मद्यपी मुलाने वडीलांच्या डोक्यात कुकर मारुन घरही पेटविले रांजणखोल येथील घटना; श्रीरामपूर शहर पोलिसांत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहाता
जेवणाच्या वादातून मद्यपी मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात कुकर मारून त्यांना जखमी केले. कुटुंबीय त्यांना उपचारांसाठी दवाखान्यात घेऊन गेले असता इकडे मुलाने घराला आग लावून दिली. दारूच्या नशेत मुलाने केलेल्या या कृत्यामुळे वडील जखमी झालेच, शिवाय घरही जळून खाक झाले आहे.

रांजणखोल (ता. राहाता) येथे गुरुवारी (ता.31) ही घटना घडली. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रईस पठाण असे त्या मुलाचे नाव असून त्याचे वडील शेरखान नबाबखान पठाण डोक्यात कुकर लागल्याने जखमी झाले आहेत. रांजणखोल गावात पठाण आपल्या कुटुंबासमवेत राहतात. गुरुवारी ते जेवण करुन घरात बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा रईस पठाण दारू पिऊन घरात आला. त्याच्या आधी बाकीच्यांचे जेवण झाले होते. त्यामुळे जेवणाच्या कारणावरून त्याने वाद घालायला सुरवात केली. त्यावेळी त्याचे वडील शेरखान हे त्यास समजावून सांगत होते. मात्र आधीच नशा त्यात राग आल्याने त्याने तेथील कुकर उचलून आपल्या वडिलांच्या डोक्यात मारला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले.

घरातील सर्वजण त्यांच्यासोबत गेले, तेव्हा मुलगा रईस एकटाच घरी होता. त्याने रागातून आपलेच घर पेटवून दिले. आग लागल्याचे पाहून शेजारी नागरिक मदतीला धावले. मुलगा पळून गेला. या आगात पठाण कुटुंबाचे घर जळून खाक झाले. शेवटी शेरखान बाबरखान पठाण यांनीच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आपल्या मुलाविरूद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रईस शेरखान पठाण याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *