अधिक कदम येणार ‘कोण होणार करोडपती’ हॉटसीटवर! अहमदनगर ते काश्मिरपर्यंतचा थरारक प्रवास मिळणार पाहायला..

नायक वृत्तसेवा, नगर
सोनी मराठी वाहिनीवरील जनसामान्यांचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला आहे. सचिन खेडेकर यांचे बहारदार सूत्रसंचलन हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात दर आठवड्यात विशेष अतिथी येत असतात. या आठवड्यात शनिवारी (ता.2) कर्मवीर विशेष भागात कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत.

काश्मिरी मुलींसाठी बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून अधिक कदम हे लक्षणीय कामगिरी करत आहेत. त्यांचा जन्म वारकरी संप्रदायात झाल्याने घरामध्ये लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण आहे. ते पखवाज आणि मृदंग उत्तम वाजवतात. कुठल्याही भक्तीचा पाया हा कार्यकर्तृत्वाचा असतो, असे त्यांचे मत आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात ते कायम दंग होतात. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर आषाढ वारीनिमित्त एका अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन होणार आहे. 18 दिवसांसाठी काश्मिरमध्ये गेलेले अधिक कदम तिथली परिस्थिती आणि घटना पाहून तिथेच राहिले. ज्या गावात हजारपेक्षा जास्त पुरुषांना आतंकवाद्यांनी मारले, त्या गावात ते राहिले. आतंकवादी अधिक यांना 19 वेळा घेऊन गेले आहेत. तिथे असणार्‍या सैनिकांची वाईट अवस्था आणि यांसारखे अनेक किस्से त्यांनी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात कथन करणार आहेत.

कोण होणार करोडपतीच्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणार्‍या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातल्या कर्मवीर विशेष भागात अधिक कदम सहभागी होणार आहेत. अहमदनगर ते थेट काश्मिरमधील कुपवाडा असा प्रवास करणारे अधिक कदम त्या भागात ‘अधिक भैय्या’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ या संस्थच्या माध्यमातून ते काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात. कारण जम्मू-काश्मिरमध्ये फक्त स्त्रिया बदल घडवू शकतात, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आत्तापर्यंत अधिक यांच्या संस्थेने 167 मुलींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांची लग्नं लावून दिली आहेत. तर सध्या 230 मुली वसतिगृहामध्ये राहून त्यांच्या आवडीचं शिक्षण घेत आहेत. अधिक कदम यांचे हे सगळे अनुभव कोण होणार करोडपतीच्या मंचावरून ऐकता येणार आहेत. हे अचंबित करणारे अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’ कर्मवीर विशेष, 2 जुलै शनिवारी रात्री 9 वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *