इतिहास घडला; ध्वज फडकविण्याचा मानही महिलेनेच मिळविला! या उत्सवातून प्रेरणा घेवून देशाच्या विकासात सहभाग द्या : डॉ.पवार; हा उत्सव म्हणजे मातृशक्तीचा अविष्कार : चित्रा वाघ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या परंपरेला महिलांच्या पराक्रमाची किनार लाभलेल्या संगमनेरच्या हनुमान जयंती रथोत्सवाच्या इतिहासात तब्बत 93 वर्षांनंतर आज आणखी एका प्रसंगाची नोंद झाली. 1929 सालच्या संघर्षानंतर प्रथमच पोलीस प्रशासनाकडून वाजतगाजत येणारा मानाचा ध्वज आज एका महिला पोलीस अधिकार्‍याने आपल्या खांद्यावरुन मिरवित आणला. इतिहासात यापूर्वी एखाद्या महिला अधिकार्‍याच्या हस्ते प्रशासनाकडून कधीही ध्वज आलेला नाही. विशेष म्हणजे हा ध्वज जेव्हा वाजतगाजत चंद्रशेखर चौकात आला त्यावेळी या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी मंचावर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह राजकारणात कर्तृत्त्व गाजवणार्‍या महिला उपस्थित होत्या. अर्थात गोवंश कत्तलखान्यांबाबत गंभीर आरोप करीत शहराच्या दोन्ही वरीष्ठ अधिकार्‍यांना विरोध झाल्याने दुय्यम दर्जाच्या पोलीस अधिकारी निकीता महाले यांना पोलीस दलासह हा ध्वज घेवून पाठविण्यात आले होते, त्यातून आज हा इतिहास घडला.

सालाबादप्रमाणे आज सकाळी सूर्योदयाच्या समयी महाबली हनुमानाचा जन्मोत्सव देशभर साजरा झाला. संगमनेरातील विविध मंदिरांसह चंद्रशेखर चौकातील प्राचीन मारुती मंदिरातही हा सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा झाला. मोठे मारुती या नावाने ओळखल्या जाणार्‍या येथील या मंदिरातील हनुमान जन्मोत्सवाला मोठा इतिहास आहे. शहराचे ग्रामदैवत म्हणूनही या देवालयावर संगमनेरकरांची मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे येथील जन्म सोहळ्याच्या वेळेपासून या मंदिरात भाविकांची गर्दी दाटलेली असते. तब्बल दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यावर्षी भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. त्यामुळे भाविकांचा अलोट उत्साह देखील या निमित्ताने बघायला मिळाला. येथील जन्मोत्सवाला प्राचीन परंपरा तर त्यानंतर निघणार्‍या रथोत्सवाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याचे साक्षीदार होण्यासाठी आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्या चित्रा वाघ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे व अकोल्याच्या प्रथम महिला नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी या राजकारणातील कर्तृत्त्ववान महिला उपस्थित होत्या. त्यांच्या साक्षीत आज पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांनी पोलीस प्रशासनाकडून गेल्या 93 वर्षांपासून रथावर चढवला जाणारा मानाचा ध्वज वाजतगाजत आणला. त्यांच्याच हाताने तो रथवर चढवून रथात विराजमान मारुतीरायाच्या चलप्रतिमेची आरती करण्यात आली. त्यानंतर अधिकृतपणे या रथोत्सवाला सुरुवात झाली.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, संगमनेरच्या हनुमान रथाचा वारसा मातृशक्तीचे दर्शन घडविणारा आहे. बल, शक्ती, बुद्धी आणि भक्तीचा संगम असलेल्या प्रभु श्रीराम व हनुमान यांच्या चरित्रातून प्रेरणा घेवून येथील मातृशक्तीने आगळावेगळा इतिहास घडविला आहे. आज संगमनेरातील महिलांची चौथी पिढी ही परंपरा पुढे नेत असल्याचे सांगतांना डॉ. पवार यांनी महिलांच्या पराक्रमातून घडलेल्या इतिहासातून प्रेरणा घेवून पन्नास टक्के संख्या असलेल्या महिलांनी देशाच्या विकासातही योगदान देण्याचे आवाहन केले. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी, लक्ष्मीबाई यांच्यापासून ते अगदी अंतराळवीर कल्पना चावला पर्यंतच्या महिलांनी मातृशक्तीच्या प्रेरणेतूनच इतिहास घडविला, त्यांचा वारसा आपण आजही भक्तिभावाने जोपासत आहात ही ऐतिहासिक बाब आहे. आजच्या या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होवून आपण खुप आनंदीत असल्याचेही डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या चित्रा वाघ यांनीही हनुमान रथोत्सवाच्या इतिहासाचा ऊहापोह करुन या परंपरेत सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याचे सांगितले. झुंबराबाई अवसक, लीला पिंगळे, बंकाबाई परदेशी यांच्यासह शेकडों महिलांनी घडविलेला इतिहास आज प्रत्यक्ष अनुभवतांना आज परमोच्च समाधान मिळाले. आजचा हा क्षण आयुष्यातील सर्वात मोठा आहे.

देशातील सर्वधर्मीयांना आपल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे. या अधिकारांमध्ये बाधा आणल्यास त्याचा प्रतिकार होतो हे संगमनेरच्या महिलांनी 93 वर्षांपूर्वी दाखवून दिले. त्यावेळी घडलेल्या इतिहासाचे प्रतिबिंब आजही या उत्सवातून कायम आहेत. मातृशक्तीचा अविष्कार असलेला हनुमानरायाचा हा रथोत्सव दरवर्षी असाच आनंदाने साजरा व्हावा, यातून प्रेरणा घेवून देशभरातील महिलांनी देशाच्या विकासात हातभार लावावा अशी अपेक्षा वाघ यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी तर आभार अक्षय थोरात यांनी मानले. यानंतर सुरु झालेल्या रथोत्सवाचे मिरवणूक मार्गावरील घराघरातील सुवासिनींनी ओवाळून तर पुरुषांनी रथाच्या चाकावर नारळ वाढवून शोभायात्रेचे स्वागत केले. वर्षभरात जन्माला आलेल्या किंवा पाच वर्षांपेक्षा छोट्या मुलांना रथात विराजमान मारुतीरायाच्या चलमूर्तीसमोर नतमस्तक करण्याचीही संगमनेरची परंपरा आहे. त्याचेही चित्र आज मोठ्या प्रमाणात दिसले. मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी खिचडी, उपमा, शरबत व पाण्याची सोय करण्यात आली होती. यात काही खासगी व्यक्ती व काही तरुण मंडळांचा सहभाग होता. पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस कर्मचार्‍यांनी रथोत्सवाची ही मिरवणूक निर्विघ्न पार पाडली.

‘त्या’ दोन्ही अधिकार्‍यांनी दाखवली पाठ..!
भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून पोलीस प्रशासनाकडून येणारा मानाचा ध्वज गोवंश कत्तलीच्या पैशात हात माखलेल्या अधिकार्‍यांच्या हस्ते पाठवू नये अशी भूमिका मांडली. त्यावर बराच गोंधळ झाल्यानंतर उत्सव समितीने उत्सवाची परवानगी आणि ध्वजाची परंपरा सांगणारे पत्र दिले. त्यामुळे हा विरोध वैयक्तिक असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यापैकी कोणी येईल की, अधीक्षक अन्य ठाण्याच्या अधिकार्‍यांना सांगतील असा संभ्रम तयार झाला. पोलीस अधीक्षकांनी या दोन्ही अधिकार्‍यांना ‘जावूच’ नये अशा आदेश दिल्याची माहीती दैनिक नायकला मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी महिला पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांना पाठविण्यात आले. विशेष म्हणजे अधीक्षकांनी केवळ ध्वज नेण्यास मनाई केलेली असतांनाही हे दोन्ही अधिकारी संपूर्ण रथोत्सवादरम्यान त्याकडे फिरकलेही नाहीत. उपनिरीक्षक महालेच रथोत्सवाच्या बंदोबस्तात वरीष्ठ अधिकारी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *