स्वतःसोबत सर्वांचेच जीव वाचविणे आपल्या हातात ः जाखडी वाहतूक सुरक्षेविषयी संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानची जनजागृती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘स्वतःसोबत सर्वांचेच जीव वाचविणे आपल्या हातात असते. त्यामुळे कोणीही बेजबाबदार पद्धतीने वाहन चालवून स्वतःचा जीव धोक्यात आणू नये आणि इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करू नये. सुरक्षित वाहन चालविणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने विना अपघात वाहन चालविण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.

वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी पुरोहित प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून शुक्रवारी (ता.29) सकाळी बसस्थानका समोरील अत्यंत वर्दळीच्या चौकात संस्थेच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जाखडी यांनी वरील आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जाखडी यांच्यासह उपाध्यक्ष संदीप वैद्य, सुहास बेलापूरकर, महाजन सर, वैभव कुलकर्णी, प्रा. अंबादास जोशी, सतीश जोशी, प्रसाद धनेश्वर, प्रकाश राठी, सोमनाथ तापडे, प्रकाश कलंत्री, विजय जोशी आदिंसह अनेक नागरिक, यजमान प्रतिनिधी, रिक्षाचालक सहभागी झाले होते.

‘वाहन हे आपल्या सोयीसाठी असते याचा कधीही विसर पडता कामा नये. वेगाच्या आहारी जाऊन अनेक समस्या निर्माण होतात. वाहतुकीचे नियम आपल्या भल्यासाठी आहेत. त्यामुळे त्यांचे पालन सर्वांनी केले पाहिजे. वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे त्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे प्रत्येकाच्या हिताचे आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व अपघात टाळता येतात. प्रत्येक नागरिक अशा रीतीने जागरूकपणे वागला तर अपघातांचे प्रमाण नगण्य होईल. त्यामुळे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. रस्त्यावर वाहन आणण्या आधी वाहन सुस्थितीत आहे का? त्याचे ब्रेक्स काम करतात का? हे तपासून बघणे गरजेचे आहे. रस्ते म्हणजे शर्यतीसाठी नसून नियमानुसार मर्यादित वेगात वाहने चालविण्यासाठी असलेली सोय आहे ही खूणगाठ कायम मनाशी बाळगावी’, असे जाखडी यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *