111 आटा चक्कीचे वितरण प्रकल्प देवत्वाची प्रचिती देणारा ः थोरात करोनात निराधार झालेल्या महिलांना रोटरीसह बूब परिवाराचा मदतीचा हात!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्‍या रोटरी क्लब ऑफ संगमनेर व त्यांच्या कार्याला नेहमी पाठबळ देणार्‍या श्री व श्रीमती रामानारायणजी बूब मेमोरिअल ट्रस्टमार्फत घरातील कर्ता पुरुष गमाविलेल्या 111 महिलांना मोफत आटा चक्कीचे वाटप रविवारी (ता.20) मालपाणी लॉन्स संगमनेर येथे करण्यात आले. यावेळी रोटरी व बूब परिवाराचा 111 आटा चक्कीचे वितरण प्रकल्प हा देवत्वाची प्रचिती देणारा आहे, असे भावपूर्ण उद्गार प्रमुख अतिथी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रीक्ट 3132 चे प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे, ट्रस्टचे विश्वस्त कृष्णकुमार बूब, आमदार डॉ. सुधीर तांबे, रोटरी डिस्ट्रीक्ट 3132 चे उपप्रांतपाल दिलीप मालपाणी, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे राजेश मालपाणी, तहसीलदार अमोल निकम, संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश गाडे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, सेक्रेटरी हृषीकेश मोंढे, प्रकल्पप्रमुख मधुसूदन करवा आदी मान्यवर उपस्थित होते.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कृष्णकुमार बूब परिवाराचे तसेच निराधार कुटुंबांना रोटरी क्लबने आधार दिल्याबद्दल आभार मानले. रोटरी क्लब तसेच आय केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून संगमनेरमध्ये मोठे काम उभे राहत आहे त्यांना मनाने श्रीमंत असलेला बूब परिवार मदत करत आहे याचा अभिमान वाटतो असेही त्यांनी नमूद केले. तसेच डिस्ट्रीक्ट गव्हर्नर ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले. आमदार डॉक्टर तांबे यांनी रोटरी आय केअर हॉस्पिटल व रोटरी क्लब यांच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेऊन पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तर नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी उपस्थित महिलांना रोटरी क्लबने केलेल्या मदतीचे महत्व समजावून सांगत याद्वारे मोठा व्यवसाय कसा उभा केला जाऊ शकतो याची माहिती दिली.

उद्योजक राजेश मालपाणी यांनी रोटरीने याआधी वितरित केलेल्या 65 शिलाई मिशन प्रकल्पाचा आपल्या भाषणात मागोवा घेतला. आटा चक्की व शिलाई मशीन प्रकल्पांद्वारे रोटरी या कुटुंबांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन निर्माण करुन देत आहे, हे समाजासाठी खूप मोठे काम आहे. कृष्णकुमार बूब हे व परिवार या रथाचे सारथी आहेत तर रोटरी क्लब अर्जुन आहे असे गौरोद्गार त्यांनी काढले. ट्रस्टचे विश्वस्त कृष्णकुमार बूब यांनी मनोगत व्यक्त करताना, 1992 साली स्थापन झालेल्या ट्रस्टबद्दल माहिती सांगितली. तसेच ट्रस्टमार्फत शिक्षण, जलसंधारण, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे यांनी हे मशीन अतिशय कमी दरात उपलब्ध करुन दिल्याबद्दल गडाख मशिनरी संगमनेर व चंडक मशिनरी ट्रेडर्स यांचे आभार मानले. तसेच माझ्याकडे असलेल्या 93 क्लबमधून संगमनेर क्लबचे काम सर्वात चांगले असल्याचे कौतुक केले.

यावेळी देण्यात आलेल्या सर्व मशीन या लाभार्थींना घरपोहोच केल्या जाणार असून त्यांना त्याठिकाणी वीजजोडणीसाठी आवश्यक ती सर्व साधनसामुग्री मोफत देण्यात येणार आहे. तसेच मशीन कशी चालवावी याचे प्रात्यक्षिकही घरी दिले जाईल, अशी माहिती प्रकल्प समन्वयक विवेक नावंदर व आनंद हासे यांनी दिली. सूत्रसंचालन सुनील कडलग, समीर शाह यांनी केले तर आभार पवनकुमार वर्मा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप कोकणे, दीपक मणियार, अजित काकडे, संजय राठी, खजिनदार मयूर मेहता, सुनील घुले, मोहित मंडलिक, अण्णासाहेब शेलकर, संजय कर्पे, योगेश बारड, संकेत काजळे, ओम इंदाणी व इतर सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *