संगमनेरच्या शांतता समितीची बैठक ‘फ्लोप’! विविध गुन्हे व 149 च्या नोटीसांचा परिणाम; पोलीस अधीक्षकांनाही माघारी फिरावे लागले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी रमजान ईद व अक्षयतृतीया या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून बोलावण्यात आलेली शांतता समितीची बैठक संगमनेरात ‘फ्लॉप’ ठरली. या बैठकीसाठी खुद्द पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित झाले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी निरोप पाठवूनही निमंत्रितांनी या बैठकीवर बहिष्कार घातल्याने संगमनेरच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच शांतता समितीची बैठक अधिकार्‍यांना अशांत करणारी ठरली. त्यामुळे पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षकांनाही सभागृहाकडे पाठ फिरवून बैठकीविनाच मुख्यालयाकडे परतावे लागले. मागील कालावधीत मुस्लिम समाजातील तरुणांवर दाखल झालेले विविध गुन्हे व पोलिसांनी बजावलेल्या सीआरपीसी 149 च्या नोटीसांमुळे पोलिसांवर ही नामुष्की ओढावल्याचे यानिमित्ताने समोर आले.


येत्या 3 मे रोजी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान ईदसह हिंदू धर्मियांचा अक्षयतृतीयाचा सण एकाच दिवशी येत आहे. त्यातच सध्या भोंग्यांवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असल्याने प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही सणांच्या अनुषंगाने शहरातील जातीय सलोखा कायम रहावा व दोन्ही धर्मियांनी आपापले उत्सव आनंदाने व शांततेत साजरे करावेत यासाठी पोलीस प्रशासनाने आज (ता.29) दुपारी चार वाजता प्रशासकीय भवनाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.


या बैठकीसाठी शहर पोलीस निरीक्षकांच्यावतीने सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पत्रकारांना निमंत्रण धाडण्यात आले होते. जिल्ह्याचे पोलीसप्रमुख मनोज पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीसाठी प्रशासकीय भवनात दाखल झाले होते. मात्र बैठकीची नियोजीत वेळ उलटूनही निमंत्रितांपैकी अपवाद वगळता बहुतेकांना पाठ फिरवल्याने वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या दालनात तिष्ठत बसण्याची वेळ आली.


अखेर साडेचार वाजण्याच्या सुमारास अंतिम आढावा घेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील मुख्यालयाच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या पाठोपाठ श्रीरामपूरच्या अप्पर अधीक्षक स्वाती भोरही माघारी फिरल्या. सदरच्या बैठकीसाठी ठरल्यावेळी मोजक्या कार्यकर्त्यांसह काही पत्रकार वगळता कोणीही हजर झाले नाही. त्यामुळे संगमनेरच्या उत्सवांच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच पोलिसांनी आयोजित केलेली शांतता समितीची बैठक न होताच समाप्त झाली.


याबाबत मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता गेल्या 14 एप्रिलरोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी निघालेल्या मिरवणूकीत घडलेला प्रकार व त्यानंतर पोलिसांनी दाखल केलेले गंभीर गुन्हे, आरोपींच्या धरपकडीसाठी ऐन रमजानच्या पवित्र महिन्यात एकामागून एक छापे आणि त्यामुळे तरुणांवर घर सोडून राहण्याची आलेली वेळ, त्यातच सध्याच्या वातावरणाला अनुषंगून पोलिसांनी दोन्ही समाजाच्या पन्नासहून अधिक जणांना सीआरपीसीच्या 149 अन्वये बजावलेल्या नोटीसा, तसेच सीआरपीसीच्या 107 नुसार केलेल्या कारवायांमुळे या बैठकीवर मुस्लिम समाजाने बहिष्कार घातल्याची चर्चा कानी आली. त्यामुळे संगमनेरची शांतता समितीची बैठक न होताच संपली, मात्र या प्रसंगाने अधिकारी मात्र अशांत झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *