आता चार दशकांपूर्वी बांधलेली इंदिरा वसाहतही ठरली ‘धोकादायक’ इमारत! छत्तीस भोगवटाधारकांसह शहरातील एकशे सात जणांनाही पालिकेने बजावल्या नोटीसा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराच्या समृद्धीचे प्रतिक ठरलेल्या नवीन नगर रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वे (नाना) व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक ठरल्यानंतर आता शहरातील अन्य 73 इमारतींच्या वापरकर्त्यांनाही वास्तु खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यात गेल्या चार दशकांपासून मेहतर समाजासाठी निवारा बनलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या ‘इंदिरा वसाहतीचा’ही समावेश झाला असून आठ दिवसांत येथील घरे खाली करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने या वसाहतीसह उर्वरीत सर्वच भोगवटाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.


गेल्या फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार पुण्यातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरातील पालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींसह अन्य शासकीय इमारतींचेही ऑडिट करण्यात आले. त्यातून नवीन रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वे (नाना) व्यापारी संकुलासह शहरातील अन्य 73 वास्तु धोकादायक असल्याचा निष्कर्ष या समितीने काढला व त्यानुसार कारवाईबाबतच्या सूचनाही नगर पालिका प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.


पालिकेने शासकीय अहवालाचा सन्मान म्हणून त्याचवेळी म्हणजे 11 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमांतंर्गत नवीन नगर रस्त्यावरील दुर्वे (नाना) व्यापारी संकुलात असणार्‍या 34 गाळेधारकांसह वाल्मीक कॉलनीतील इंदिरा वसाहतीतल्या 36, मोमीनपूरा भागातील अंजूमन इमारतीत राहणार्‍या 16, परदेशपूर्‍यातील तीन, पार्श्‍वनाथ गल्ली, बाजारपेठ व सय्यदबाबा चौकातील प्रत्येकी दोन व मेनरोड, कोष्टी गल्ली, खंडोबागल्ली, नारळगल्ली, मोमीनपूरा, चंद्रशेखर चौक, सुतारगल्ली, शिकलकर गल्ली, तेलिखुंट, साईनाथ चौक व साळीवाडा भागातील प्रत्येकी एक अशा एकुण 107 भोगवटादारांना गाळे अथवा घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने यासर्व भोगवटाधारकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. मात्र आता शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांनी समितीच्या अहवालावर काय कारवाई केली याबाबतचा अहवाल मागवल्याने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा नव्याने नोटीसा काढून ठराविक मुदतीत आपल्या ताब्यातील वास्तु खाली करण्याचे फर्मानच धाडल्याने संपूर्ण शहरात हडकंप माजला आहे.


1980 च्या दशकात तत्कालीन पदाधिकार्‍यांनी शहरातील उत्तरेकडच्या भागाचा विकास व्हावा यासाठी नवीन नगर रस्त्यावर साथी भास्करराव दुर्वे (नाना) व्यापारी संकुलाची इमारत उभी केली. या दोन मजली इमारतीत खाली व वर मिळून एकुण 34 जणांना भाडेकरारावर गाळे देण्यात आले. त्याच दरम्यान शहरात सफाईचे काम करणार्‍या मेहतर समाजाच्या निवार्‍याचा प्रश्‍न मार्गी लावतांना तत्कालीन पदाधिकार्‍यांनी वाल्मीक वसाहतीनजीक म्हाळुंगी नदीच्या काठावर इंदिरा वसाहतीची मुहूर्तमेढ रोवून 36 खोल्या असलेली दोन मजली इमारत उभी केली. तेव्हापासून या इमारतीत मेहतर समाजातील 36 कुटुंब येथे रहात आहेत.


गेल्या चार दशकांत या इमारतीत राहणारी अख्खी एक नवी पिढी उदयास आली आणि मोठी होवून पालिकेतच कामालाही लागली. ज्या इमारतीने आपले जीवन घडवले त्या इमारतीला सोडण्याचीही वेळ कधीतरी येईल हा विचारही या पिढीला कधी शिवला नव्हता. मात्र स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मात्र या वास्तु धोकादायक असल्याचे समोर आल्याने आता मात्र यासर्वच ठिकाणच्या भोगवटाधारकांमध्ये आणि रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पालिका प्रशासनाने नगरपालिका अधिनियम 1965 मधील कलम 195 व 299 चा आधार घेत या नोटीसा बजावून ठराविक मुदतीत आपल्या ताब्यातील गाळे अथवा घरे सोडण्याचे फर्मान बजावले आहे. ठरवून दिलेल्या कालावधीत दिलेल्या आदेशाचे पालन न झाल्यास नंतर उद्भवणार्‍या स्थितीची जबाबदारीही संबंधितांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील या दोन मोठ्या इमारतींसह अन्य 37 भोगवटाधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सदरच्या इमारती धोकादायक ठरविण्यात आलेल्या असल्याने त्या खाली करणं आवश्यक असल्याचे सांगीतले. मात्र त्याचवेळी सरसकट वास्तु पाडण्याऐवजी आहे त्या इमारतींचे आयुष्य आणि भक्कमपणा वाढवता येणं शक्य असल्यास त्या पर्यायावरही प्रशासकीय पातळीवरुन प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले. त्यासोबतच मेहतर समाजासाठी बांधण्यात आलेली इंदिरा वसाहत धोकादायक वास्तु असल्याने व या वसाहतीत सध्या 36 कुटुंब वास्तव्यास असल्याने कोणताही धोका पत्करण्यास पालिका प्रशासन तयार नसल्याचेही समोर आले. सदरची इमारत जमीनदोस्त करुन त्या जागी नव्याने रहिवासी संकुल उभारुन या भोगवटाधारकांची राहण्याची व्यवस्था करण्याचीही योजना असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


सुमारे 2200 वर्षांचा इतिहास असलेल्या संगमनेर नगरीत अनेक वास्तु प्राचीन आहेत. आज शहराच्या गर्भगृहात शंभर वर्षांपूर्वीच्या काही इमारती डौलाने उभ्या आहेत. परदेशपूरा भागातील एका जूनाट वाड्याचा दर्शनी भाग दरवर्षीच्या पावसाळ्यात कमी-अधिक प्रमाणात कोसळत असतो. मात्र अद्यापपर्यंत ना हा वाडा पाडण्यात आला, ना तेथील रहिवाशांना अन्यत्र हलविण्यात आले. त्यामुळे पालिकेने सद्यस्थितीत बजावलेल्या नोटीसा केवळ शासकीय फार्स आहे की खरोखरी संगमनेरकर नागरिकांची काळजी हे येणार्‍या काळात अधिक सुस्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र शहरातील 107 भोगवटाधारकांची हृदयगती तीव्रच असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *