राहुरी विद्यापीठातील शेतकरी भोजनालय धूळखात विद्यापीठ प्रशासनाची उदासीनता; सुरू करण्याची मागणी


नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असणार्‍या फुले शेतकरी भोजनालय धूळखात पडून असल्याने विद्यापीठ प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे.

इमारतीच्या प्रवेशद्वाराची मोडतोड, सिमेंट पत्र्याला गेलेले तडे, कौलाची मोडतोड, तुटलेल्या अवस्थेत खिडक्यांच्या दुर्दशा, गज व अँगल गायब झालेल्या अवस्थेत आढळून येत आहे. कॅन्टिनची झालेली दुरवस्था पाहून राहण्यायोग्य राहिली नसल्याने बंद अवस्थेत धूळखात पडून आहे. याभोवती व आत-बाहेर याठिकाणी विजेची देखील सोय विद्यापीठ प्रशासनाने बंद केल्याने अंधार झाला असून ही कॅन्टीन अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भकास झालेला आहे.

एकेकाळी हा परिसर भव्य-दिव्य रोषणाईने नटलेला होता. त्यामुळे विद्यापीठाबरोबर बाहेरील शेतकर्‍यांची या भोजनालयाकडे धाव वाढली होती. त्यामुळे या शेतकरी भोजनालयाच्या व विद्यापीठाच्या तिजोरीत उत्पन्नातही वाढ झाली होती. काम करणार्‍या मजुरांची संख्या वाढत असल्यामुळे यांचाही पोटापाण्याचा प्रश्न सुटला होता. मात्र गेली दोन वर्षांच्या कालखंडात शेतकरी भोजनालय बंद अवस्थेत असल्यामुळे मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने हे बंद पडलेले शेतकरी भोजनालय पुन्हा नव्याने सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या शेतकरी भोजनालयाविषयी विद्यापीठ अभियंता यांच्या सूचनेनुसार काम करणारे धनवटे यांच्याशी संपर्क साधला असता ज्यावेळेस निविदा येईल, त्यानंतरच कॅन्टीनबाबत निर्णय घेतला जाईल. अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया जालिंदर धनवटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *