कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नेतृत्त्वगुणांची आवश्यकता ः डॉ. पिल्लई कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; ‘कॉर्पोरेट चाणक्य’ या विषयावरील व्याख्यानाने शुभारंभ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
केवळ राजकाणात जाण्यासाठी नव्हेतर तर जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रभावी नेतृत्वगुणांची आवश्यकता असते. नेतृत्वगुण आत्मसात करण्यासाठी वृद्धसंयोग, उत्साह, स्वअध्ययन आणि अखंड वाचनाची गरज असते. या चार सूत्रांचा अवलंब करणार्‍या व्यक्ति जगात यशस्वी ठरल्या आहेत. चाणाक्यांकडे राज्य कारभाराचा कोणताही पूर्वानुभव नसतांनाही ते राजगुरु बनले. आपल्या भोवतालची परिस्थिती बदलावी असे वाटत असेल तर सर्वात आधी आपली आपली मनस्थिती बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन व्यवस्थापन क्षेत्रातील चाणक्य समजल्या जाणार्‍या डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी केले.

येथील कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या 45 व्या वर्षाचे पहिले पुष्प गुंफतांना बोलत होते. शुभारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी भूषविले. यावेळी त्यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, उपाध्यक्ष अरुण ताजणे, प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी, खजिनदार ओमप्रकाश आसावा, राजेंद्र भंडारी आदी मंचावर उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना डॉ. पिल्लई म्हणाले की, समाजात मिळणार्‍या मानसन्मानामागे आपल्यातील नेतृत्वगुणच कारणीभूत असतात. आज जगातील असंख्य विद्यापीठांमध्ये कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि चाणक्याची नीति या विषयावर अध्ययन सुरु आहे. आज यासर्व गोष्टी आपल्याला पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध होतात. मात्र पूर्वी जेव्हा लिखाणासाठी कागदाचा शोध लागलेला नव्हता तेव्हा शिलालेख लिहिण्याची पद्धत होती. आजही आपल्या देशातील विविध भागात कोट्यावधी शिलालेख आहेत. मात्र त्यांच्या अभ्यास करण्याबाबत मात्र आपल्याकडे मोठी उदासिनता असल्याचे दिसून येते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महेंद्रसिंग धोनी आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होऊ शकतो, सचिन तेंडुलकर जगातील सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरु शकतो, जिजामातचेे नेतृत्वगुण आत्मसात करुन छत्रपती शिवाजी राजे श्रीमंत योगी बनू शकतात, चाणक्या सारखा संन्याशी नंदराजाची सत्ता उलथवून चंद्रगुप्त मौर्याला राजसिंहासनावर विराजमान करु शकतात आणि त्याच्या माध्यमातून अलेक्झांडरचा पराभव करुन त्याला विश्वविजेताही बनवू शकतात, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगविख्यात संत होऊ शकतात यासर्व गोष्टी चाणक्य नीति आम्हाला शिकवते असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

चाणक्याने आपल्या नीतित सांगितलंय की विद्यार्थी आणि राजा या दोघांनीही दररोज किमान चार तास अभ्यास करण्याची गरज आहे. केवळ वाचन करण्यामुळे काहीही साध्य होत नाही, त्यासाठी विचार करण्याचीही आवश्यकता असते. अभ्यासातून दिशा मिळते, विद्यार्थ्यानी अभ्यास करताना त्याच्या नोंदी काढल्या पाहिजे. त्याचा स्वतःसाठी वापर केल्यानंतर त्या नष्ट न करता पुढच्या पिढीपर्यंत त्या कशा जातील याचाही आपण विचार करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ.तांबे म्हणाले की, संपूर्ण जग विचारांवर चालत असते. विचारातूनच जीवनाला आकार प्राप्त होतो. कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेल्या साडेचार दशकांपासून आपल्याला दरवर्षी नावाजलेल्या वक्त्यांच्या मुखातून प्रगल्भ विचार ऐकण्याची संधी मिळणं भाग्याचं लक्षण असल्याचे गौरोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले. राजेश मालपाणी यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करुन दिला, ओमप्रकाश आसावा यांनी सूत्रसंचालन तर अरुण ताजणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *