अकोल्याच्या बालाजी वाईन्समध्ये बनावट दारुचा कारखाना! पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई; चौघे परप्रांतीय ताब्यात..

नायक वृत्तसेवा, अकोले
बेकायदा गावठी दारु व ताडीच्या भट्ट्या अहमदनगर जिल्ह्याला नव्या नाहीत. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आडरानात सुरु असलेले अशा प्रकारचे उद्योग वेळोवेळी झालेल्या कारवायातून समोर येत असतात. आज पहाटे मात्र मद्य शौकिनांचीही झिंग उतरवेल असा प्रकार विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व अकोले पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून समोर आला आहे. या पथकांनी आज पहाटे केलेल्या कारवाईतून मद्यविक्रीचे अधिकृत केंद्र असलेल्या अकोल्यातील बालाजी वाईन्स या दुकानातच नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर करुन बनावट विदेशी मद्याची निर्मिती केली जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चौघा परप्रांतीय आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 10 हजार 500 रुपयांचे बनावट दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात सदरच्या दारुविक्री दुकानाचा परवानाही निलंबित केला जाण्याची शक्यता आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यात किती ठिकाणी अशाप्रकारे बनावट दारुची विक्री होत असेल याच्या चर्चा रंगल्या आहेत.

याबाबत अकोले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक विभागाचे विशेष महानिरीक्षक बी. जी. शेखर यांना याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या विशेष पथकाला संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागासह अकोले पोलिसांच्या मदतीने छापा घालून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज (ता.30) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास या संयुक्त पथकाने अकोले शहराच्या हमरस्त्यावरील खटपटनाका चौकात असलेल्या ‘बालाजी वाईन्स’ या अधिकृत मद्यविक्री दुकानावर छापा घातला. यावेळी दुकानात चौघे परप्रांतीय नामांकित कंपनीच्या रिकाम्या मद्य बाटल्यांमध्ये मिश्रण केलेले मद्य भरीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

संयुक्त पथकाने या दुकानाच्या अंतरंगात प्रवेश करुन पाहणी केली असता वेगवेगळ्या कंपनीच्या रिकाम्या व भरलेल्या बाटल्यांचा खच, त्याला सिलबंद करण्यासाठी आवश्यक असलेल्या बुचासह अन्य सामग्री व मिश्रणातून तयार केलेले मुबलक प्रमाणातील मद्य पोलिसांच्या हाती लागले. यावेळी पथकाने बालाजी वाईन्स या दुकानातून 146 मद्याच्या रिकाम्या बाटल्या, बाटल्या हुबेहुब सिल करण्यासाठी आवश्यक असलेले 265 पत्र्याचे बुच, 14 ऑफीसर चॉईस मद्याच्या भरलेल्या मद्याच्या बाटल्या, ऑफिसर चॉईस ब्लू, रॉयल स्टॅग व मॅकडॉल्ड कंपनीची हुबेहुब बाटल्यांची बुचे, एक लिटर देशी दारु असलेल्या बारा बाटल्या. चिकटविण्याचा टेप, नरसाळे, गाळणी अशा अन्य साहित्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सविस्तर पंचनामा करुन ते ताब्यात घेतले.

अकोले शहरातील खटपट नाका चौकात असलेल्या बालाजी वाईन्समध्ये अशा प्रकारे नामांकित कंपन्यांचे बनावट मद्य तयार करुन ग्राहकांची फसवणूक करणार्‍या या दुकानाचा व्यवस्थापक महेश लिंगय्या हिरेचगिरी, सदरचा बनावट माल तयार करणारा साईकिरण बल्यागडम व प्रशांत गौड मुंजा आणि शंकर अंजगैर वन्हेला (सर्व रा.तेलंगणा, ह.मु.अकोले) हे दोन कामगार अशा एकूण चार जणांना पहाटेच ताब्यात घेण्यात आले. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आज सकाळी त्या चौघांनाही संगमनेरच्या उत्पादन शुल्क अधिकार्‍यांच्या हवाली करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आज सकाळपासूनच या दुकानाची झाडाझडती सुरु करण्यात आली असून स्वतंत्र गुन्हाही दाखल केला जाणार आहे. या वृत्ताने अकोल्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून अशाप्रकारे तयार केलेला माल जिल्ह्यात कोठे कोठे मिळतो याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

जास्त पैसा कमवण्याच्या हव्यासापोटी अनेकदा दुकानदारच मालात भेसळ करीत असतो, तसाच हा प्रकार आहे. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले आरोपी या दुकानाचे मूळमालक नाहीत, ते केवळ पगारी पद्धतीने सदरचे दुकान चालवित होते. अकोल्यातील एकमेव किरकोळ मद्य विक्रीचे दुकान असल्याने या दुकानात नेहमीच मद्यशौकीनांची मोठी गर्दी असते. त्यातूनच पगारापेक्षा अधिक मलिदा मिळवण्याच्या लालसेपोटी व्यवस्थापकासह उर्वरीत तिघांनी हा उद्योग सुरु केला होता. त्यासाठी सामान्यांमध्ये अधिक चालणार्‍या व ग्रामीणभागात अधिक खप असलेल्या ऑफिसर चॉईस या कंपनीच्या नावाचा वापर करण्यात आला. दुकानात सापडलेली बारा लिटर देशी दारु भेसळीसाठीच वापरली जात असल्याचाही संशय असून उत्पादन शुल्क विभाग त्यादृष्टीनेही तपास करीत आहे.


सदरचा प्रकार बेकायदा ठिकाणी घडला नसून शासनाकडून मद्यविक्रीचा अधिकृत परवाना प्राप्त झालेल्या बालाजी वाईन्स या दुकानातून समोर आला आहे. त्यामुळे सदरचा परवाना जारी करताना जिल्हाधिकार्‍यांनी घातलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघनही या कृत्यातून झाले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दाखल होणार्‍या तक्रारीनंतर त्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविला जाणार असून त्यातून दंडात्मक, सील अथवा परवाना निलंबित करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.
– मिथून घुगे
सहाय्यक पोलीस निरीक्षक – अकोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *