प्रवरेतील वाळू तस्करांच्या खड्ड्यांनी घेतला विद्यार्थ्याचा जीव! संगमनेरच्या प्रवरा नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत; डोळ्यादेखत झाला खड्ड्यात नाहीसा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भंडारदरा धरणातून गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या उन्हाळी आवर्तनात आत्तापर्यंत एकही अप्रिय घटना समोर आलेली नसताना आवर्तनाच्या शेवटच्या टप्प्यात मात्र वाळू तस्करांच्या प्रचंड खड्ड्यांनी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जीव घेतला आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गंगामाई घाटावर सदरची घटना घडली. यात संकेत वाडेकर या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. घटनेनंतर सुमारे तासाभरानंतर बुडालेल्या ठिकाणीच त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने संगमनेर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणारा संकेत वाडेकर (रा.साकूर, ता.संगमनेर) हा एकोणवीस वर्षीय विद्यार्थी आपल्या अन्य तीन मित्रांसह संगमनेरच्या प्रवरा नदीवर पोहण्यासाठी गेला होता. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हे चौघेही गंगामाई घाटावर आंघोळीसाठी पात्रात उतरले. या दरम्यान संकेत वाडेकर याच्या घरुन त्याच्या बहिणीचा फोनही आला होता, नदीपात्रातून बाहेर येत त्याने आपल्या बहिणीशी संवादही साधला. त्यानंतर तो पुन्हा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला. बराच वेळ झाल्यानंतर यासर्व मुलांनी बाहेर येण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी त्यांना अचानक मोठा खड्डा लागल्याने ते चौघेही गटांगळ्या घेवू लागले. यातील तिघे एकमेकांच्या जवळच असल्याने त्यांनी आपापले हात पकडून खड्डा ओलांडला, मात्र संकेत वाडेकर हा तरुण त्यांच्यापासून दूर असल्याने त्याला वाचण्याची संधी मिळाली नाही. तो जागीच खड्ड्यात बुडाला तो परत वरती आलाच नाही. त्यानंतर त्याच्या तीनही मित्रांसह आसपास पोहणाऱ्या काहीजणांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आढळला नाही.
या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, राष्ट्रीय जलतरणपटू सदाशिवराव थोरात, नगरसेवक किशोर पवार, नितीन अभंग यांच्यासह अनेकांनी नदीकाठी धाव घेतली. पोहणाऱ्या काहीजणांनी बुडीत झालेल्या ठिकाणासह आसपासच्या परिसरात कसून शोध घेतला असता सुमारे तासाभराच्या अंतराने गंगामाई घाटाच्या समोरील बाजूस वाळूतस्करांनी केलेल्या प्रचंड मोठ्या खड्ड्यात सदर विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. त्याला बाहेर काढतात नदीकाठावर जमलेल्या शेकडो जणांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. शेतकरी कुटुंबातील असलेला हा विद्यार्थी अभ्यासात अतिशय हुशार होता. मित्रांसोबत आंघोळीसाठी म्हणून तो नदीपात्रात उतरला होता. मात्र त्यापूर्वीच काळ त्याची प्रतीक्षा करीत होता, याची त्याला कुठलीही कल्पना नव्हती आणि त्यात तो अलगद अडकला. या घटनेने संगमनेर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *