‘मस्जिद तुझ्या बापाची आहे का’ असे म्हणत एकास बेदम मारहाण!  महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे नाक्यावर घडला प्रकार; दोघांविरोधात गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुस्लिम धर्मीयांचा पवित्र समजला जाणारा रमजानचा महिना अंतिम टप्प्यात असताना शहराच्या दक्षिणेकडील पुना नाका परिसरातून मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. ‘मस्जिद तुझ्या बापाची आहे का; तुला वाटेल तेव्हा तू नमाजाची वेळ का ठेवतो?’ असे म्हणत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकास लोखंडे टामी आणि चाकूने मारहाण करीत जखमी केले. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेची नोंद आज मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार या घटनेतील फिर्यादी मोसिन नासिरखान पठाण (वय 40, रा. नाईकवाडपुरा) हे पुणे नाक्यावरील एका मोबाईल शॉपीमध्ये असताना शनिवारी (ता. 30) दुपारी सव्वादोनच्या सुमारास सदरची घटना घडली. यावेळी बुलेट मोटरसायकल वरून आलेल्या साजीद मेहमूद शेख (रा.रहेमतनगर) व मजहर मेहबूब पठाण (रा.कब्रस्थान जवळ, नाईकवाडपुरा) या दोघांनी फिर्यादीस दमबाजी करीत ‘मस्जिद तुझ्या बापाची आहे का; तुला वाटेल त्या वेळेला तू नमाजाच्या वेळा कशा ठरवतो?’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
मोसिन पठाण यांनी या दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनीही आपल्याकडील लोखंडी टामी व चाकूने त्यांना मारहाण करीत जखमी केले. या मारहाणीत पठाण यांच्या हाताला व डोक्याला दुखापती झाल्या आहेत. त्यानंतर आसपासच्या नागरिकांनी मध्यस्थी केली व जखमी झालेल्या पठाण यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जवाब नोंदविला, त्यानुसार वरील दोन्ही आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे दोनच दिवसांवर रमजान ईदचा वर्षातील सर्वात मोठा सणही येवून ठेपला आहे. उपवासाचा महिना असल्याने मोसिन पठाण हे दुपारच्या वेळी पुणे नाक्यावरील एका मोबाईल शॉपी मध्ये ईश्वराचे स्मरण करीत बसलेले असताना सदरचा प्रकार घडला आहे. त्यामुळे नाईकवाडपुरा परिसरात एकच खळबळ उडाली असून रमजानच्या महिन्यात मारहाणी सारखे प्रकार घडायला नको होते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *