शोभायात्रेतील ‘धुडगूस’ प्रकरणात आणखी दोघांना अटक! आत्तापर्यंत आठजण कारागृहात; 48 आरोपींची पटविली ओळख..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शोभायात्रेत अनाधिकाराने घुसखोरी करुन तणाव निर्माण करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. गेल्या 14 एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्ष धुडगूस घालणार्‍या 48 जणांची नावे निष्पन्न केली असून आत्तापर्यंत त्यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघांना गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली असून सध्या त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दैनिक नायकशी बोलताना दिली.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी सायंकाळी संगमनेरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. रात्री आठच्या सुमारास ही शोभायात्रा मेनरोडवरील श्रीकृष्ण मंदिरासमोरुन जात असताना अचानक आसपासच्या बोळांमधून शंभर ते सव्वाशे मुस्लिम तरुणांनी या शोभायात्रेत घुसखोरी केली आणि काही वेळातच हाता धार्मिक झेंडे घेवून धार्मिक उन्माद करण्यास सुरुवात केली. या दरम्यान घुसखोर तरुणांच्या एका टोळक्याने ‘अल्ला हू अकबर’ व ‘इस्लाम जिंदाबाद’ सारख्या घोषणा देण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

मेनरोडवर एका हिंदुत्त्ववादी संघटनेने या शोभायात्रेच्या स्वागतासाठी मंच उभारला होता. तेथपर्यंत येईस्तोवर या तरुणांच्या धार्मिक उन्मादाला अधिक ऊत आला. घटनाकारांच्या प्रतिमेची शोभायात्रा असल्याचे माहिती असूनही त्यातील काहींनी अतिशय अश्लील आणि बिभत्स नृत्य करुन महामानवाच्या प्रतिमेचा अवमान करण्यासह शोभायात्रेत सहभागी महिलांची छेडछाडही केली. त्यामुळे मेनरोडवर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होवून स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलीस उपअधीक्षक राहुल मदने आणि पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
याप्रकरणी पोलिसांनी विनोद चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन सोळा निष्पन्न नावांसह अज्ञात शंभर ते सव्वाशे जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करुन त्याच दिवशी रात्री धाडसत्र राबविण्यास सुरुवात केली. या दरम्यान पोलिसांनी शोभायात्रेच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजसह काहींनी मोबाईलद्वारे केलेल्या छायाचित्रणाच्या आधारे मिरवणुकीत घुसखोरी करणार्‍या नेमक्या टवाळखोरांची ओळख पटविण्यास सुरुवात केली. त्यातून एकूण घुसखोरांपैकी 48 जणांना रेखांकीत करण्यात आले असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरु आहे.

गेल्या पंधरा दिवसांत यातील सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे, दंगल घडविणे, महिलांचा विनयभंग करणे व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हे दाखल झाल्याने धुडगूस घालणारे बहुतेक आरोपी घटनेच्या दिवसापासूनच पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तालुक्यातील विविध ठिकाणांसह मुंबई, औरंगाबाद व मालेगावमध्येही छापेमारी केली, मात्र त्यातून अवघे सहाजण ताब्यात आले आहेत. गुरुवारी पहाटेही पोलिसांनी पसार आरोपींची माहिती काढीत छापेमारी केली, त्यात अल्तमेश जावेद शेख (वय 19) व उबेद जावेद शेख (वय 20, दोघेही रा.निंभाळे, ता.संगमनेर) यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला शंभर ते सव्वाशे जणांवर गुन्हे दाखल केले असले तरीही सरसकट सर्वांवर कारवाई न करता मिरवणुकीत घुसखोरी करुन धुडगूस घालणार्‍यांवरच अटकेची कारवाई होणार आहे. त्यासाठी पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने मिरवणूक मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज व या दरम्यान काहींनी मोबाईलमध्ये केलेल्या छायाचित्रणाचा आधार करुन धुडगूस घालणार्‍या एकूण 48 जणांची ओळख पटविली असून त्यातील आठ जणांना आत्तापर्यंत कारागृहात टाकण्यात आले आहे, उर्वरीत चाळीस जणांचाही पोलिसांकडून कसून शोध सुरु असून त्यासाठी एकामागून एक छापे घातले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *