मद्य परवाना कायमस्वरुपी का रद्द करु नये? ‘सुरभी’ला जिल्हाधिकार्‍यांची नोटीस! शिवसेनेच्या मागणीला यश; पुढील आदेशापर्यंत परवाना निलंबित करण्याचेही आदेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कमी दर्जाचे व बनावट मद्य महाराष्ट्रात परवानगी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरुन ते हुबेहूब असल्याचे भासवून ग्राकांची व शासनाचीही फसवणूक करणार्‍या संगमनेरातील सुरभी बिअरबारचा मद्य परवाना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी अखेर निलंबित केला आहे. सदरचा प्रकार हा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ असून अशाप्रकारच्या बेकायदा उद्योगातून शासनाचे महसूली नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यान्वये सरदर बिअरबारचा परवाना कायमस्वरुपी का रद्द करण्यात येवू नये याचा 15 दिवसांच्या आंत लेखी खुलासा करण्याचे आदेशही बजावण्यात आले आहेत. गेल्या स्वातंत्र्यदिनी रायतेवाडी फाट्यावरील कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘सुरभी’तील मद्यसाठ्याची मोजदाद केली होती, त्यात प्रत्यक्ष साठा आणि नोंदी यात मोठी तफावत आढळल्याने सदरचा बिअरबार सील करण्यात आला आहे.


राज्य उतपदन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकांनी स्वातंत्र्यदिनी चैतन्य सुभाष मंडलीक याच्या रायतेवाडीतील घरावर छापा घातला होता. या कारवाईत गोवा व दमण राज्यात निर्मित मद्यसाठा व मद्याच्या विविध कंपन्यांचे बनावट बुच यासह 14 लाख 28 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चैतन्य सुभाष मंडलीक याच्यासह सुरभी बिअरबारचा नोकर नामधारक सुरेश मनोज कालडा या दोघांना अटक करण्यात आली होती. 16 ऑगस्टरोजी उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोपरगाव, श्रीरामपूर येथील भरारी पथकाचे निरीक्षक व राहाता येथील दुय्यम निरीक्षक यांनी नेहरु चौकातील सुरभी बिअरबारवर छापा घालून तपासणी केली.


या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष परवाना धारण करतांना निश्‍चित केलेल्या अटी व शर्थीचा भंग झाल्यासह अनेक विसंगती आएळून आल्या. सदरचा परवाना कक्ष मंजूर नकाशाप्रमाणे नसून त्यात स्वयंपाक घर व रेस्टॉरंट दिसून आलेले नाही. परवाना कक्षाच्या पुढील भागात काऊंटर तयार करुन तेथून वाईनशॉप प्रमाणे विदेशी मद्य व बिअरची विक्री केली जात असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. सदरच्या परवाना धारकाने आदल्या दिवसापर्यंत नोंद केलेली मद्याच्या बाटल्यांची संख्या आणि प्रत्यक्ष उपलब्ध मद्य यांच्या मोजदादमधूनही मोठी तफावत असल्याचा अहवाल या पथकाने वरीष्ठांना सोपविला होता.


या गुन्ह्याच्या तपासात अकोले येथील प्रकरणात अटक केलेल्या सुरेश मनोज कालडा यांचा संगमनेरातील सुरभी बिअरबारचा नोकर नामधारी शिवकुमार मनोज कालडा याच्याशी मोबाईल्वरुन वारंवार संपर्क झाल्याचे आढळून आले. त्यातून या गोरख धंद्यात त्याचाही सहभाग असल्याचे व त्यांच्याकडून परवाना कक्षाच्या मद्य वाहतूक परवान्याचा गैरवापर करुन त्याद्वारे परराज्यातून कमी दर्जाचे व ग्राहकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशाप्रकारचे मद्य आणून त्याची विक्री करीत असल्याचेही पथकाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.


त्याच प्रमाणे सदरच्या परवाना कक्षातून महाराष्ट्रात विक्री करण्यास परवानगी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या घेवून त्यामध्ये बेकायदेशीपणे शासन महसूल बुडविण्याच्या उद्देशाने त्याला बनावट बुच बसवून त्याची विक्री केल्याचे आढळल्याने अकोले येथील सुरभी विंग्ज या परवाना कक्षाचा अधिकृत नोकर नामधारी सुरेश मनोज कालडा व शिवकुमार मनोज कालडा यांचा थेट सहभाग आढळल्याने अकोले येथील बिअरबारचा परवाना निलंबित करण्यात आला आहे व सदरचा वरील परवाना कक्षाला यापूर्वीच सील ठोकण्यात आले आहे.


तसेच, सदर गंभीर गुन्ह्यामुळे सुरभी बिअरबारमध्ये आढळून आलेल्या मोठ्या विसंगतीमुळे नेहरु चौकातील सुरभी बिअरबारचा परवाना निलंबित करण्यात आला असून महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यातील तरतूदीनुसार तो कायमस्वरुपी रद्द का करण्यात येवू नये याचा खुलासा 5 सप्टेंबर दुपारी 30 वाजण्यापूर्वी करण्याचा आदेशही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. सदरचा प्रकार उघड झाल्यानंतर संगमनेर शहर शिवसेनेने त्या विरोधात आवाज उठवून नेहरु चौकातील सुरभी बिअरबारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांना भेटून केली होती. त्याची दखल घेत त्यांनी सदरचा बिअरबार सील करण्यासह त्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द का केला जावू नये अशी नोटीसही बजावल्याने शिवसेनेच्या मागणीला यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *