संगमनेर लवकरच महाराष्ट्राची योग राजधानी होणार ः पाडळकर देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त पंच्याहत्तर कोटी सूर्यनमस्कार संकल्पपूर्ती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी 75 कोटी सूर्यनमस्कार महाअभियानात संगमनेरमधून विक्रमी संख्येने झालेला सहभाग बघता आगामी काळात संगमनेर ही महाराष्ट्राची योग राजधानी होईल असे मत महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष व पतंजली योग समितीचे महाराष्ट्र प्रभारी भालचंद्र पाडळकर यांनी येथे व्यक्त केले.

मालपाणी लॉन्स येथे आज 75 कोटी सूर्यनमस्कार अभियानाचा संकल्पपूर्ती समारोह आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्री.पाडळकर यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी मंचावर राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, संगमनेर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी के.के.पवार, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य मिलिंद कानवडे, विस्तार अधिकारी श्रीमती फटांगरे, गीता परिवाराच्या संगमनेर शाखेचे अध्यक्ष कुंदन जेधे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पाडळकर म्हणाले की, डॉ.संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये योगासन प्रचार आणि प्रसार कार्य खूप जोमाने होत आहे. राष्ट्रव्यापी 75 कोटी सूर्यनमस्कार महाअभियान सफल होणे ही गोष्टच मुळात खूप मोठी आहे. त्यातही विक्रमी सहभागाने थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद ही गोष्ट थक्क करणारी आहे. डॉ. मालपाणी यांनी घेतलेला ध्यास आणि येथील सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक आणि गीता परिवाराचे समर्पित कार्यकर्ते या सर्वांपुढे नतमस्तक व्हावे इतकी ही कामगिरी अनमोल आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मालपाणी यांनी केले. अनिल नागणे व के.के.पवार यांनीही आपल्या भाषणात उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे अभिनंदन करून या घटनेने संगमनेरचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार हम करे.. या गीताच्या तालावर कठीण योगासनांची मालिका गुंफलेले विलक्षण चित्तथरारक नृत्य सादर करून सर्वांची वाहवा मिळविली.

या अभियानात सहभागी झालेल्या संगमनेर तालुक्यातील 21 विद्यालयांच्या मुख्याध्यापकांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. अभियानांच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे गीता परिवाराचे कार्यकर्ते दत्ता भांदुर्गे, गिरिश डागा, निलेश पठाडे, सोमनाथ बोर्‍हाडे, योग प्रशिक्षक मंगेश खोपकर, स्वप्निल जाधव व उपस्थित शाळांच्या मुख्याध्यापकांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या सामूहिक शिस्तबद्ध सूर्यनमस्काराने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पलोड व दत्ता भांदुर्गे यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद कानवडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *