आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍याच्या मुलाचा अपघातात मृत्यू नगर शहरातील पत्रकार चौकात ट्रकखाली दुचाकी चिरडून दोघे ठार

नायक वृत्तसेवा, नगर
करोनानंतर ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून सप्टेंबर महिन्यात संगमनेर बसस्थानकात आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍याच्या मुलाचा मंगळवारी (ता.29) अपघाती मृत्यू झाला. नगर शहरातील पत्रकार चौकात एका ट्रकखाली दुचाकी चिरडून दोन युवक जागीच ठार झाले. त्यातील उद्धव सुभाष तेलोरे (वय 19) हा त्या एसटी कर्मचार्‍याचा मुलगा आहे. तर त्याच्यासोबत प्रवास करणारा बाळकृष्ण श्रीकांत तेलोरे (वय 22) हाही ठार झाला आहे. त्याच्या वडिलांचाही पूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. हे दोघेही पाथर्डी तालुक्यातील महाविद्यालयात शिकत होते.

मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. हे दोघे युवक दुचाकीहून नगर-मनमाड रोडने सावेडीकडून पाथर्डी रस्त्याकडे निघाले होते. पत्रकार चौकातून जात असताना अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. नगर शहरातून दिवसा अवजड वाहतुकीला बंदी असते. तरीही हे वाहन भरधाव वेगाने जात होते. शहीद भगतसिंग उद्यानाजवळून जात असताना तेलोरे यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. त्यांची दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडली गेली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या चौकातच वाहतूक पोलिसांचे मुख्य कार्यालय आहे. दुपारची वेळ असल्याने चौकात पोलीस नव्हते. शिवाय या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याचे आढळून आले.

अपघातातील मृत युवकांबद्दल माहिती मिळाल्यावर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. हे दोघेही पाथर्डी तालुक्यातील कोल्हार कोलूबाईचे गावचे आहेत. यातील उद्धव याचे वडील सुभाष शिवलिंग तेलोरे एसटी महामंडळाच चालक होते. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी संगमनेर बसस्थानकात एसटी बसमध्येच गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. एसटीचा तुटपुंजा पगार, करोनानंतर ढासळलेली आर्थिक स्थिती याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. अहमदनगर जिल्ह्यातील एसटी कर्मचार्‍याची ती पहिली आत्महत्या ठरली होती. त्यानंतर राज्यात आणखी काही ठिकाणी आत्महत्या झाल्या. पुढे एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू झाला आणि अद्याप तो सुरू आहे. याच तेलोरे यांचा मुलगा अपघातात ठार झाल्याने तेलोरे कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्यासोबत असलेल्या बाळकृष्ण याच्या वडिलांचेही पूर्वीच एका अपघातात निधन झाल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *