अंभोर्‍यात स्वच्छतेच्या शत्रूंनी सफाईचे काम रोखले! ग्रामसेवक व कर्मचार्‍यांना धक्काबुक्की व दमबाजी; दोघांवर गुन्हा दाखल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या देशभरात स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे यासाठी केंद्र शासनापासून ते अगदी ग्रामपातळीपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीही सुरु आहे. त्यातून आपला परिसर स्वच्छ व सुंदर राहावा यासाठी लोकचळवळ उभी राहिली असताना काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीची मंडळी मात्र त्यात खीळ घालण्यासाठी जीवाचा आटापीटा करीत आहेत. असाच काहीसा प्रकार गुरुवारी तालुक्यातील अंभोरे येथून समोर आला आहे. या घटनेत येथील स्वच्छतेच्या दोघा शत्रूंनी ग्रामसेवकाची गचांडी पकडून गावात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेले सफाईचे काम रोखण्यास भाग पाडले व ग्रामसेवकाच्या हातातील मासिक सभेची नोंदवही देखील फाडून फेकली. याप्रकरणी गुरुवारी मध्यरात्री ग्रामसेवकाने दिलेल्या फिर्यादीवरुन अंभोरे येथील दोघांवर सरकारी कामात अडथळा आणण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गुरुवारी (ता.29) दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील अंभोरे गावात घडला. याप्रकरणी अंभोर्‍याचे ग्रामसेवक अरुण गोविंद जेजूरकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुरुवारी ग्रामसेवक जेजूरकर ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचार्‍यांकडून गावातील गल्लीबोळात सफाईचे काम करवून घेत होते. जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सफाई करुन कचरा जमा केला जात असताना अचानक गावातील नवनाथ धोंडीबा हळनर व लहानू केरु खेमनर हे दोघे दुचाकीवरुन तेथे आले व त्यांनी आपले वाहन आडवे लावून ‘काम बंद करा! येथे सफाईची गरज नाही, तुम्ही येथून लगेच निघून जा..’ असे म्हणत शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली.

उगाच वादाचे कारण नको म्हणून संबंधित ग्रामसेवकाने तेथील काम बंद करुन आपल्या सोबतच्या कर्मचार्‍यांसह तेथून स्मशानभूमी गाठली व त्या परिसरात झाडलोट सुरु केली. काही वेळातच वरील दोघेही पुन्हा तेथे आले व त्यांनी स्मशानभूमीचे प्रवेशद्वार बंद करीत ‘या ग्रामसेवकाला व कर्मचार्‍यांना येथून बाहेर जावू द्यायचे नाही..’ असे म्हणत आरोपी नवनाथ हळनर याने ग्रामसेवक जेजूरकर यांची गचांडी पकडली व धक्काबुक्की करीत त्यांना दमबाजी करीत तेथील साफसफाई करण्यापासून रोखले. हा प्रकारही त्या ग्रामसेवकाने सहन केला व त्यांनी कामकाज बंद करुन तेथून ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या दिशेने जाण्यास निघाले. मात्र एवढं सगळं होवूनही ‘त्या’ दोघांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही.

आरोपी नवनाथ हळनर हा पुन्हा ग्रामसेवकाच्या मागोमाग येत त्याने त्यांना गाठले व पुन्हा शिवीगाळ व दमबाजी करीत त्यांच्या हातात असलेले ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या नोंदी असलेली वही हिसकावून घेत तिच्या चिंध्या उडविल्या. एवढं सगळं करुनही त्या दोघांचेही समाधान झाले नाही. त्यानंतर त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले व तेथे जावून आरोपी लहानू खेमनर याने पुन्हा त्या ग्रामसेवकाला दमबाजी करीत अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या सर्व प्रकारांना वैतागलेल्या ग्रामसेवकाने अखेर घडला प्रकार आपल्या वरीष्ठांच्या कानावर घातल्यानंतर या प्रकरणी दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी (ता.29) मध्यरात्री साडेबारा वाजता अंभोर्‍याचे ग्रामसेवक अरुण गोविंद जेजूरकर (रा. गुंजाळवाडी) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी नवनाथ धोंडीबा हळनर व लहानू केरु खेमनर (दोघेही रा. अंभोरे) यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 353 सह 341, 332, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *