संगमनेर विधानसभेच्या राजकीय मंचावर वसंतराव गुंजाळ यांची एन्ट्री! मंत्री विखेंच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी; बदलत्या राजकीय परिस्थितीत उमेदवारीची शक्यता..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्याच्या मंत्रीमंडळात वजनदार खात्यावर वर्णी लागल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यातच आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने राज्यातून 45 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी जिल्हानिहाय ‘वजनदार’ नेत्याकडे प्रत्येकी दोन जागांची जबाबदारी सोपविण्यात आली असून शतप्रतिशतचा नाराही देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय गणितं बिघडण्याची शक्यता असून त्याचे स्पष्ट चित्र दोन दिवसांपूर्वी मंत्री विखे यांच्या संगमनेरातील नागरी सत्कारात दिसून आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन 1990 साली भाजपकडून निवडणूक लढविणारे आणि केवळ पाच हजार मतांनी पराभूत झालेले ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ यांचे दर्शन घडल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत तेच संगमनेर विधानसभेचे उमेदवार असतील अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

अडीच वर्षांपूर्वी राज्यात जुळून आलेले महाविकास आघाडीचे सूत्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने विस्कळीत झाले. त्यातून शिवसेनेतील 40 बंडखोर आमदार व 10 अपक्षांना सोबत घेत भाजपाने सत्तेची मोट बांधली. त्यामुळे सुरुवातीची अडीच वर्ष विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपाला सत्तेचे बळ मिळाले असून आता त्याचा वापर करुन आगामी कालावधीत राज्यातील आपले राजकीय स्थान अधिक बळकट करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा भाग म्हणून शतप्रतिशतचा नारा देत आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 45 जागा पटविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी एका मोठ्या नेत्यावर सोपविण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 2014 साली भाजपाचा वरचष्मा होता, मात्र 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय गणितं बदलली आणि राष्ट्रवादीने जिल्ह्यात सर्वाधिक जागा पटकावल्या. मात्र पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा आजही कायम असल्याने शिर्डीसह दक्षिणेतील लोकसभेची जागा मात्र भाजपाने सहज जिंकली होती. आगामी निवडणुकीतही या दोन्ही जागांसह विधानसभेच्या जास्तीतजास्त जागा मिळाव्यात यासाठी भाजपाने रणनिती आखली असून जिल्ह्याचे प्रभारी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचा परिणाम राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात दिसून आला असून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून सर्वप्रथम आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आल्याने आगामी कालावधीत त्यांना त्याची परतफेड करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

त्यादृष्टीने मंत्री विखे पाटीलही आक्रमक झाले असून मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी आपले पारंपरिक राजकीय स्पर्धक असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर कुरघोड्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच गेल्या रविवारी (ता.28) संगमनेरात मंत्री विखे पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गेल्या तीन दशकांपासून राजकीय पटलावरुन अदृष्य झालेले, मात्र 1990 सालच्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात यांना कडवी झुंज देणारे आणि अवघ्या 4 हजार 862 मतांनी पराभूत झालेले भाजपाचे ज्येष्ठ नेते ह.भ.प. वसंतराव गुंजाळ अचानक अवतीर्ण झाल्याने अनेकांचे दाताखाली ओठ गेले आहेत.

मालपाणी लॉन्सवर झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी त्यांचीच उपस्थिती होती. त्यातही खास म्हणजे याच मंचावर एकदा अपक्ष आणि दुसर्‍यांदा शिवसेनेकडून उमेदवारी केलेले ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बापूसाहेब गुळवेंचेही दर्शन घडल्याने विखे पाटलांच्या मंत्रीमंडळातील समावेशासह जिल्ह्यातील जनसेवा मंडळ पुन्हा एकदा जोमाने कार्यान्वित झाल्याचे दिसू लागले आहे. या सर्व घडामोडी जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथ घडविणार्‍या ठरु शकतात. त्यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्यासारख्या दिग्गज भाजपायींना पाठीमागे ठेवून काँग्रेसमधून भाजपात आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना दुसर्‍या क्रमांकाचे महसूल खाते देत सर्वप्रथम शपथ दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांचे फवारे उडू लागले आहेत.


संगमनेरचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात 1985 पासून संगमनेर विधानसभेचे प्रतिनिधीत्त्व करीत आहेत. 1990 साली त्यांच्या विरोधात भाजपाने ह.भ.प. वसंतराव गुंजाळ यांना उमेदवारी दिली होती. 1995 साली संगमनेरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली, मात्र उमेदवारीबाबत निर्णय न झाल्याने बापूसाहेब गुळवे यांनी अपक्ष निवडणूक लढविली, तर त्यानंतर 1999 साली शिवसेनेने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र 1990 नंतर प्रतिस्पर्धी उमेदवार आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील मतांची तफावत वाढत गेली आणि ती आज 62 हजार 252 मतांपर्यंत पोहोचली आहे. 2019 साली थोरात यांना विक्रमी 1 लाख 25 हजार 380 मतं मिळाली होती, तर विरोधी शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांना अवघ्या 63 हजार 128 मतांवर समाधान मानावे लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *