गोवंश हत्येप्रकरणी संगमनेर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! गोरक्षणासाठी ‘शीघ्र कृती’ टीम; कत्तलखान्यांच्या परिसरात 24 तास नजर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारंवार कारवाया, जप्त्या व अटकसत्र राबवूनही संगमनेरातील गोवंशाच्या कत्तली थांबत नसल्याने पोलिसांनी आता आपल्या कारवाईच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री नाशिक महामार्गावरील सायखिंडीजवळ गोवंशाचे मांस वाहून नेणारी अलिशान कार पेटल्यानंतर शहरातील कत्तलखाने आजही सुरुच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांची भेट घेतली असता त्यांनी कारवाईच्या पारंपरिक पद्धतीत बदल करुन यापुढे धडक कारवाईचे सूत्र राबविण्यासह गोरक्षणासाठी पोलिसांची स्वतंत्र ‘शीघ्र कृती’ टीम व कत्तलखान्यांच्या परिसरात चोवीस तास नजर ठेवण्यासाठी कायमस्वरुपी कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले.

गेल्या वर्षी गांधी जयंतीच्या दिनी संगमनेरातील भारतनगर परिसरात असलेल्या साखळी गोवंश कत्तलखान्यांवर श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा घालीत राज्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी येथील कत्तलखाने उध्वस्त करुन त्यांच्या चालकांना दीर्घकाळ कारागृहातही डांबले होते. त्यामुळे संगमनेरातील गोवंश कत्तलखाना चालकांचे कंबरडे मोडल्याचे चित्र निर्माण झालेले असतांना अधुनमधून होणार्‍या कारवाया आणि त्यात पकडले जाणारे गोवंशाचे मांस यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत काहीसा संशयही निर्माण झाला होता.

असाच संशय निर्माण करणारा प्रकार बुधवारी (ता.28) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नाशिक महामार्गावरील सायखिंडी शिवारात घडला. संगमनेरात कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे मांस अलिशान स्विफ्ट (क्र.एम.एच.43/ए.एफ.9598) या वाहनात भरुन मुंबईच्या दिशेने निघालेले वाहन वरील ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने अचानक पेट घेतला. त्यामुळे वाहनचालकाने आपल्या ताब्यातील सदरचे वाहन भर रस्त्यातच सोडून देत तेथून पलायन केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता या वाहनाच्या पाठीमागील बाजूस सुमारे 400 किलो गोवंशाचे मांस भरल्याचे पोलिसांना आढळून आले.

याबाबत पोलीस हवालदार ओंकार मेंगाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर भा.दं.वि. कलम 269 सह महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन सदरचे जळालेले वाहन जप्त केले व त्यातील अर्धवट जळालेल्या गोवंश मांसाची विल्हेवाट लावली. या घटनेनंतर संगमनेरच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज (ता.29) सकाळी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची भेट घेवून वारंवार कारवाया, जप्ती व अटकसत्र राबवूनही संगमनेरातील गोवंशाची कत्तल थांबत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक मदने यांनी पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाया आणि गोवंश हत्या थांबवण्यासाठी पोलिसांकडून सुरु असलेले प्रयत्न बजरंग दलाच्या शिष्टमंडळाच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत पोलीस उपअधीक्षकांनी यापुढे गोवंशाच्या कत्तली होणार नाहीत यासाठी ठोस कृती योजना राबविणार असल्याचे सांगताना भारतनगर, जमजम कॉलनी, कोल्हेवाडी रस्ता या कुख्यात परिसरात कायमस्वरुपी पोलिसांची नेमणूक करण्यासह शहरातील गोवंशाच्या संरक्षणासाठी पोलिसांची स्वतंत्र शीघ्र कृती टीमही स्थापन करणार असल्याची माहिती दिली. यासाठी संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची निवड करण्यात येणार असून या टीममधील कोणत्याही सदस्याला माहिती दिल्यानंतर व अथवा त्यांना ती प्राप्त झाल्यानंतर काही क्षणातच पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये येतील व संबंधितावर धडक कारवाई करतील असेही उपअधीक्षक मदने यांनी सांगितले त्यावर समाधान व्यक्त करुन पोलिसांना आवश्यक असलेले संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी बजरंग दलाकडून दाखवण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या मोठ्या कारवाईनंतर संगमनेरातील मोठे कत्तलखाने पूर्णतः बंद आहेत. मात्र वरील भागातील अनेक कसाई आजही चोरुन-लपून आडरानात जावून हा धंदा करीत असल्याने त्यांची माहिती काढणे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचणे जिकरीचे बनले आहे. मात्र आता त्यासाठी खबर्‍यांचे जाळे विणले जाणार असून कत्तलीच्या हेतूने अशा संशयीत ठिकाणी जनावरे आढळल्यास पोलिसांकडून तत्काळ छापा घातला जाणार आहे.

संगमनेरातील गोवंशाची कत्तल पूर्णतः थांबावी यासाठी पोलिसांकडून वारंवार कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक कारवाईनंतर कत्तलीची ठिकाणं बदलली जात असल्याने व नेमक्या माहितीचा अभाव असल्याने अद्यापही छोटे-मोठ्या स्वरुपात असे प्रकार सुरु असल्याचे लक्षात आले आहे. त्यासाठी आता तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांमधील कर्मचार्‍याचा समावेश असलेली स्वतंत्र टीम कार्यान्वित करुन खबर्‍यांचे नेटवर्कही उभे केले जाणार असून शीघ्र कृती टीमच्या माध्यमातून काही क्षणात कारवाई करण्याची योजना आम्ही तयार केली आहे. यासोबतच कत्तल होणार्‍या संभाव्य ठिकाणी फिक्स पॉईंटही नेमण्यात येतील. त्यातून अशाप्रकारांना नक्कीच आळा बसेल असा विश्वास आहे.
– राहुल मदने
पोलीस उपअधीक्षक – संगमनेर उपविभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *