महाराष्ट्र दिनी दुर्गप्रेमींसाठी खास मेजवाणीचे आयोजन! दुर्गभ्रमंतीकार गो.नी.दांडेकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राला पराक्रमाचा मोठा वारसा लाभला आहे. चारशे वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कणखर कातळात शिवाजी नावाचा पराक्रम जन्माला आला आणि त्यांच्या अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण हिंदुस्थानाने स्वातंत्र्याची ज्योत प्रज्ज्वलीत होतांना पाहीली. दक्षिण-उत्तर पसरलेल्या सह्याद्रीच्या अथांग रांगेतील असंख्य गडकोटांची डागडूजी करीत आणि अनेक किल्ले नव्याने बांधीत स्वराज्य निर्मात्या छत्रपती शिवरायांनी एकाचवेळी पाच-पाच बलाढ्य शत्रूंना झुंज दिली. राज्याचा गौरव असलेले हे गडकोट आजही त्यांच्या अतूल्य पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. स्वराज्य निर्मितीचा हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी हजारों शिवप्रेमी या गडकोटांच्या अवघड वाटा धुंडाळीत असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे गो.नी.दांडेकर. तब्बल पन्नास वर्ष गडकोटांवर फिरणार्‍या गोनीदांचा जीवनप्रवास जाणून घेणं म्हणजे साक्षात महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाची अनुभूती मिळवण्यासारखं आहे. अहमदनगर डिस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग व शहरातील दुर्गप्रेमींनी ही संधी संगमनेरकरांना उपलब्ध करुन दिली आहे. प्रत्येकाने एकदा पहावाच असा हा माहितीपट रविवारी (ता.1) सायंकाळी सात वाजता संगमनेरात दाखवला जाणार आहे.


गो.नी.दांडेकर यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या 12 व्या वर्षी गोनीदांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी घरातून पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेत असतांना शाळाही सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्याही सहवासात आले. त्यांच्या विचारांचा त्यांच्यावर इतका पगडा बसला की पुढे काही वर्ष ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले. गोनीदांनी वेदान्ताचाही अभ्यास केला. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले. 1947 मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला आणि पुढील आयुष्यात त्यांनी कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक व पौराणिक विषयांवर विपूल लेखन केले.


गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे रेखाटली. त्यांपैकी निवडक अशा 115 कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तकही ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण ’दुर्गदर्शन’, ’दुर्गभ्रमणगाथा’ या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यातल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. ‘किल्ले’ हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’, ‘रानभुली’, ‘त्या तिथे रुखातळी’, ‘वाघरू’ आणि ‘माचीवरला बुधा’ या त्यांच्या कादंबर्‍यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे.


गोनीदांच्या विपूल लेखनातून असंख्य वाचकांना दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्रातील दुर्गभ्रमंतीला नवी दिशाही प्राप्त झाली. किल्ल्यांवरील त्यांच्या स्फूर्तीदायी लेखनामुळे त्या काळात अनेकांना दुर्गभ्रमंतीचा छंदही जडला. गोनीदा फक्त किल्ल्यांवर हिंडले नाहीत, तर त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवले. गोनीदांचे हेच दुर्गसंस्कार आजच्या पिढीवर व्हावेत आणि गड-किल्ले मौजमस्तीची ठिकाणं नसून ती महाराष्ट्राच्या पराक्रमाची स्फूर्तीस्थाने आहेत हा भावना मनामनात रुजावी या उद्देशाने त्यांच्या जीवनावर आधारित ‘किल्ले पाहिलेला माणूस’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.


अखिल भारतीय गिर्यारोहण महासंघाने या माहितीपटाची निर्मिती केली असून महाराष्ट्र दिनी (1 मे) सायंकाळी 7 वाजता संगमनेरातील व्यापारी असोसिएशनच्या सभागृहात या माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांने आवर्जुन पहावं आणि आपल्या मुलांनाही दाखवावं असे हे दुर्मीळ प्रदर्शन पाहण्याची संधी या निमित्ताने संगमनेरकरांना मिळणार आहे. या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन संगमनेरचे दुर्गमित्र श्रीकांत कासट व सौरभ म्हाळस यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *