शुक्रवारी महसूलमंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन

शुक्रवारी महसूलमंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठा आरक्षण प्रश्नी मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच नाशिक येथे संपन्न झाली. त्यानुसार आरक्षणासाठी पुढील रूपरेषा व आंदोलनाबाबत चर्चा होऊन तालुकास्तरावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणेबाबत ठरले. त्यानुसार संगमनेर येथील मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज व इतर मराठा समाज यांची शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाची जी भूमिका असेल त्यानुसारच वाटचाल संगमनेरमध्ये राहील. त्या अनुषंगाने शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर, 2020 रोजी राज्याचे महसूल मंत्री, संगमनेरचे लोकप्रतिनिधी व मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य असलेले बाळासाहेब थोरात यांच्या शिवाजीनगर येथील घरासमोर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.


तसेच मराठा आरक्षणासाठी येत्या 2 ऑक्टोबर रोजी संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामसभांमध्ये सर्व मराठा बांधवांनी, मराठा संघटनांनी, मराठा सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वत: जबाबदारीने पुढाकार घेऊन ग्रामसभेमध्ये मराठा आरक्षणाबाबत ठराव घेऊन तो मराठा समन्वयक यांच्याकडे सुपूर्द करावा असेही बैठकीत ठरले. त्यानुसार मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी 2 ऑक्टोबरला सकाळी ग्रामसभेमध्ये मराठा आरक्षण ठराव झाल्यानंतर संगमनेर येथे लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा आरक्षणासाठी आपले सहकार्य व योगदान द्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *