कोकमठाण येथील गंगागिरी सप्ताहची लगबग सुरू 2 ऑगस्टपासून होणार सुरुवात; भाविकांना लागली आस

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे 2 ते 9 ऑगस्ट या दरम्यान होत असलेल्या सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या विविध मंडपांची, रस्ते उभारणी, भटारखान्यातील चुल्हांगणे, कीर्तन प्रवचनाचे व्यासपीठ याच्या उभारणीची लगबग सुरू आहे. सप्ताह काळात सप्ताह स्थळाला पंढरीचे स्वरुप येणार असल्याने सप्ताहस्थळाला आता लाखो भाविकांची आस लागून आहे.

कोकमठाण पंचक्रोशी आणि सप्ताह समिती भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी अहोरात्र झटत आहेत. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या सप्ताहाला पावणेदोनशे वर्षांची परंपरा आहे. हा सप्ताह अखंडपणे सुरू आहे. मध्यंतरी दोन वर्ष करोनाने सप्ताह सराला बेटावरच पण साध्या पद्धतीने करण्यात आले. आता करोनानंतर पहिलाच सप्ताह श्री क्षेत्र कोकमठाण येथे होत आहे. कोकमठाण शिवारात परंतु नगर-मनमाड महामार्गालगत जंगली महाराज आश्रमाच्या जवळच विस्तीर्ण परिसरात सप्ताहाचे स्थळ आहे. सप्ताह समिती मागील काही दिवसांपासून या सप्ताहाची जोरदार तयारी करत आहे.

प्रवचन-कीर्तनासाठी विस्तीर्ण मैदान तयार करण्यात आले आहे. मध्यंतरी सलग बुरबूर पावसाने हे मैदान हिरवळीने नटले असल्याने तो परिसर कमालीचा प्रसन्न वाटत आहे. नगर-मनमाड महामार्गापासून काही मीटर अंतरावर प्रहरा मंडप उभारला जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रहरा मंडपासमोर धर्मध्वज उंचावर मोठ्या दिमाखात फडकत आहे. त्याजवळच महंत रामगिरी महाराजांची कुटीया उभारणी अंतिम टप्प्प्यात आहे. प्रहरा मंडपात सात दिवस अखंड हरिनामाचा जयघोष होणार असल्याने हा परिसर सात दिवस अखंड भजनाने दुमदूमून जाणार आहे. सप्ताहाचा परिसर जमिनीचे क्षेत्र आहे. सप्ताहा समितीने त्या परिसरात रस्ते उभारले आहेत. पाऊस आला तर चिखल होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *