ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘शिवभोजन’चा आधार! पालिकेच्या अभ्यासिकेत मोफत अध्ययन आणि दहा रुपयांत भोजनाने विद्यार्थी होतात तृप्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेनेने राज्यभरातील गरीब आणि गरजू नागरीकांसाठी अवघ्या दहा रुपयांत जेवण ही योजना राबविली. शिवभोजन या नावाने ओळखल्या जाणार्‍या सेनेच्या या महत्त्वकांक्षी थाळीने कोविडच्या काळात सर्वसामान्यांना मोठा आधार दिला होता. आता हाच आधार स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या तालुक्याच्या ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना मिळत आहे. पालिकेने शहरात दोन ठिकाणी सुरु केलेल्या मोफत अभ्यासिकेत अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांना माळीवाड्यातील शिवभोजन केंद्र मोठा आधार ठरले आहे. अभ्यासिकेपासून अगदी जवळच अवघ्या दहा रुपयांत जेवण मिळत असल्याने विद्यार्थीही तृप्त होवून अभ्यासाला अधिक वेळ देत आहेत.

डोंगराळ तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या संगमनेर तालुक्याच्या ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी संगमनेर नगरपरिषदेने दोन ठिकाणी अभ्यासिका सुरु केल्या आहेत. त्यातील एक पालिकेच्या प्रांगणातील जून्या वाचनालयात तर दुसरी स्वातंत्र्य चौकातील मंगल कार्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावर आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून जवळपास शंभर विद्यार्थी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करतात. पालिकेच्या प्रांगणातील अभ्यासिकेत एकूण चाळीस विद्यार्थी आहेत. त्यात पंधरा मुली आहेत. तर मंगल कार्यालयातील अभ्यासिकेत 55 विद्यार्थी सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत व परीक्षांच्या काळात रात्री 10 पर्यंत या अभ्यासिकांचा लाभ घेत आहेत.

तालुक्याच्या विविध भागातून पहाटे सहा वाजताच घराबाहेर पडून संगमनेर गाठणार्‍या आणि आठ वाजता अभ्यासिका उघडताच अध्ययनास सुरुवात करणारे हे बहुतेक विद्यार्थी अल्पभूधारक, शेतमजूर अथवा चाकरीतील नागरीकांची मुले आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी एकाग्र होवून अभ्यासाची गरज असल्याने या मुलांना घरात पोषक वातावरण नसते. त्यात लाईटसह सर्वच सुविधांचा अभाव असल्याने पालिकेने सुरु केलेला अभ्यासिकांचा प्रयोग या विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचा ठरला आहे. नाना अनाप हे पालिकेचे कर्मचारी या दोन्ही ठिकाणच्या व्यवस्थापनाचे काम अगदी मनापासून करतात.

भल्या सकाळीच उपाशीपोटी अभ्यासाला धावणारी ही मुलं माध्यान्हाला भूकेली होतात. अशावेळी स्थानिक शिवसेनेच्या वतीने माळीवाड्यात सुरु असलेले शिवभोजन केंद्र या विद्यार्थ्यांना मोठा आधार ठरत आहे. खरेतर ही योजना सुरु करताना राज्य शासनाने राज्यातील कोणतीही गरीब व्यक्ति उपाशी राहणार नाही हा हेतू ठेवला होता. त्यात हातावर काम करणारा आणि सकाळीच घराबाहेर पडणारा वर्ग गृहीत धरण्यात आला होता. मात्र संगमनेर सारख्या ग्रामीण शहरात ही योजना या वर्गासोबतच विद्यार्थ्यांनाही लाभदायी ठरली आहे.

या दोन्ही अभ्यासिकांमधील बहुतेक विद्यार्थी याच केंद्रावर दररोज दहा रुपयांत जेवण घेतात. लॉकडाऊनच्या काळात या अभ्यासिका बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्या कालावधीत या केंद्रावरुन जवळपास आठ महिने दररोज दोनशे ते अडीचशे जणांना थाळीची पूर्ण पाकीटे वितरीत करण्यात आली. गेल्या नोव्हेंबरपासून शिवभोजन पुन्हा सशुल्क करण्यात आले. त्यासोबतच अभ्यासिकाही सुरु झाल्याने विद्यार्थी सकाळी लवकर येवून अभ्यासाला अधिक वेळ देत आहेत. त्यासोबतच शहरातील अन्य हातावरील व्यक्ति अथवा भिक्षेकर्‍यांना मिळून 50 ते 60 जणांना या केंद्रावरुन दररोज अवध्या 10 रुपयांत जेवण देण्यात येते. यात ग्रामीण भागातून पोलीस अथवा न्यायालयीन कामासाठी येणार्‍यांचाही समावेश असतो. या केंद्राला दररोज दीडशे थाळ्यांची मंजुरी आहे, मात्र त्यापेक्षा अधिक थाळ्यांचे येथून रोज वितरण होते.


संगमनेर नगरपरिषदेने सुरु केलेल्या अभ्यासिका आणि शिवसेनेची शिवभोजन थाळी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. पालिकेच्या दोन्ही अभ्यासिका मिळून एकूण सुमारे शंभर विद्यार्थी अध्ययन करतात, त्यातील बहुतेक विद्यार्थी दररोज शिवभोजन थाळीचा अवघ्या दहा रुपयांत लाभ घेतात. मोफत अभ्यासिका आणि अल्पदरात भोजन या दोन्ही गोष्टी जवळच असल्याने या विद्यार्थ्यांना अभ्यासालाही अधिक वेळ मिळत आहे. त्यामुळे पालिकेची अभ्यासिका आणि शिवसेनेचे भोजन या विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायद्याचे ठरत आहे. यातून घडलेले अनेक विद्यार्थी उद्याची देशाची, राज्याची व्यवस्थाही पाहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *