चोरट्यांची लालतारा सोसायटीतील महिलांवर दहशत! दगड-गोट्यांसह हल्ला करीत विनयभंग; दहा जणांवर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘एकतर चोर अन् वरती शिरजोर’ अशा मराठीतील म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव शहरातील कामगारांची वसाहत असलेल्या लालतारा सोसायटीने बुधवारी घेतला. वसाहतीत चोर्‍या करतांना काहींनी पाहील्याने आपली तक्रार केली जावू नये यासाठी चोरट्यांनी हे कृत्य केले. यासाठी सात निष्पन्न आरोपींसह दहा जणांनी बुधवारी सकाळी या वसाहतीत जावून महिलांना दमबाजी करीत मारहाण केली, यावेळी विचारणा करणार्‍या दोघींच्या गळ्यातील मंगळसूत्रही या चोरट्यांनी ओरबाडून घेतले. यातील फिर्यादी महिलेच्या पतीची दुचाकीही चोरट्यांनी दगड घालून फोडली व सदर महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबतच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी एकूण दहा जणांविरोधात दरोड्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यातील पाच जणांना अटक केली आहे, पकडलेल्या आरोपीतील एकजण अल्पवयीन आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना बुधवारी (ता.30) सकाळच्या सुमारास पालिकेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कामगारांच्या लालतारा वसाहतीत घडली. या प्रकरणातील फिर्यादी महिलेसह काहींनी सदरील चोरट्यांना वसाहतीत चोरी करताना बघितले होते. त्याची कोठेही वाच्यता होवू नये व त्यातून आपल्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल होवू नये यासाठी याच परिसरात राहणार्‍या आणि नावे निष्पन्न असलेल्या सात जणांसह एकूण दहा जणांनी हा प्रकार केला. ज्यावेळी हे चोरटे लालतारा वसाहतीत शिरले तेव्हा चोरीच्या प्रकरणातील साक्षीदार असलेली महिला आपल्या घराच्या अंगणात धुणे धूत होती.

यावेळी चोरट्यांनी हातात काठ्या, लोखंडी रॉड, दगडं व गलोल घेवून वसाहतीत दहशत निर्माण करीत एका दुचाकीवर दगड घालून ती फोडली. वसाहतीत राहणार्‍या बहुतेक सर्वांनाच हे चोरटे शिवीगाळ करीत धुडगूस घालीत होते. याचा जाब विचारणार्‍या महिलेला यातील तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून घेतले. यावेळी परिसरातील महिला व अन्य माणसंही तेथे जमा झाली. त्यातील एका महिलेने पुढे होवून सुरु असलेले वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता या चोरट्यांनी त्यांच्याही गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले व महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्यही केले.

या प्रकाराने लालतारा वसाहतीत मोठी दहशत निर्माण झाली होती. या दरम्यान याच वसाहतीत राहणार्‍या एकाने पोलीस ठाण्यात फोन करुन याबाबतची माहिती दिली. त्यानुसार काही वेळातच पोलिसांचे वाहन वसाहतीत पोहोचल्याने सदरील चोरट्यांनी घराबाहेर जमा झालेल्या नागरीकांच्या दिशेने गलोलने दगडं फेकीत तेथून पळ काढला. याबाबत सायंकाळी सदरील महिलेच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आरोपी सर्फराज राजू शेख, अमर मच्छिंद्र गोपाळे, राहुल भरत सोनवणे, संतोष दशरथ जेडगुले, अखिल भाऊसाहेब लोखंडे, आदित्य संपत सूर्यवंशी व एक अल्पवयीन आरोपी अशा सात निष्पन्न आरोपींसह अन्य तिघांवर दरोडा घातल्या प्रकरणी भा.द.वी.कलम 395 सह महिलांचा विनयभंग केल्याच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल करुन यातील पाच जणांना अटक केली आहे. यातील अल्पवयीन आरोपीला अहमदनगरच्या बाल न्यायालयात पाठविण्यात आले असून आदित्य संपत सूर्यवंशी पसार झाला आहे.

गेल्या काही काळापासून काठेमळा, लालतारा वसाहत व म्हाळुंगी लगतच्या रिंगरोडच्या भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला आहे. त्यातून अशा प्रकारच्या दहशतीच्या घटना घडत असून रोजच्या असल्या प्रकारांना या भागातील रहिवासी कंटाळले आहेत. आपले कारनामे कोणीही उघड करु नये यासाठी या गुन्हेगारांकडून परिसरात मोठी दहशतही निर्माण करण्यात आली असून त्यांच्या विरोधात बोलण्यास सामान्य माणूस धजावत नसल्याचेही दिसून येत आहे. बुधवारी लालतारा वसाहतीत घडलेला प्रकारही असेच काही सांगणारा असून या टोळक्याने गेल्या अनेक दिवसांपासून या भागात अक्षरशः उच्छाद घातला होता. त्याची परिणीती बुधवारी थेट संपूर्ण वसाहतीवरच हल्ला करण्यात झाली व त्यातून या गुंडांवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.


मागील काही महिन्यात अकोले नाका, काठेमळा, लालतारा सोसायटीच्या परिसरासह म्हाळुंगीनदी लगतच्या भागात गुंडांच्या अशाच प्रकारच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्यांच्याकडून विविध गुन्हेगारी प्रकारही सुरु असून यापूर्वी वाटमारी करण्याचाही प्रकार समोर आला होता. आतातर थेट आपले दुष्कृत्य कोणी उघड करु नये यासाठी अख्ख्या वसाहतीवरच दगड-गोंट्यांसह हल्ला आणि महिलांचा विनयभंग करण्याचा प्रकार या गुन्हेगारांना कोणाचे भय आहे की नाही अशी शंका निर्माण करणारा ठरला आहे. याभागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासासाठी पोलिसांनी अशा टोळ्या उध्वस्त करण्याची गरज आहे. पकडलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याचीही दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *