सलग सात दिवस संगमनेरकरांना मिळणार वैचारिक मेजवाणी! कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; विविध विषयांवरील राज्यातील नावाजलेल्या वक्त्यांचा समावेश


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या साडेचार दशकांपासून संगमनेरकरांच्या वैचारिकतेची भूक भागवणार्‍या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे पुढील आठवड्यात आयोजन करण्यात आले आहे. सलग सात दिवस चालणार्‍या या वैचारिक ज्ञानयज्ञात यंदा व्यवस्थापन शास्त्र, ज्योतिषशास्त्र, पशू संवर्धन, खाणाखजाना, भारतीय लष्कर, प्रवास वर्णन आणि भारतीय संगीत शास्त्र अशा विविध विषयांवर नावाजलेल्या वक्त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार 8 ते सोमवार 14 नोव्हेंबर या कालावधीत रोज सायंकाळी सात वाजता कवी अनंत फंदी नाट्यगृहात होणार्‍या या कार्यक्रमाचा संगमनेरकरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी यांनी केले आहे.

कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या 44 वर्षांपासून या व्याख्यानमालेचे अव्याहतपणे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या व्याख्यान सप्ताहामध्ये विविध विषयांचा अंतर्भाव करण्यात आला असून त्या माध्यमातून संगमनेरकर रसिकांना विचारांची अनोखी मेजवाणीच मिळणार आहे. यावर्षीच्या व्याख्यानमालेचा शुभारंभ कॉर्पोरेट विश्वातील चाणक्य समजल्या जाणारे जगप्रसिद्ध व्यवस्थापन गुरु डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांच्या व्याख्यानाने होणार आहे. चाणक्य नीतीने यशस्वी व्यवस्थापन कसे करावे या विषयावरील त्यांचे कॉर्पोरेट चाणक्य पुस्तक बेस्ट सेलर्स असून त्यांनी इतरही अनेक पुस्तके लिहिली आहेत. बुधवार 9 नोव्हेंबर रोजी कालनिर्णयकार जयेंद्र साळगावकर कालनिर्णयाची पन्नास वर्ष, ज्योतिषशास्त्र आणि मी या विषयावर सविस्तर भाष्य करणार आहेत.

गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय विभागात सेवेत असलेल्या ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका व हळव्या मानाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांच्या ‘मुक्या वेदना, बोलक्या संवेदना’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे. शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी लेखक, उद्योजक व दूरचित्रवाणीवरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अवघ्या देशाला परिचित असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ निलेश लिमये ‘खाण्यासाठी जगणे आपुले’ या निराळ्या विषयावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत. शनिवार 12 नोव्हेंबर रोजी भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनोज सिन्हा ‘भारत भाग्यविधाता’ या विषयावर भारतीय लष्कराचे सामर्थ्य उलगडून सांगणार आहेत.

रविवार 13 नोव्हेंबर रोजी गेली साडेचार दशके मराठी पत्रकारिता क्षेत्रात परखड आणि रोखठोक लेखणाच्या माध्यमातून आपली छाप निर्माण करणार्‍या ज्येष्ठ पत्रकार, लेखक व वक्ते असलेल्या प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘अंधानेर ते वॉशिंग्टन’ या वेगळ्या धाटणीतील गमतीशीर आणि हलक्या-फुलक्या विषयावरील व्याख्यान होणार आहे. यंदाच्या व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिनी सोमवार 14 नोव्हेंबर रोजी ध्रुपद गायकीतील नामांकित डागर घराण्यात जन्मलेल्या आणि पारंपरिक संगीताला धक्का न लावता विविध प्रयोग करणारे संगीततज्ज्ञ उस्ताद मोही बाहाउद्दीन डागर यांच्या ‘संगीतातील गुरु – शिष्य परंपरा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. सोबत त्यांच्या रुद्रवीणा वादनाचा अनुभवही रसिकांना घेता येणार आहे.

मंगळवार दिनांक 8 ते सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी सात वाजता संगमनेर नगरपरिषदेच्या कवी अनंत फंदी नाट्यगृहात होणार्‍या या वैचारिक सप्ताहाचा संगमनेरकरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकार बिहाणी, उपाध्यक्ष अरुण ताजणे, सचिव जसपाल डंग, खजिनदार ओमप्रकाश आसावा, प्रकल्प समिती सदस्य अनिल राठी, राजेंद्र भंडारी, स्मिता गुणे व सीए नारायण कलंत्री यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *