किरकोळ कारणावरुन संगमनेरात तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण! तरुण गंभीर जखमी; गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल होवूनही आरोपी अद्याप मोकाटच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

‘थोडं बाजूला सरकून उभे रहा!’ इतक्या एका शब्दावरून तिघा तरुणांनी मिळून एकाला मारहाण करण्याचा प्रकार रविवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावर घडला. या घटनेत एका तरुणाला हातातील लोखंडी कड्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रक्तबंबाळ अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन नोंदविलेल्या जवाबावरुन शहरातील तिघां विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याला रक्तबंबाळ होईस्तोवर मारण्याचा हा प्रकार दहशत निर्माण करण्याच्या श्रेणीतला आहे. मात्र असे असतानाही या गंभीर घटनेला 36 तासांचा कालावधी उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार ज्या औषध दुकानासमोर घडला तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या मारहाणीचे संपूर्ण चित्रणही झालेले आहे.

याबाबत जखमी झालेल्या कृष्णा संजय ओझा (वय 30 रा.अभिनव नगर) या तरुणाने दिलेल्या जवाबावरुन संगमनेर शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार रविवारी (ता.23) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ओझा आणि त्याचा एक मित्र औषधे आणण्यासाठी नवीन नगर रस्त्यावरील एका औषध दुकानात गेले होते. त्यावेळी दुकानदाराकडून औषधे घेत असताना अन्य तिघे तेथे आले व ते तिघेही दुकानाच्या पायरीवर उभे राहीले. यावेळी फिर्यादी कृष्णा ओझा याला फोन आल्याने तो त्यावर बोलत असताना त्याच्या शेजारीच उभ्या राहिलेल्या अक्षय खर्डे या तरुणाला त्याने बाजूला सरकून उभे राहण्यास सांगितलं. त्याच्या या सूचनेने त्या तरुणाचा ‘इगो हर्ट’ झाल्याने त्याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊ लागल्याने औषधं दुकानाच्या चालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

एकमेकांवर शाब्दिक कोटी सुरू असतानाच मुख्य आरोपीचा भाऊ आकाश खर्डे याने फिर्यादीच्या गळ्यात हात घालून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याने त्याला मिठी मारुन आपला मनसुबा पूरा केलाच. सुरुवातीला आकाशने आपल्या हातातील कड्याने ओझाच्या तोंडावर, डोक्यावर एका मागोमाग घाव घातले. मग त्यात त्याचा भाऊ अक्षयही सहभागी झाला. दोघांनी त्याला रक्तबंबाळ केल्यावर त्यांच्यासोबत असलेला मयूर लांडगेही त्यात सहभागी झाला आणि तिघांनी मिळून त्याला अक्षरशः जमिनीवर लोळवून मारहाण केली. या मारहाणीत कृष्णा ओझा या तरुणाला कपाळ, डोके व मानेवर पाच ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. त्यानंतर फिर्यादी सोबत असलेल्या त्याच्या मित्राने त्याला जखमी अवस्थेत तेथून खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन नऊ टाके घालण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. रविवारी सकाळी शहर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी कृष्णा संजय ओझा या तरुणाचा जवाब नोंदविला.

त्यावरून शहर पोलिसांनी अक्षय खर्डे, आकाश खर्डे व मयूर लांडगे या तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 326, 327, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना घडून 36 तासांचा कालावधी उलटल्यानंतरही नवीन नगर रोड सारख्या अतिशय महत्त्वाच्या परिसरात एखाद्या तरुणाला रक्तबंबाळ होईस्तोवर मारहाण होवूनही या घटनेतील मानेकरी अद्यापही मोकाटच आहेत. यावरून संगमनेर शहर पोलिसांचा शहरातील गुन्हेगारी घटकांवर कोणताही वचक राहिला नसल्याचेच दिसत आहे. त्यातून गल्लों-गल्ली अशा दादांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा प्रकारच्या घटनाही आता नियमित होऊ लागल्या आहेत.

सुरुवातीला या प्रकरणात गुन्हाच दाखल होवू नये म्हणून काही जणांकडून फिर्यादीवर दबाव आणण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनाक्रमात राजकीय धुरिणांचाही यथेच्छ वापर करण्यात आला. मात्र जखमी तरुण आणि त्याला पाठबळ देणारे ठाम राहील्याने त्या तिघाही मारेकऱ्यांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरीही अशा प्रकारच्या गंभीर घटनांना जबाबदार असलेल्यांना पाठीशी घालण्यासाठी आटापीटा करणाऱ्यांच्या भूमिकेबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम राहीले आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *