उद्योजक मनीष मालपाणी यांच्या ‘त्या’ पोस्टचा समाज माध्यमांत धुमाकूळ! काकांच्या कार्यकाळाला उजाळा देण्याचा प्रयत्न; नेटकर्‍यांकडून सक्रीय राजकारणात उतरण्याचा सल्ला..

गोरक्षनाथ मदने, संगमनेर
संगमनेरच्या जडणघडणीत आणि प्रगतीत मालपाणी उद्योग समूहाचा मोठा वाटा आहे. मागील सुमारे शंभर वर्षांपूर्वी संगमनेरात सुरु झालेला त्यांचा व्यवसाय आज राज्याच्या कक्षा ओलांडून देशातील अनेक राज्यांमध्ये विस्तारला आहे. एकीकडे त्यांच्या व्यावसायिक कक्षा रुंदावत असताना दुसरीकडे त्यांनी समाजाशी असलेली बांधिलकीही तितक्याच जोरकसपणे सांभाळली आहे. प्रगतीचे आलेख ओलांडून उंचीवर गेलेल्या संगमनेरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक संस्था आजही याची साक्ष देत आहेत. मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख, दिवंगत ओंकारनाथ मालपाणी यांनी सहा दशकांपूर्वी पालिकेचे नेतृत्त्वही केले होते, त्यांच्या कार्यकाळात झालेल्या पथदर्शी कामांची आजही संगमनेरात चर्चा होते. त्यांच्याच कार्याला उजाळा देणारी एक ‘पोस्ट’ त्यांनी समाज माध्यमांत केली आणि बघताबघता या त्यांच्या पोस्टने धुमाकूळ घातला. या पोस्टचा धागा पकडून अनेक नेटकर्‍यांनी त्यांना राजकीय आमंत्रणही दिले. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना त्यांनी शेअर केलेली पोस्ट आणि नेटकर्‍यांच्या त्यावरील प्रतिक्रिया सध्या संगमनेरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवून सामान्य माणसाच्या जीवनातील अंधार दूर सारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कडव्या शिस्तीतून आकाराला आलेल्या विविध सहकारी संस्थांनी गेल्या काही दशकांत साधलेली प्रगती आणि त्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या जीवनात झालेले बदल हे त्याचेच द्योतक आहे. तालुक्याच्या विकासात राजकारण आडवे येता कामा नये असा सहकारमहर्षींचा दंडक होता. त्यातूनच संगमनेरचे राजकारणही सुसंस्कृत घडले आणि फोफावलेही. आजही त्यांचा हाच दंडक संगमनेर तालुक्यात सर्वत्र तंतोतंत पाळला जातो यावरुन ही गोष्ट अधोरेखीत होते. सहकारी संस्थांचे जाळे निर्माण झाल्याने तालुक्यातील कष्टकरी, शेतकर्‍याच्या शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध झाली, शेतमालाच्या प्रक्रियेचे उद्योग सुरु झाल्याने त्यांची भरभराट होण्यासही हातभार लागला. नामदार बाळासाहेब थोरात यांनीही सहकारमहर्षींच्या पावलावरच पाऊल ठेवल्याने जिल्ह्याच्या नकाशावर संगमनेरची प्रगती आणि समृद्धी ठळकपणे दिसून येते.

संगमनेरात ज्याप्रमाणे सहकाराची मुहूर्तमेढ रोवण्यात सहकारमहर्षी आघाडीवर त्याप्रमाणेच येथील बाजारपेठ सक्षम करण्यासाठी, उद्योग-व्यवसायांना चालना मिळण्यासाठी अनेकांनी कसोशीने प्रयत्न केले. त्यात दिवंगत उद्योगपती ओंकारनाथजी मालपाणी यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मिसरी उद्योगातून व्यावसायिक सुरुवात करणार्‍या त्यांच्या परिवाराने त्यानंतरच्या कालावधीत तंबाखू व्यवसायात पाऊल ठेवले. विणकरांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या संगमनेर तालुक्यात त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली. कष्टकर्‍यांच्या हाताला काम मिळू लागल्याने सहकारासह उद्योग-व्यवसायानेही बाळसं धरण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राची निर्मिती झाली त्याचवर्षी संगमनेरातील दूरदृष्टीच्या संगमनेरातील काही मंडळींनी एकत्रित येवून शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली.

संगमनेर-अकोले तालुक्याचा चेहरा बदलणार्‍या या संस्थेच्या उभारणीसाठी शहरातील, तालुक्यातील अनेक दानशूर पुढे सरसावले. गोरगरीब, विडी कामगार, विणकर यांनीही यात खारीचा वाटा उचलला आणि या माध्यमातून संगमनेरात पहिले महाविद्यालय सुरु झाले. या संस्थेचे संस्थापक खजिनदार म्हणून दिवंगत ओंकारनाथ मालपाणी यांनी पारदर्शी कामाचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला. आपला उद्योग सांभाळत असतांना त्यांनी शहर आणि शहरातील नागरीक यांच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यातूनच उभारी घेवू पाहणार्‍या संगमनेरच्या बाजारपेठेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी त्यांनी 1966 साली संगमनेर मर्चंटस् बँकेची स्थापना केली. त्यांचा हा प्रयोग संगमनेरातील छोट्या व्यापार्‍यांना उभारी देणारा ठरला. नंतरच्या कालावधीत संगमनेरात शारदा शिक्षण संस्थेची स्थापना झाली व त्या माध्यमातून संगमनेरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा नवा अध्याय सुरु झाला.

1970 च्या दशकांत दिवंगत ओंकारनाथ मालपाणी यांची संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाली. अवघ्या दोन वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत त्यांनी आदर्श नगराध्यक्ष कसा असावा याचा वस्तुपाठच निर्माण केला. राजकीय पदं केवळ लोकसेवेसाठी असते, ते स्वीकारल्यानंतर त्याला पूर्ण न्याय देणं आवश्यक असल्याचे त्यांचे तत्त्व असल्याने या अल्पशा कालावधीत त्यांनी केलेली कामे आजही संगमनेरकरांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या त्याच कार्यकाळात 14 जानेवारी, 1964 रोजी संगमनेर कॉटेज रुग्णालयाच्या पश्चिम विभागाची इमारत कार्यान्वित झाली. या कार्यक्रमासाठी राज्याचे अल्पबचत व पुरवठा मंत्री होमी जे. तल्यारखान व तत्कालीन उपसहकार मंत्री बी. जे. खताळ पाटील उपस्थित होते.

त्यांच्या कार्यकाळात पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बाबुराव करपे, तर सदस्यपदी रशीदखान हमीदखान पठाण, दत्तात्रय भाऊराव पाथरवट, हरिश्चंद्र माधव दारोळे, वसंत भीमाशंकर सराफ, माधव विष्णू जंत्रे, शिवनारायण हिरालाल जाजू, शशीकुमार गंगाधर परशरामी, शिवनाथ बालकिसन पडताणी, शंकर गजाबा ताजणे, शेख जानमोहंमद दाऊद, मुरलीधर किसन डोंगरे, रामकिसन कन्हैय्यालाल खंडेलवाल, सुशीला नरसिंग जोशी, इंताजबी इस्माईल, कुसुमावली वसंत सराफ, वसंत बाळकृष्ण सराफ, जगन्नाथ नारायण दुधे, जानकीराम गंगाधर काजळे, किसन काशीनाथ मिसाळ, श्यामराव बाबुराव भंडारी, वसंत गणेश सराफ, आयुबखान सरदारखान पठाण, पांडूरंग विश्वनाथ गोडसे, माधव बाळाजी मंडलिक, शेख नूरमोहंमद शरफोद्दीन, सखाहरी मुरलीधर रणाते इत्यादी होते तर चिंतामण सदाशिव जोशी हे कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सदरचे बांधकाम नारायण रावजी काखरे यांनी पूर्ण केले होते.

संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण झाले त्यावेळी वरील सर्वांचे नाव असलेली फरशी तेथे बसविण्यात आली होती. उद्योजक मनीष मालपाणी यांनी त्याच फरशीचे छायाचित्र समाज माध्यमांतून शेअर करीत दिवंगत ओंकारनाथ मालपाणी यांच्यासह त्यावेळी त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या सदस्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला. सदरचे छायाचित्र समाज माध्यमांत झळकताच अनेकांनी ते इतर समूहात शेअर करण्यासह त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. काहींनी त्यावेळची पिढी ध्येय समोर ठेवून केवळ संगमनेरकरांसाठी काम करीत असल्याचे सांगितले, तर अनेकांनी तो काळ सुवर्ण असल्याचे नमूद केले. काहींनी त्यात आणखी माहितीची भर घातली, तर काहींनी आदर्शवत कार्य म्हणून त्या कालखंडाचा गौरवही केला.

मात्र मनीष मालपाणी यांनी शेअर केलेले ते छायाचित्र पालिका निवडणुका जाहीर होण्याच्या कालावधीत समोर आल्याने अनेकांनी त्यांनाच काकांच्या पथदर्शी मार्गावर चालून संगमनेरच्या विकासकामात सहभागी होण्याचे व निवडणुकांच्या माध्यमातून जनसेवा करण्याचे आमंत्रणही त्यांना देवून टाकले. अशा विविध संमिश्र प्रतिक्रिया सोबत घेवून त्यांनी पोस्ट केलेले ते छायाचित्र वेगवेगळ्या समाज समूहात सध्या धुमाकूळ घालत असून त्याद्वारे पालिका निवडणुकीचे वारेही गतिमान होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. वास्तविक दिवंगत उद्योगपती ओंकारनाथ मालपाणी यांनी त्या नंतरच्या निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या परिवारातील कोणीही पालिकेच्या राजकारणाकडे आजवर पाहिले नाही. मात्र, मनीष मालपाणी यांची ती पोस्ट आणि त्या माध्यमातून त्यावर पडत असलेला प्रतिक्रियांचा पाऊस बघता आता त्यांनीही नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासोबतीने शहर विकासाचा नवा मापदंड निर्माण करण्यासाठी राजकीय सक्रीय व्हावे अशीच अपेक्षा असंख्य नेटकर्‍यांकडून समोर आल्याचे बघायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *