पाणलोटासह लाभक्षेत्राला चिंब करीत पावसाचा जोर ओसरला! वाकी, शिरपुंजे, कोथळे, सांगवी व पाडोशी लघु प्रकल्प तुडूंब; सर्वच धरणांत पाण्याची आवक

नायक वृत्तसेवा, अकोले
मागील 72 तासांपासून जिल्ह्यातील बहुतेक सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गेल्या 48 तासांत पावसाने थैमान घातल्याने काही भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे, मात्र गेल्या बारा तासांत पावसाचा जोर कमी झाल्याने आदिवासी पाड्याला काहीसा दिलासाही मिळाला आहे. निळवंडे धरणाच्या पाणलोटातील वाकी जलाशय तुडूंब झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली असून आढळा खोर्‍यातील पाडोशी आणि सांगवी हे दोन्ही लघु पाटबंधारे प्रकल्प ओसंडल्याने आढळा धरणातही पाण्याची वेगवान आवक सुरू झाली आहे. मुळा खोर्‍यातील शिरपुंजे आणि कोथळे प्रकल्प तुडूंब झाल्याने मुळा नदीचा फुगवटाही वाढला आहे.

गेल्या शनिवारी मुळा, भंडारदरा, निळवंडे व आढळा या अकोले तालुक्यातील चारही धरणांच्या पाणलोटात फेर धरणार्‍या आषाढ सरींनी स्वाती नक्षत्राच्या पूर्वार्धापासूनच संपूर्ण पाणलोटाला अक्षरशः झोडपून काढले. मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अधिक असल्याने या भागातील काही आदिवासी बांधवांच्या भातशेतीचे बांध वाहून जाण्याच्या तर काही भागात भातखाचरे तुडूंब झाल्याने भातरोपे त्याखाली बुडाल्याच्या घटनाही समोर आल्या. दिवसभर कोसळणार्‍या आषाढ सरींना जोरदार वार्‍याने संगत केल्याने पाणलोटात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला असून आपली दुभती जनावरे वाचवण्याचे आव्हानही आदिवासींसमोर आहे. दरवर्षी पावसाळ्यात गारव्यामुळे आदिवासी पाड्यात अनेक पाळीव जनावरे दगावतात.

गेल्या 48 तासांत निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कळसूबाईच्या गिरीशिखरावरही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गडावरुन उगम पावणारी कृष्णवंती आवेशाने वाहू लागली असून या नदीवरील 112.66 दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी जलाशय तुडूंब झाल्याने निळवंडे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. आज सकाळी या जलाशयाच्या भिंतीवरुन 1 हजार 22 क्युसेक वेगाने निळवंडे धरणात पाणी दाखल होत होते. दुसरीकडे मोठ्या पावसाची प्रदीर्घ प्रतीक्षा करणार्‍या आढळा खोर्‍यातूनही सुखदवार्ता समोर आली असून आढळा खोर्‍यातील पाडोशी व सांगवी हे दोन्ही लघु पाटबंधारे प्रकल्प रविवारी ओसंडल्याने आढळा धरणातील नवीन पाण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

मुळा खोर्‍यातील पावसालाही सातत्याने जोर चढत आहे. मुळा खोर्‍यातील आंबित व पिंपळगाव खांड प्रकल्प यापूर्वीच भरल्याने मुळा नदी वाहती होवून धरणात नवीन पाणी दाखल होत असताना रविवारी शिरपुंजे व कोथळे लघु पाटबंधारे तलावही तुडूंब झाले आहेत. त्यामुळे मुळेचे पात्र फुगायला सुरुवात झाली असून हंगामात पहिल्यांदाच मुळेच्या प्रवाहाने सात हजारांचा आकडा ओलांडताना आज सकाळी 8 वाजता कोतुळनजीक 7 हजार 667 क्युसेक वेगाचा प्रवाह धारण केला आहे. पाणलोटात मागील 72 तासांपासून थैमान घालणार्‍या पावसाचा जोर मात्र गेल्या बारा तासांपासून खालावला असून ओढ्या-नाल्यांची गतीही मंदावली आहे. पाणलोटासह लाभक्षेत्रातही सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

गेल्या 24 तासांत झालेला पाऊस पुढील घाटघर 124 मिलीमीटर, रतनवाडी 109 मिलीमीटर, भंडारदरा 95 मिलीमीटर, वाकी 85 मिलीमीटर, निळवंडे 32 मिलीमीटर, आढळा व कोतूळ प्रत्येकी 15 मिलीमीटर, अकोले 10 मिलीमीटर, संगमनेर 14 मिलीमीटर, ओझर 12 मिलीमीटर, आश्वी 10 मिलीमीटर, लोणी 07 मिलीमीटर, श्रीरामपूर 10 मिलीमीटर, शिर्डी 05 मिलीमीटर, राहाता व राहुरी प्रत्येकी 10 मिलीमीटर, कोपरगाव 13 मिलीमीटर व नेवासा 16 मिलीमीटर. धरणातील पाणीसाठे मुळा 9 हजार 956 दशलक्ष घनफूट (38.29 टक्के), भंडारदरा 5 हजार 17 दशलक्ष घनफूट (45.45 टक्के), निळवंडे 4 हजार 226 दशलक्ष घनफूट (50.79 टक्के) व आढळा 497 दशलक्ष घनफूट (46.89 टक्के).


भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढू लागल्याने पर्यटकांची गर्दीही वाढत असताना आता कृष्णवंतीवरील वाकी लघु पाटबंधारे प्रकल्पही तुडूंब झाल्याने कृष्णवंती वाहती झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला रंधा धबधबा कोसळायला सुरुवात झाली असून पर्यटकांसाठी पावसाळी मेजवाणी उपलब्ध झाली आहे. पावसाळ्यात हा धबधबा आणि निळवंडेचा अथांग जलसाठा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, निळवंडेतील पाणी जसे वाढत जाईल तसा रंधा धबधबा संकुचित होत जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *