नाईक अडबल यांनी आश्वी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वाळूतस्कर अशोक शेळके (रा.उंबरी) आणि गणेश साहेबराव मदने (रा.आश्वी) या दोघांविरोधात भादंवि कलम 379, 34 नुसार आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील 2 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीची झेनॉन पिकअप (क्र.एमएच.14, व्ही.9424), 5 हजार रुपये किंमतीची अर्धाब्रास वाळू. तसेच 2 लाख रुपयांच्या दुसर्‍या विनाक्रमांकाच्या झेनॉन पिकअपमधील 5 हजार रुपये किंमतीची अर्धाब्रास वाळू असा एकूण 4 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास आश्वी पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *