मल्चिंग पेपरवरील कांदा उत्पादनात दुप्पट वाढ! तांभोळ येथील सुशिक्षित शेतकरी बंधूंचा यशस्वी प्रयोग

महेश पगारे, अकोले
तालुक्यातील तांभोळ येथील एका प्रयोगशील शेतकर्‍याने सिंचनाच्या अपुर्‍या सुविधा असल्याने कांदा पिकासाठी नवीन तंत्रज्ञान वापरले होते. तब्बल साडेतीन एकर क्षेत्रावरील कांदा लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर केला होता. आता हा कांदा काढला असून, खुल्या क्षेत्रावरील कांद्याच्या तुलनेत ह्या प्रयोगातून उत्पादन वाढण्यासह उत्पादन खर्चही वाचला असल्याचा दावा शेतकर्‍याने केला आहे.

तांभोळ येथील उच्चशिक्षित प्रयोगशील शेतकरी प्रा. डॉ. विलास भांगरे व बंधू कैलास यांनी तब्बल साडेतीन एकरवर जानेवारी महिन्यात कांदा लागवड केली होती. परंतु, नैसर्गिक संकटे आणि सिंचनाची अपुरी सुविधा यावर मात करण्यासाठी त्यांनी संपूर्ण कांदा लागवड मल्चिंग पेपरवर केली. त्यासाठी साधारण 25 हजार रुपये खर्च आला.

सध्या कांद्याची काढणी सुरू असून, खुल्या क्षेत्रापेक्षा मल्चिंग पेपरवरील कांद्याच्या उत्पादनात दुप्पट वाढ झाली असल्याचा दावा शेतकर्‍यांनी केला आहे. यासोबतच एकसमार अंतरावर कांदा लागवड झाली असल्याने जोडकांदा तयार झाला नाही. खत, पाणी, मजुरी यात बचत झाली. जमीनही सजीव राहिली. त्यामुळे शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास नक्कीच फायदा होतो, असा विश्वास प्रयोगशील शेतकरी प्रा. डॉ. विलास व कैलास भांगरे यांनी व्यक्त केला आहे.

पाण्याचा मुबलक साठा सर्वच शेतकर्‍यांकडे असेल असे नाही. त्यामुळे कमी पाण्यावर कांदा पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी शेतकर्‍यांनी मल्चिंग पेपरचा वापर वाढवावा. भविष्यात या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची गरज आहे.
– वीरेंद्र थोरात (संचालक-विश्व हायटेक नर्सरी, वीरगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *