बलात्कार करुन तोंड लपविणार्‍याला तीन वर्षांनी अटक! संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांचा करिष्मा; शहर पोलिसांची प्रतिमा उजळली

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाची एकसारखी झड लावली असून गेल्या काही कालावधीतच त्यांनी डझनाहून अधिक गुन्ह्यांची उकल केली आहे. या श्रृंखलेत शुक्रवारी (ता.25) आणखी एका कारनाम्याची भर पडली असून तब्बल तीन वर्षांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणारा व त्यानंतर आजवर शहर पोलिसांच्या तोंडी पसार असलेल्या मूळच्या जोर्वे येथील आरोपीला पुणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या या एकामागून एक करिष्म्याने संगमनेर शहर पोलिसांची प्रतिमा आपसूक उजळली आहे.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सन 2019 मध्ये संगमनेर तालुक्यातील रायते येथे नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यासाठी एक तरुणी आली होती. याच लग्न सोहळ्यासाठी आलेल्या दिनेश बाळासाहेब बर्डे (वय 22, रा.जोर्वे, ता.संगमनेर) याने त्या तरुणीशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखवले व तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून सदरची तरुणी गरोदर राहीली. याबाबतची माहिती मिळताच त्याने आपला मोबाईल क्रमांक बंद करुन गावातून आजवर धूम ठोकली होती.

संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या विभागातील प्रलंबित गुन्हे व दीर्घकालावधीपासून पसार आरोपींचा शोध घेण्याचा धडाका लावला आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी कोणतेही पुरावे हाती नसताना पाच खुनाच्या गुन्ह्यांची उकल करण्यासह गेल्या मोठ्या कालावधीपासून संगमनेर तालुक्यातील महिलांच्या मनात भीती निर्माण करणार्‍या सोनसाखळी चोरट्यांची टोळीही उघड केली. याशिवाय दोनच दिवसांपूर्वी त्यांनी चंदनापुरीतील अनिल रहाणे या होतकरु तरुणाच्या दुकानात झालेल्या चोरीचा अवघ्या पाच तासांत तपास करुन संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्याची किमया साधली होती.

आपल्या धडाकेबाज कारवाईची श्रृंखला अव्याहत ठेवताना त्यांनी शुक्रवारी गेल्या तीन वर्षांपासून पसार असलेल्या रायते येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीचा यशस्वी माग काढला. सदरचा आरोपी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या पिंपळवंडी येथे आपल्या पत्नी व मुलांसह रहात असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या पथकाला त्याच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर (संगमनेर तालुका), फुरकान शेख (श्रीरामपूर), पोलीस शिपाई अमृत आढाव व सुभाष बोडखे (दोघेही संगमनेर शहर), प्रमोद गाडेकर (घारगाव) व गणेश शिंदे (अकोले) यांनी पिंपळवंडीत छापा घालीत दिनेश बाळासाहेब बर्डे याच्या मुसक्या आवळीत त्याला संगमनेरात आणले आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या कारवाईने संगमनेर शहर पोलिसांची प्रतिमा उंचावली असून पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व त्यांच्या पथकाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *