वादग्रस्त पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची अखेर’ उचलबांगडी! निष्क्रीय कारकीर्द; मुख्यालयात हजर होण्याचे आदेश, लवकरच चौकशीही लागणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
चारवेळा जीवदान मिळूनही कर्तृत्त्वशून्यच राहीलेल्या आणि संगमनेरच्या आजवरच्या इतिहासात सर्वात निष्क्रीय कारकीर्द ठरलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. गेल्या दिड वर्षाच्या येथील त्यांच्या कारकीर्दीत ते अतिशय वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या येथील काळात शहर पोलीस ठाण्यातील हप्तेखोरी वाढण्यासह पोलिसांच्या क्रयशक्तीवरही मोठा परिणाम झाल्याने गुन्हेगारी घटनांचा आलेख उंचावण्यासह शहरात वारंवार शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र प्रत्येकवेळी त्यांनी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी आघाडी सरकारमधील राजकीय हस्तकाचा वापर केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांची इच्छा नसतांनाही त्यांच्यावरील कारवाई टाळली गेली. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांच्या येथील निष्क्रिय आणि वादग्रस्त कारकीर्दीचा विरोध करणार्‍यांनी व्हाया लोणीमार्गे त्यांच्यावर नेम साधला असून त्यात ते चीतपट झाले आहेत. पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या बदलीचे वृत्त धडकताच संगमनेरात अनेकांनी आनंद व्यक्त केला असून काही ठिकाणी फटाकेही फोडण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांच्याकडे शहर पोलीस ठाण्याचा तात्पूरता पदभार देण्यात आला आहे.


पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची नोव्हेंबर 2020 मध्ये राहुरीहून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून बदली झाली. सुरुवातीचा काहीकाळ त्यांनी शहरातील विविध गर्दीच्या रस्त्यांवर दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यासह पोलीस दलातील कर्मचार्‍यांकडून क्षमतेहून अधिक काम करुन घेण्यास सुरुवात केली. त्यांची नियुक्ति कोविड संक्रमणाच्या कालावधीत झाल्याने त्यावेळी पोलिसांवर अतिरीक्त जबाबदारीही होती. त्यातून पोलीस कर्मचार्‍यांकडून काम करण्याची त्यांची हातोटी संगमनेरकरांना भावल्याने सुरुवातीचा काहीकाळ संगमनेरकरांनी त्यांचे कौतुकही केले, पण त्यांचा हा कर्तव्यपारायणाचा प्रकार केवळ दिखावा असल्याचेही अवघ्या काही महिन्यांतच दिसून आले.


गेल्यावर्षी रमजानच्या कालावधीत उपवास सोडण्याच्या वेळी सायंकाळी पुणे रस्त्यावरील मोगलपूरा मशिदीजवळ मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी झाल्याने त्यांच्याच आदेशाने अहमदनगरच्या पोलिसांनी सौम्य लाठीमार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथे जमलेला जमाव संतप्त झाला व त्यांनी पोलिसांशी वादावादी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी टीमप्रमुख म्हणून खासगी तेथे उपस्थित असलेल्या पो.नि.देशमुख यांनी खासगी वाहनातून खाली उतरुन जमावाला शांत करणे अपेक्षीत असतांना त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना जमावाच्या हाती सोडून चक्क तेथून पलायन केले होते. त्यांची हीच कृती बेकायदा जमावाचे मनोधैर्य उंचावणारी ठरली आणि त्याचा परिणाम तीनबत्ती चौकात जमावाकडून पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे इतका मोठा प्रकार घडूनही त्यांनी याबाबत कोणत्याही वरीष्ठ अधिकार्‍यांना याबाबतची माहिती दिली नव्हती. काही पत्रकारांनीच जेव्हा पोलीस उपअधीक्षकांना फोनवरुन माहिती दिली तेव्हा हा संपूर्ण प्रकार यंत्रणेच्या लक्षात आला होता.


त्यानंतर काही कालावधीतच 2 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने अहमदनगर पोलिसांनी थेट संगमनेरात येवून भारतनगर व जमजम कॉलनी परिसरातील साखळी कत्तलखान्यांवर एकाचवेळी छापे घालून पो.नि.देशमुख यांचे बिंग फोडले. त्यावेळी त्यांच्या विरोधात मोठा जनआक्रोशही झाला. शहरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी एकत्रित येवून त्यावेळी त्यांच्या विरोधात आंदोलनही पुकारले होते. मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी आपले राजकीय अस्त्र वापरल्याने पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर कारवाईची तयारी करुनही ते त्यावेळी बचावले होते. मात्र राज्यात सर्वात मोठ्या ठरलेल्या या कारवाईने संगमनेरकरांच्या मनात त्यांच्याविषयी निर्माण झालेला रोष मात्र तस्सूभरही कमी झाला नाही. त्याचे प्रतिबिंब त्यांना यापुढील कालावधीत स्पष्टपणे अनुभवायलाही मिळाले.


चालू वर्षात आर्थिक व्यवहारातून कोकणगावमधील एका तरुणाला रहेमतनगरमध्ये बोलावण्यात आले. त्या ठिकाणी त्याला त्याचे पैसे देण्याऐवजी मोठ्या जमावाने अमानुषपणे मारहणा करीत अगदी त्याचा जीवच घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याच परिसरातील काही मानवतावाद्यांनी योग्यवेळी पोलिसांना घटनेचे गांभिर्य कळविल्याने अर्धमेल्या अवस्थेतेतील त्या तरुणाचा जीव वाचला. या घटनेतून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शहरातील शांतता व सुव्यवस्थेचे बारा वाजविल्याचेही स्पष्ट झाले. एकामागून एक घडलेल्या या घटनांनी सर्वसामान्य माणसांच्या मनातील पोलिसांची विश्वासार्हता मात्र धुळीस मिळाली.


यानंतरही अशा घटना रोखण्यात आणि शहरात कायद्याचे राज्य निर्माण करण्यात ते सपशेल अपयशीच ठरले. गेल्या 14 एप्रिलरोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेत काही धर्मांध मुस्लिमांनी अनाधिकाराने घुसखोरी करीत धुडगूस घातला. विशेष म्हणजे खुद्द पोलीस निरीक्षक देशमुख या शोभायात्रेच्या बंदोबस्तासाठी तैनात होते, मात्र त्यांच्या निष्क्रीय कारकीर्दीमुळे शहरातील असामाजिक तत्त्वांवरील पोलिसांचा धाकच संपुष्टात आल्याने त्यांच्या उपस्थितीचा कोणताही परिणाम धुडगूस घालणार्‍या टोळक्यावर झाला नाही हीच गोष्ट त्यांची निष्क्रीयता अधिक ठळक करणारी होती.


त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी देशभर साजर्‍या झालेल्या हनुमान जयंती उत्सवातही त्यांच्या विषयीचा नागरी रोष स्पष्टपणे समोर आला. येथील हनुमान जयंती उत्सवात निघणार्‍या रथाला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. ब्रिटीशकाळापासून संगमनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वाजतगाजत भगवा ध्वज घेवून जातात आणि स्वहस्ते तो रथावर चढवतात, त्यानंतरच येथील हनुमान विजयरथाची चाके जागेवरुन पुढे सरकवली जातात. मात्र यावर्षी रथोत्सवाच्या 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रभारी पोलीस अधिकार्‍याच्या हाताने आलेला ध्वज पवित्र हनुमान रथावर चढवण्यास विरोध सुरु झाला. त्यासाठी गोवंशाच्या रक्ताने हात माखलेल्या अधिकार्‍याच्या हस्ते रथाचे पावित्र्य नष्ट न करण्याचे कारण सांगण्यात आले, त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्या हस्ते हा ध्वज पाठविण्यात आला.


या संपूर्ण कालावधीत शहराच्या शांतता व सुव्यवस्थेचे बारा वाजलेले असतांना चोर्‍या, घरफोड्या, खून, सोनसाखळ्या लांबविण्याचे प्रकार, एकामागून एक एटीएम फोडीच्या घटना, हाणामार्‍या आणि सर्वात महत्त्वाचे सर्वप्रकारच्या अवैध धंद्यांचे स्तोम मोठ्या प्रमाणात माजले. त्यामुळे शहरात पोलिसांचे अस्तित्त्व आहे की नाही अशी अवस्था निर्माण झाली. त्यातच रमजान ईद व अक्षय्य तृतीया हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने त्यांच्याच आग्रहावरुन शांतता समितीच्या बैठकीसाठी खुद्द पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर अधीक्षक स्वाती भोर संगमनेरात आले.


मात्र ज्या पद्धतीने हिंदु धर्मियांमध्ये गोवंश कत्तलखान्यांच्या बाबत त्यांच्याविषयी रोष होता, त्या कारणाने त्यांना हनुमान जयंतीचा मानाचा ध्वज घेवून जाण्यापासूनही रोखण्यात आले होते. तशीच नाराजी आणि रोष मुस्लिम धर्मियांमध्येही होता. ऐन सणासुदीच्या काळात त्यांनी राबविलेली धरपकड आणि त्यामुळे अनेकांना ईदसारख्या मोठ्या सणांनाही कुटुंबापासून दूर रहावे लागल्याने त्यांनी बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीवर मुस्लिम बांधवांसह हिंदु धर्मियांनीही बहिष्कार घातला. त्यामुळे संगमनेरच्या इतिहासात पहिल्यांदाच वरीष्ठ अधिकारी वेळेत पोहोचूनही शांतता समितीची बैठक रद्द करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढावली.


या प्रकाराने संतप्त झालेले पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयातून तडक मुख्यालयाकडे रवाना झाले आणि त्याच दिवशी पो.नि.देशमुख यांच्या बदलीच्या हालचालींना वेग आला. मात्र स्वार्थासाठी लोटांगण घालण्याची प्रवृत्ती त्यांच्या ठायी जिरलेली असल्याने त्यांनी अतिशय शिताफीने खुद्द पोलीस अधीक्षकांना त्यापासून परावृत्त होण्यास भाग पाडले. चुकीचे, मनमानी आणि बेजबाबदारपणे वागूनही मनासारखे घडत गेल्याने त्यातून त्यांचे आत्मबल कमालीचे दुणावले आणि त्यांचा अनिर्बंध मनमानी कारभार सुरु झाला. त्यांची येथील संपूर्ण कारकीर्द अतिशय निष्क्रिय आणि सतत वादग्रस्त ठरली. मात्र प्रत्येकवेळी त्यांनी आपला राजकीय वरदहस्त वापरल्याने ते बचावत गेले. मात्र राज्यात ज्या दिवशी सत्तांतर झाले त्याच दिवसापासून त्यांचे काऊंटडाऊन सुरु झाले होते, अखेर आज संगमनेरच्या पोलीस इतिहासातील सर्वाधीक निष्क्रीय कारकीर्दीचा शेवट झाला. त्यांच्या बदलीची वार्ता शहरात पसरताच अनेकांनी फटाके फोडून आनंदही व्यक्त केला, तर पोलीस कर्मचार्‍यांनी पेढे वाटून बला टळल्याचे समाधान मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *