घारगावचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक पुन्हा एकदा चर्चेत! तक्रारदारालाच चोर ठरविण्याचा प्रकार; थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या कारकीर्दीपासून सातत्याने वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक सुनील पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी चोरीची फिर्याद घेवून आलेल्या तक्रारदारालाच संशयाच्या कठड्यात उभे करुन त्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार घडला असून संबंधिताने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत पो.नि.पाटील यांच्या मनमानी कारभाराविरोधात थेट मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांसह वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे संबंधित तक्रारदार व्यक्ती घारगाव परिसरातील प्रतिष्ठांमध्ये गणली जाणारी असून भारत सरकारच्या करदात्यांच्या यादीतील आहेत. पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत घारगावच्या कान्होरे मळा परिसरात राहणार्‍या विकास नानाभाऊ कोरडे यांनी नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना लेखी तक्रार पाठविली असून त्याच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते व अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनाही पाठविण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या वादग्रस्त कारकीर्दीचा या तक्रारीत पाढाच वाचण्यात आला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास अहमदनगर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार घारगावच्या कान्होरे मळ्यातील त्यांच्या राहत्या घराचा पत्रा उचकटून गेल्या 21 मे रोजी चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सामानाची उचकापाचक करीत कपाटात ठेवलेले 30 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 25 तोळ्यांचे चांदीचे दागिने व व्यापार्‍याला देण्यासाठी घरात ठेवलेली 1 लाख 65 हजार रुपयांची रोख रक्कम असा लाखों रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. सदरची घटना लक्षात आल्यानंतर दुसर्‍या दिवशी (22 मे) त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी अतिशय अपमानास्पद आणि हीन दर्जाची वागणूक दिली.

यावेळी पो.नि.पाटील यांनी तक्रारदार कोरडे यांनाच संशयाच्या कठड्यात उभे करुन त्यांची उलटतपासणी करण्यास सुरुवात केली. ‘तुझ्याच घरच्यांनी तुझ्या घरात चोरी केली, आणि तू चोरीचा बनाव घेवून येथे आलास का?’ असे अतिशय उद्धट सवाल करीत त्यांनी तक्रारदारालाच तुरुंगात डांबण्याची तंबीही भरली. प्रत्यक्षात तक्रारदार घरातून गेलेला ऐवज ओरडून ओरडून सांगत असतानाही पो.नि.पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत इतक्या मोठ्या प्रमाणात दागिन्यांची आणि रोख रकमेची चोरी झालेली असताना केवळ 19 तोळे सोन्याच्या, 14 तोळे चांदीच्या दागिन्यांसह अवघी 30 हजारांची रोकड चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवून घेतली. त्यांची ही भूमिका चोरट्यांचे मनोबल वाढवणारी तर तक्रारदाराचे मानसिक खच्चीकरण करणारी असल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावरही कहर म्हणजे चोरी झालेल्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तक्रारदार विकास कोरडे यांना दमबाजी करीत चोरट्यांनी ऐवज शोधतांना अस्ताव्यस्त फेकलेले सामान व कपडे आवरुन ठेवण्यास सांगितले व त्यानंतरच श्वान पथकाला पाचारण केले, त्यामुळे त्यांच्या कृतीचा तक्रारदाराच्या मनात संशय निर्माण झाला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातून बदली झाल्यानंतर घारगावचा पदभार स्वीकारल्यापासून तेथील गुन्हेगारी घटनांचा स्तर उंचावल्याचेही यात नमूद केले आहे.

यापूर्वी पो.नि.पाटील यांच्या येथील कारकीर्दीत संपूर्ण घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असंख्य चोर्‍या झाल्या असून त्यातील एकाही घटनेचा तपास लावण्यात त्यांना यश आलेले नाही. वाढत्या चोरीच्या घटनांबाबत नाराज झालेल्या ग्रामस्थांनी गावबंद ठेवून निषेधही नोंदविल्याचा दाखला या तक्रारीतून देण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांच्या मनमानी कारभाराबाबत वरीष्ठ पातळीवर तक्रारी दाखल झालेल्या असून पाटील यांचा घारगावातील आत्तापर्यंतचा संपूर्ण कार्यकाळ अतिशय वादग्रस्त, तक्रारदारांना धमकावणारा व गुन्हेगारांना पाठबळ देणारा ठरल्याचा गंभीर आरोपही विकास कोरडे यांनी या तक्रारीतून केला आहे. या प्रकरणात विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जातीने लक्ष घालून योग्य तो तपास करावा व पो.नि.पाटील यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा 20 जूनरोजी आपण अहमदनगर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांच्या या तक्रारीची वरीष्ठ पातळीवरुन कशा पद्धतीने दखल घेतली जाते याकडे आता पठारभागाचे लक्ष लागले आहे.


पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासूनच ते सतत वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या येथील आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत चोर्‍या, घरफोड्या, मंदिरातील दानपेट्या पळविण्याचे प्रकार वारंवार घडले असून यातील एकाही घटनेचा शोध लावण्यात आजवर त्यांना यश आलेले नाही. पठारभागातून वाहणार्‍या मुळा नदीपात्रातून होणार्‍या वाळू तस्करीलाही त्यांचे पाठबळ असल्याचे आरोप यापूर्वी सातत्याने त्यांच्यावर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता वरीष्ठ अधिकार्‍यांच्या भूमिकेकडे घारगावसह संपूर्ण पठाराचे लक्ष्य खिळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *