संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांची धडाकेबाज कारवाई! धुमस्टाईल मोबाईल हिसकावरणारे धरले; तब्बल सव्वातीन लाखांचे मोबाईल हस्तगत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही महिन्यांपासून संगमनेर व परिसरातून मोटार साकलवरुन येत रस्त्यावर मोबाईलवर बोलत जाणार्‍यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. अशाच एका प्रकरणाचा सखोल तपास सुरु असतांना संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांनी मोठी कामगिरी बजावली असून एका अल्पवयीनासह दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 25 हजार रुपये किंमतीचे मोबाईल अठरा आणि दिड लाख रुपये किंमतीची एक बुलेट दुचाकी हस्तगत केली आहे. या प्रकरणी एकाला सिन्नर तालुक्यातून तर दुसर्‍याला संगमनेर शहरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून हस्तगत केलेले 14 मोबाईल त्यांच्या मूळमालकांना परत केले असून चार जणांचा शोध लागलेला नाही.


याबाबत पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार 14 मे 2022 रोजी आनंद बनभेरु हा तरुण नाशिक रस्त्यावरील हॉटेल काश्मिरसमोरुन मोबाईलवर बोलत पायी जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्याच्या हाताला हिसका देवून त्याचा मोबाईल पळवून नेला होता. तर तत्पूर्वी महिनाभर अगोदर पुणे-नाशिक बायपास रस्त्यावरील राजापूरच्या पुलाजवळून नाशिक येथील राजेंद्र माळवे यांचाही मोबाईल अशाच पद्धतीने लांबविण्यात आला होता. या दोन्ही घटनांची नोंद संगमनेर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.


या प्रकरणाचा तपास संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी आपल्या हाती घेतला व आपल्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे, गणेश घुले, महिला पोलीस अनिता सरगवे यांच्यासह सायबल सेलमधील पोलीस नाईक फुरकान शेख यांना याबाबत सूचना देत तपासकामी रवाना केले. या पथकाने मोबाईल चोरी झालेल्या विविध ठिकाणी जावून आसपासच्या सीसहटीव्ही फूटेजसह प्रत्यक्षदर्शींकडून चोरट्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक प्रक्रीया पूर्ण करीत पोलिसांनी एका आरोपीचे नाव निष्पन्न केले.


त्याचा नेमका ठावठिकाणा शोधीत असतांना तो नाशिक जिल्ह्यातील विंचूर दळवी (ता.सिन्नर) येथे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ तेथे छापा घालून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याला त्याची ओळख विचारली असता त्याने आपले नाव अजय सोमनाथ पवार असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यातून संगमनेर शहरातील आणखी एका अल्पवयीन मुलाचे नाव समोर आले, पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती एकप्रकारे मोबाईलचे घबाडच लागले.


त्यात सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, वनप्लस, आय.एन, मोटोरोला, रेडमी, एम.आय यासारख्या 16 मोबाईलसह प्रत्येकी 50 व 35 हजार रुपये किंमतीचे दोन आय फोन असे एकूण 3 लाख 25 हजार रुपये किंमतीचे एकूण 18 मोबाईल संचही पोलिसांनी हस्तगत केले. याच तपासात पोलिसांना नाशिक शहरातील इंदिरानगर येथून चोरुन आणलेली 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची रॉयल इनफिल्ड बुलेट गाडीही सापडली. हा सगळा मुद्देमाल ताब्यात घेवून पोलिसांनी आरोपी पवार याला अटक केली असून अल्पवयीन आरोपीला नगरच्या बाल न्यायालयाकडे पाठविले आहे.


पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व त्यांच्या पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईतून पोलिसांनी कासारवाडीतील योगेश सुरेश मंडलीक, माळीवाड्यातील शुभम अविनाश ताम्हाणे, सुकेवाडीतील सुनील सोपान कोटकर, घुलेवाडीतील सागर रमेश पानसरे व वंदना भाऊसाहेब बाचकर, ढोलेवाडीतील संजय विलास बटवाल, कोल्हेवाडीतील भाऊसाहेब कारभारी दिघे, बदगी बेलापूर (ता.अकोले) येथील प्रीती चंद्रकांत शिंगोटे, गणेशनगर येथील साधना मुकुंद दिक्षीत, नायकवाडपुरा येथील मोहसीन उमरखान पठाण, गुंजाळवाडीतील रवीकिरण विश्‍वास गुंजाळ, साई संतोष मैंदड व राजेश बाळकृष्ण मोरे व बालाजीनगर मधील पुष्पा देवराम लोहकरे या चौदा तक्रारदारांचे महागडे मोबाईल फोन त्यांना पुन्हा मिळवून दिले आहेत. याशिवाय अन्य मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या मालकांचा मात्र अद्याप तपास लागलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *