भाजप विखेंच्या गैरव्यवहारांना का पाठिशी घालते? ः जाधव राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचे विखे कुटुंबियांवर अनेक आरोप

नायक वृत्तसेवा, नगर
भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून त्यांना उत्तर देण्यात आले. आता शिवसेनेनेही विखेंना लक्ष्य करत विखे कुटुंबियांवर अनेक आरोप केले आहेत. विखे यांच्या आर्थिक गैरव्यवहारांना भाजप का पाठिशी घालते? महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावणार्‍या भाजपला विखेंचे हे घोटाळे दिसत नाहीत का?, असा आरोप करून काही प्रकरणांचे संदर्भही देण्यात आले आहेत.

शिवसेनेचे नगर जिल्हा उपप्रमुख गिरीष जाधव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर हे आरोप केले आहेत. यूकेतील एका उद्योजकाचे विखे कुटुंबियांशी घनिष्ट संबंध असून तेथे कंपन्या बंद केल्यानंतर हा उद्योजक नगरला येऊन विखे यांच्या अनेक कंपन्या व व्यवसाय सांभाळत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. या दिवाळखोर उद्योजकाची विखे यांच्या मुली व जावयासोबत विविध कंपन्यांत भागीदारी आहे. तिकडे अडचणीत आल्यानंतर इकडे येऊन प्रवरानगरच्या साखर कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक असल्याच्या थाटात वावरत आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सामान्य गोरगरीब शेतकरी वर्गाला सोबत घेऊन त्यांच्या आर्थिक उद्धारासाठी या आशिया खंडातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. पण आता विखे यांनी हा मूळ उद्देशच धुळीला मिळवत एक इंग्रज अधिकारी या कारखान्यावर आणून बसविला आहे. तो या कारखान्याच्या दैनंदिन व्यवहारावर लक्ष ठेवत कामगारांचे व्यवस्थापन पाहत आहे, असा आरोपही जाधव यांनी केला आहे.

विखे यांच्याशी संबंधित प्रवरा वीज सोसायटी, नाशिकची पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील बँक तसेच विखे यांच्या ताब्यातील सर्व कारखाने प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले असताना विखे यांच्याशी संबंधित संस्थांमधील आर्थिक अनियमितता भाजप का दुर्लक्षित का करीत आहे? असा सवाल जाधव यांनी केला आहे. विखे यांच्या प्रवरा शिक्षण संस्थेत गैरकारभार सुरू आहे. तसेच डॉ. झाकीर नाईक या दहशतवादाचे समर्थन करणार्‍या आणि देशात बंदी असलेल्या संस्थेमार्फत प्रवराने जे डोनेशन घेतले आहे. याबाबत त्यांचेच ज्शेष्ठ बंधू डॉ. अशोक विखे हे सर्व सरकारी कार्यालयात अर्ज विनंत्या करून थकले तरी भाजपला हा विखे यांचा कारभार कसा चालतो? असा खरा प्रश्न आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *