आठ वर्षांच्या अहिल्याचे कौतुक, कर्करोगग्रस्तांसाठी केसदान! वडील सत्यजीत तांबे म्हणाले, मलाही प्रेरणा मिळाली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कर्करोगाचे उपचार घेत असलेल्या व्यक्तींमध्ये किमोथेरेपी दरम्यान केस गळणे किंवा अ‍ॅलोपेसियाचा त्रास होणे ही बाब रुग्णांचं मानसिक खच्चीकरण करणारी असते. मात्र या रुग्णांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण होऊन या आजारावर मात करता येईल, यासाठी अनेक लोक आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत असतात. याच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या डॉ. मैथिली व सामाजिक – राजकीय क्षेत्रात काम करणारे सत्यजीत तांबे यांची अवघी आठ वर्षांची कन्या अहिल्याने स्वयंस्फूर्तीने या रुग्णांच्या केसरोपणाकरीता आपले केस कापून दिले आहेत.

उपचारादरम्यान होणार्‍या किमोथेरपींमधून रुग्णांच्या डोक्यावरील केस हे पूर्णपणे गळून जातात. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये प्रचंड निराशा निर्माण होऊन हा आजार त्यांना क्लेशदायक वाटू लागतो. अनेक रुग्णांवर केस रोपण करून त्यांना पूर्वस्थितीतील जीवन अनुभवता येते. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या मानसिक स्थितीवरही होत असतो. तसंच मानसिक स्थिती चांगली राहिल्याने रुग्ण उपचारांनाही उत्तम प्रतिसाद देतात.

अशा रुग्णांचे काही व्हिडिओ इयत्ता दुसरीत शिकणार्‍या चिमुकल्या अहिल्याने पाहिले. बर्‍याच दिवसांपासून ती त्याबाबत चिंताक्रांत होती. अत्यंत संवेदनशीलपणे तिने या रुग्णांना आपण काय मदत करू शकतो, याचा विचार केला. अहिल्याने ग्रेटा थनबर्ग आणि मलाला यूसुफझाई यांची कहाणी तिच्या आजीकडून म्हणजेच संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्याकडून ऐकली होती. ग्रेटाने ज्याप्रकारे पर्यावरण रक्षणासाठी लढा सुरू केला आहे किंवा मलालाने वयाच्या 11 व्या वर्षी तालिबान्यांसमोर न झुकता शिक्षणाचा निर्धार कायम ठेवला त्यातून प्रेरणा घेऊन खेळण्या – बागडण्याच्या वयात अहिल्याने स्वत:हून हे केस देण्याचा निर्णय घेतला.


माझी आठ वर्षांची मुलगी अहिल्या हिचा मला अभिमान वाटतो. तिने स्वतःहून कर्करोगांच्या रुग्णांसाठी निस्वार्थपणे केस दान केले. वडील म्हणून तिची ही संवेदनशीलता माझी छाती अभिमानाने फुलवतेच. पण समाजासाठी आणखी काम करत राहण्याची प्रेरणा देखील देते. एवढेच नाही तर नवी पिढी अशाप्रकारे घडताना पाहून मनात चांगल्या भविष्याची आशा देखील जागृत झाली आहे.
– सत्यजीत तांबे (अहिल्याचे वडील)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *