समनापूरात जमिनीच्या वादातून दोघा भावांचा एकमेकांवर हल्ला! दोन्हीकडचे तिघे जखमी; सहाजणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल, तिघांना अटक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राला असलेल्या भाऊबंदकीच्या शापाचे विकृत दर्शन आज पुन्हा संगमनेर तालुक्यात घडले. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून दोन सावत्र भावांनी शड्डू ठोकून एकमेकांनाच आव्हान दिले. त्यातून दोन्ही कडून आलेल्या प्रत्येकी तिघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मनसोक्त तुडविले. या घटनेत एकाने चक्क आपल्या सावत्र आईच्या श्रीमुखातही भडकावली. वाद इतका विकोपाला गेला की तो सोडवण्यासाठी गेलेल्या मध्यस्थालाही या भाऊबंदकीने सोडले नाही. दुसर्‍याने हातात लाकडी दांडकं घेत मध्यस्थाच्याच डोक्यात घातला, त्याचा परिणाम गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल होण्यात आणि अनिश्चित कालावधीसाठी कारागृहात कैद होण्यात झाला. सुखात सुरु असलेल्या दोन्हीकडच्या संसारात जमिनीचा तुकडा शिरला आणि त्यातून आयुष्यभराचं कटू शत्रूत्वही पदरी पडलं.

संगमनेर शहर पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही सावत्र भावांच्या स्वतंत्र तक्रारी दाखल करुन घेतल्या आहेत. त्यातील पहिली तक्रार सखाहारी खंडू शेरमाळे या सदतीस वर्षाच्या तरुण शेतकर्‍याने नोंदवली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी (ता.22) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारखाना रस्त्यावरील त्याच्या वाट्याच्या शेतजमिनीत तो नांगरणी करीत होता. त्यावेळी त्याचा सावत्र भाऊ कैलास आपली आई दगडाबाई व मित्र इरशाद बंडू इनामदार यांच्यासह तेथे आला. त्याने तेथे येताच दरडावणीच्या भाषेत ‘तू शेत नांगरायचे नाहीस..’ असे म्हणतं त्याला शिवीगाळ केली. या तिघांनी दगडं व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही त्याने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे. त्याचया तक्रारीवरुन शहर पोलिसांनी वरील तिघांविरोधात भा.दं.वि. कलम 447, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कैलास खंडू सातपुते या 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

भाऊबंदकीच्या दुसर्‍या अध्यायात सध्या तुरुंगात असलेल्या कैलास खंडू शेरमाळे यानेही पोलिसांकडे आपली कैफीयत मांडली आहे. त्यानुसार पोपट उर्फ सखाहारी खंडू शेरमाळे हा शेतजमिनीची नांगरणी करीत असताना फिर्यादी हा त्यांची आई दगडाबाई व मित्र इरशाद तेथे गेले व त्यांनी ‘तू शेत नांगरु नकोस, आपण कायदेशीर मोजणी करुन घेऊ. जे करायचे ते कायद्याने करु’ असे म्हणताच त्याने सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने चक्क फिर्यादीच्या आईच्या श्रीमुखातही भडकावल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. आरोपी सोबत असलेल्या बाळू रंभाजी खेमनर (रा.साकूर) व विकास बाबासाहेब आल्हाट (रा.टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर) अशा तिघांनी कैलास व त्याच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरुवात केली.

भांडणे वाढू लागल्याने व ती हाणामारीपर्यंत पोहोचल्याने अनर्थ नको म्हणून फिर्यादीच्या सोबत गेलेला त्याचा मित्र इरशाद बंडू इनामदार मध्यस्थी करण्यासाठी मध्ये पडला. त्याचा राग येवून सखाहारीने लांकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर प्रहार केल्याने तो रंगबंभाळ झाला. त्याच्याकडे मदतीसाठी जाणार्‍या फिर्यादी कैलासलाही त्याने लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी त्याने फिर्यादीला ‘ही जमीन मीच नांगरणार आहे, तुला काय करायचे ते करुन घे. जर तू मला आडवा आलास तर, मी तुला आणि तुझ्या आईलाही सोडणार नाही. तुझा जीव घेवून काटा काढेल..’ अशा भाषेत दमही भरला. याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी वरील तिघांवर भारतीय दंडसंहितेचे कलम 326, 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून सखाहारी खेमनर आणि विकास आल्हाट या दोघांना अटक केली आहे. इरशाद इनामदार याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात भाऊबंदकीच्या वादातून रक्ताची नाती एकमेकांसमोर प्राणघातक हत्यारं घेवून उभी राहतात आणि अनेकदा एकमेकांवर हल्ले करुन जखमीही होतात आणि आपल्याच भाऊबंदांना रक्तबंभाळही करतात. अशाप्रकारच्या भांडणांनंतर त्या एकाच रक्ताच्या नात्यांमध्ये आयुष्यभराची कटूता निर्माण होते आणि पिढ्यान्पिढ्या ती जोपासली जाते. खरेतरं महाराष्ट्राला असलेला हा शाप आतातरी सुशिक्षित पिढीने पुसायला हवा. कोणत्याही गोष्टीचं उत्तर संवादातून सापडतेच. मात्र त्याचा आजही वापर होत नसल्याचे समनापूरची घटना सांगता. आज पहाटे तीन वाजता दाखल झालेल्या या दोन्ही तक्रारी दोघा सावत्रभावांनी एकमेकांविरोधात दिल्या आहेत.

तत्पूर्वी दोन्ही बाजूने एकमेकांवर मनसोक्त शिव्यांची उधळण आणि लाथाबुक्क्यांचा प्रसाद वाटला गेला आहे. या कुटुंबाशी संबंध नसलेल्या त्रयस्त माणसाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे दाखल तक्रारीत कलम 326 लावण्यात आले आहे. आवेशात येवून केलेल्या कृत्याचे परिणाम कायम असतात हे आरोपीला या कलमातून समजणार आहे. सुखाने सुरु असलेल्या संसारात भाऊबंदकी शिरल्याने तरुण वयात प्रगतीच्या मार्गात कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे आणि आयुष्यभर या गुन्ह्याचा डागही वहावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *