सूनेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला! घारगावात पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न फसला

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. आज पहाटे (मंगळवार, ता.31) साडेतीन वाजेच्या सुमारास घारगाव येथील राजहंस दूध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष आहेर यांच्या बंगल्यात घुसून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सूनेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा माजी मंडलधिकारी दादापाटील आहेर यांच्याही प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र त्याही ठिकाणी चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, घारगाव येथील सुभाष आहेर यांच्या बंगल्याच्या पाठीमागील प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी स्वयंपाकगृहाच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला आणि आतमध्ये असलेल्या कपाटातील सामानाची उचकापाचक केली. त्यावेळी एका खोलीत राजेंद्र आहेर हे पत्नी व मुलीसह झोपलेले होते. त्याचवेळी चोरट्यांनी मागील बाजूने असलेल्या खिडकीतून एक मोठी काठी घालत त्यांच्या बेडरूमची कडी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी राजेंद्र आहेर यांची पत्नी दीपाली आहेर यांना जाग आल्याने त्यांनी ती काठी पाहिली आणि पतीला उठवले. ते क्षणार्धात जागे झाले आणि त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चोरट्यांनी इतर बेडरूमला बाहेरून कडी लावून घेतल्या होत्या. परंतु, आरडाओरड झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. कड्या उघडल्यानंतर घटनेची माहिती बंडू आहेर यांनी घारगाव पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

या प्रकारानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा माजी मंडलधिकारी दादापाटील आहेर यांच्या बंगल्याकडे वळविला. त्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि खिडकीतून कशाने तरी कडीकोयंडा तोडला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारी असलेल्या एका घराला बाहेरून कडी लावून घेतली. मात्र त्याही ठिकाणी चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला. काही दिवसांपूर्वीच चोरट्यांनी घारगाव शिवारातील कान्होरे मळा येथील विकास कोरडे यांचेही दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला होता. त्यानंतर आता पुन्हा चोरट्यांनी घारगावमध्ये धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी पठारभागाला चांगलेच लक्ष्य केले आहे. शेतीपंपांची चोरी, घारगाव बसस्थानकावरील दुकाने फोडून मोठा ऐवज लांबविला होता. आता पुन्हा चोर्‍यांचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीचा बंदोबस्त वाढवून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *