संगमनेरच्या सह्याद्री अकॅडेमीतून निराधारांना ‘आधार’! आधार फाउंडेनशही घेतेय निराधरांच्या मदतीसाठी पुढाकार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाट चुकलेल्या एका तरुणीची युवकाकडून फसवणूक झाली. लग्न झालं पण तो व्यसनी निघाला. पुढे तिची फरफट झाली. आधारचे शिलेदार शिवव्याख्याते दीपक कर्पे यांनी हे सर्व समजून घेत आधारकडे शिफारस केली. आधार फाऊंडेशन संगमनेर संस्थेने अत्यंत वाजवी रकमेत तिला पोलीस भरतीसाठी संगमनेरच्या सह्याद्री करिअर अकॅडेमीत प्रवेश घेऊन दिला.

तसेच संगमनेरातील आधार फाउंडेशनतर्फे शैक्षणिक दत्तक पालक योजनेत आई-वडील नसलेल्या आदित्यने शिक्षण घेत बारावी उत्तीर्ण झाला. पुढे पोलीस होण्याची इच्छा बाळगणार्‍या गरजू मुलाला अमोल राहणे यांनी मोफत प्रवेश दिला आहे. कोरोना काळात अनेक कुटुंबांतील कर्ताच दगावल्याने सैरभैर झालेल्या अनेक परिवाराच्या मागे उभ़ राहत, या मुलांना सामाजिक भान जपत मदत करण्याचं मानवतवादी काम सह्याद्री करिअर अकॅडेमीने केले असल्याची भावना आधार समन्वयक सोमनाथ मदने यांनी व्यक्त केली.

याचबरोबर सिन्नर येथील किशोरच्या वडीलांचे तो लहान असतानाच निधन झाले. त्यातच आईही कोरोनाने दगावली. अत्यंत कठीण परिस्थिती असलेला किशोर येथेच शिकतो आहे. काजलची आणखीचं वेगळी परिस्थिती आहे. सैन्यात असणार्‍या पतीचे लग्नानंतर सहाच महिन्यात निधन झाले. मोठं संकट आलं. तिही सह्याद्री अकॅडेमीची मदत घेत नशीब आजमावत आहे. पालघर येथील अमिनालाही वडील नाहीत. पैशांअभावी तीही अकॅडेमी सोडणार होती पण तिलाही या अकॅडेमीने मदत केली.
गेल्या आठ वर्षांत दीड हजारांपेक्षा अधिक मुलांची पोलीस उपनिरीक्षक, पोलीस, सैन्य, बँक, तलाठी आदी चांगल्या पदांवर निवड झाली असून 50 पेक्षा अत्यंत गरजू मुले पैशांअभावी प्रवेश घेऊ शकत नव्हते. परंतु सह्याद्री संस्थेच्या मदतीने त्यांना आधार मिळाल्याने ती ताठ मानेनं उभी आहेत. याप्रसंगी समन्वयक सुखदेव इल्हे, कैलास वाघमारे, सह्याद्री अकॅडेमीचे संचालक दीपाली व अमोल रहाणे उपस्थित होते.

दीड वर्षापूर्वी आई कोरोनात वारली. आई-वडील नसल्याचं दु:ख मी जाणतो आहे. यापुढेही आईची स्मृती जपत अशा गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत करणार आहे. त्यांचं जीवन फुलविण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे.
– अमोल रहाणे (संचालक-सह्याद्री अकॅडेमी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *