महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर करण्याचे भाजपचा जाणीवपूर्वक प्रयत्न! महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माध्यमांशी संवाद साधताना टीका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविकास आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले काम करत आहे. नुकतेच रिझर्व्ह बँकेच्या अहवालातही चांगली अर्थव्यवस्था सांभाळणारे व कामकाज करणारे सरकार म्हणून महाराष्ट्राचा गौरव झाला आहे. मात्र धार्मिकतेच्या नावावर सातत्याने संभ्रम निर्माण करणे, सरकारला काम करू न देणे असा जाणीवपूर्वक प्रयत्न भाजप करत असून महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संगमनेरमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नामदार थोरात म्हणाले, हनुमान चालीसा, भोंगे या विषयावरून काही प्रवृत्ती महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याचे पालन करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कोणी कितीही भोंगे वाजवले तरी राज्यघटनेचा समतेचा भोंगाच जास्त वाजणार आहे. भाजपाला नैराश्य आले असून अनेक दिवस ते तारखा देत आहेत. या सर्व त्यांच्या तारखा खोट्या ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. सरकार अत्यंत चांगले काम करत असून विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात चांगल्या कामामुळे महाराष्ट्र सरकार अग्रक्रमावर आहे.

कोरोना संकट, नैसर्गिक चक्रीवादळे अशातून ही अर्थव्यवस्था भक्कमपणे सावरली आहे. मात्र काही लोकांना सवंग प्रसिद्धी हवी असते आणि मग ते असे उद्योग करतात. त्यांनी कसेही वागावे आणि त्यांनी मोकळीक द्यावे असे नाही. मग पोलीस पोलिसांचे काम करतात असे सांगताना महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेकरीता अत्यंत चांगले काम करत आहे. नैराश्यातून गोंधळ घालणार्‍या या प्रवृत्तींना महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवेल असेही नामदार थोरात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *