टाकळीभान शिवारात भर दुपारी बिबट्याचा धुमाकूळ शेळ्यांच्या कळपावर हल्ला; पाच ठार तर चार गंभीर जखमी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील टाकळीभान येथे बिबट्याने शुक्रवारी (ता.3) भर दुपारी 12 वाजता खोडवा ऊसात चारा खात असलेल्या शेळ्यांच्या कळपातील सुमारे 12 शेळ्या व बकरांवर हल्ला केला. यातील 5 शेळ्या मृत झाल्या असून 4 शेळ्यांची प्रकृती अत्यावस्थ आहे. तर कळपातील 3 शेळ्या गायब आहेत. या भागातील बिबट्याचा आजपर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.

टाकळीभान शिवारात काकासाहेब विनायक डिके यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. काकासाहेब यांचे बंधू भास्कर हे नेहमीप्रमाणे आपला 24 शेळ्यांचा कळप घेऊन शेजारीच असलेल्या खोडवा ऊसात शेळ्या चारत होते. खोडवा ऊसाचे पीक छातीभर वाढलेले असल्याने भास्कर डिके हे बांधावरील झाडाखाली बसून शेळ्यांवर लक्ष ठेवून होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेळ्यांचा ऊसातून ओरडण्याचा गोंगाट ऐकू आला तर काही शेळ्या ऊसातून सैरभैर बाहेर पळाल्या आणि काही शेजारी असलेल्या घराच्या दिशेने धावत सुटल्या.

शेळीपालक भास्कर डिके यांच्या ही बाब लक्षात आली. नक्कीच बिबट्या आसावा असा अंदाज करुन आरडाओरड केल्याने शेजारील वस्तीवरील कुटुंब धावत आले. मात्र ऊस वाढलेला असल्याने व बिबट्याच्या धास्तीने ऊसात शिरण्याचे धाडस होत नव्हते. ही बातमी शेजारच्या वस्त्यांवर पसरताच सगळ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व धाडसाने ऊसात शोधमोहीम सुरु केली. या मोहिमेत 5 शेळ्या ऊसातच मृत अवस्थेत मिळून आल्या तर 4 जखमी अवस्थेत सापडल्या. मात्र 3 शेळ्यांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.

याबाबत वन विभागाचे कर्मचारी विकास पवार यांना माहिती देण्यात आली. वरीष्ठ अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनाही कळविण्यात आले. पशुवैद्यकिय विभागालाही माहिती देण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत कोणीही घटनास्थळाकडे फिरकले नाही. दरम्यान, परिसरात आजपर्यंतची ही सर्वात मोठी घटना असली तरी संबंधित विभागाची याबाबत उदासीनता दिसून येत आहे. या घटनेत बिबटे निश्चितच एकापेक्षा जास्त असावेत, या धास्तीने परिसर भयभीत झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *