सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विरोधकांना शिवसेनेची साथ! निवडणुकीची गणितं बदलणारं?; शिवसेना आमदारांनी आळवला विरोधातला सूर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालिकेच्या महत्त्वकांक्षी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या प्रकल्पाविरोधात गेल्या दहा दिवसांपासून जोर्वेनाका परिसरात धुसफूस सुरु असताना नेतृत्त्वहीन असलेल्या या आंदोलनाला कलाटणी मिळाली आहे. शिवसंपर्क अभियानासाठी संगमनेरात आलेल्या शिवसेना संपर्कप्रमुख, आमदार सुनील शिंदे यांनी शनिवारी अचानक येथील नियोजित प्रकल्पस्थळाला भेट देत आंदोलकांच्या आवाजात आपलाही सूर मिसळल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात एकत्र सत्तेत असणार्‍या शिवसेनेची संगमनेरातील ही भूमिका अनेकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारी ठरली आहे. संगमनेरात मुस्लीम समाजाची संख्या जवळपास 28 टक्क्यांच्या आसपास असून आगामी पालिका निवडणुकीत या प्रकल्पावरुन घमासान होण्याची चिन्हे आहेत, त्यांच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठीच शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांनी हा फंडा वापरल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या मावळत्या सभागृहात एका स्वीकृतासह मुस्लीम समाजाचे आठ सदस्य असूनही आंदोलकांनी या मुद्द्यावर त्यांचे नेतृत्त्व डावलले आहे.

पुणे रस्त्यावरील जोर्वेनाका परिसरात पालिकेच्या मालकीचा दोन एकरचा भूखंड आहे. या भूखंडावर पालिकेने सुमारे शंभर कोटी रुपये खर्चाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नियोजित केला असून पोलीस बंदोबस्तात त्याचे प्राथमिक कामही सुरु करण्यात आले आहे. मात्र हा प्रकल्प येथे सुरु झाल्यास परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होवून आसपासच्या नागरी वसाहतींचे आरोग्य धोक्यात येईल असे सांगत परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध सुरु केला आहे. मात्र पालिकेनेही याच भूखंडावर हा प्रकल्प उभारण्याचा चंग बांधल्याने व त्यासाठी पोलीस बंदोबस्ताचा वापरही सुरु केल्याने येथील नागरीक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे पालिकेच्या मावळत्या सभागृहात मुस्लीमांचे प्रतिनिधीत्त्व करणारे एकूण आठ सदस्य आहेत. मुस्लीम समाजाच्या प्रत्येक प्रश्नात हे आठही नगरसेवक आजवर आघाडीवर असल्याचे चित्र असताना या आंदोलनात मात्र स्थानिकांनी त्यांच्या अपयशाचे खापर फोडीत त्यांचे नेतृत्त्व नाकारले आहे. त्यामुळे या आंदोलनाला शनिवारपर्यंत कोणताही राजकीय आधार नव्हता.


शिवसेनेने सध्या राज्याच्या विविध भागात शिवसंपर्क अभियान सुरु केले आहे. उत्तर नगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित संपर्कप्रमुख व वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे त्यासाठी शुक्रवारीच (ता.27) संगमनेरात दाखल झाले होते. शनिवारी (ता.28) दुपारी त्यांनी जोर्वेनाका परिसरातील नियोजित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेला भेट दिली, यावेळी तेथे धरणे आंदोलन करणार्‍या नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. आत्तापर्यंतच्या या आंदोलनात कोणत्याही राजकीय नेत्याची एन्ट्री नसताना आमदार शिंदे यांच्या माध्यमातून त्याला राजकीय किनार लाभली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नियोजित प्रकल्प अन्यत्र हलविण्याची व त्यासाठी मदत करण्याची गळ त्यांना घातली. इतक्या मोठ्या संख्येने जमलेला समुदाय आणि त्यातच आगामी काळात होऊ घातलेल्या पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार शिंदे यांना राजकीय फायदा दिसल्याने त्यांनीही फोनाफोनी करीत याबाबत आपण स्थानिकांसोबत असल्याची घोषणा करुन टाकली. यावेळी उपस्थितांमधील काहींनी राजकीय नेत्यांपासून शासकीय अधिकार्‍यांपर्यंत कोणीही आमची समस्या ऐकूण घेत नसल्याचे सांगत गेल्या दहा दिवसांपासून विरोधाची धुसफूस सुरु असूनही कोणीही साधी विचारणा करायला आले नसल्याची खंत बोलून दाखविली. त्यावर आमदार शिंदे यांनी व्हाया मातोश्री फोन करुन संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांना आंदोलनस्थळी पाचारण केले व त्यांना आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यास भाग पाडले.

यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करतांना आमदार शिंदे यांनी सांडपाणी प्रकीया प्रकल्प साधारणतः लोकवस्तीच्या बाहेरच असतो, शहराच्या अथवा लोकवस्तीच्या मध्यभागी असे प्रकल्प असल्याचे एकही उदाहरण नसल्याचे सांगत एकप्रकारे या आंदोलनाची धग वाढवण्यासाठी शाब्दिक इंधनाचा भरपूर पुरवठाही या माध्यमातून केला. यावेळी सदरचा सदरचा विषय आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सुरुवातीला शांत असलेला आंदोलनकर्त्यांचा समुदाय त्यांच्या या वक्तव्यानंतर अचानक घोषणाबाजी करु लागला. आता आमदार शिंदे यांच्या या भूमिकेनंतर पालिकेच्या नियोजित प्रकल्पाची जागा बदलेल की नाही हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार असले तरीही या आंदोलनातून त्यांनी आपली राजकीय पोळी भाजून संपर्कप्रमुख म्हणून नव्याने झालेली आपली निवड सार्थ ठरविण्याचा प्रयोग मात्र यशस्वी केल्याचे स्पष्ट चित्र यानिमित्ताने बघायला मिळाले.

पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जोर्वेनाका येथील हिच जागा योग्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या शहरातील अंतर्गत गटारांचे कामही त्याच भागात पाणी वाहून नेण्याच्या दृष्टीने केले जात आहे. जोर्वेनाका येथील प्रकल्पाची रचनाही पूर्णत्त्वास आली आहे. येथील मैदानाची साफसफाई करुन आवश्यक असलेली पृष्ठभूमीही तयार करण्यात आली आहे. याशिवाय पालिकेकडे सध्यातरी अन्य पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने पालिका प्रशासन याच जागेवर हा प्रकल्प उभारण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला कधी व कसे यश मिळेल, त्यासोबतच शिवसेनेने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सूत्र ठरलेले नसताना सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात जावून आंदोलकांची बाजू घेण्याची खेळी केल्याने संगमनेरात महाविकास आघाडीचे सूत्र जुळेल का? की आमदार शिंदे यांनी केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलकांची साथ केली आहे हे आगामी कालावधीत बघायला मिळणार आहे.

सध्या संगमनेर नगरपालिकेत 14 प्रभागातून नगराध्यक्षांसह 29 नगरसेवक निवडून गेलेले आहेत, तर तिघे स्वीकृत सदस्य आहेत. या 32 सदस्यांमध्ये मुस्लीमबहुल भागातून निवडून आलेल्या मुस्लीम समाजाच्या सात सदस्यांसह एक स्वीकृत असे एकूण आठ सदस्य आहेत. शहराच्या जवळपास 35 टक्के प्रभागांवर मुस्लीम मतांचा वरचष्मा आहे. असे असतानाही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आंदोलनात मात्र मुस्लीम नगरसेवकांचे नेतृत्त्व नाकारण्यात आले आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत मुस्लीमबहुल भागात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत असून शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी त्याचाच लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *