अकोले – शहापूर मार्गामुळे तालुक्याचे नंदनवन होणार ः डॉ. लहामटे रस्त्याच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ; अकोले – मुंबई अंतर येणार अवघ्या तीन तासांत

नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोले – शहापूर या जिल्हा मार्गामुळे आदिवासी बांधवांच्या जीवनाला कलाटणी मिळणार आहे. या मार्गामुळे अकोले तालुक्याचे नंदनवन होणार असल्याचे गौरवोद्गार तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी या मार्गाच्या सर्वेक्षण कनेक्टिव्हिटी शुभारंभ प्रसंगी काढले. या रस्त्यामुळे मुंबई ते अकोले हा प्रवास अवघ्या 3 तासांचा होणार आहे.

अकोले तालुक्यातील घाटनदेवीच्या कोकणकड्यावर अकोले – शहापूर या रस्त्याच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, दशरथ सावंत, अगस्ति सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, यमाजी लहामटे, प्रकाश मालुंजकर, बाळासाहेब ताजणे, सागर नेहे, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, डी. डी. पडवळे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता शिंदे, घाटघरचे सरपंच लक्ष्मण पोकळे, देविदास खडके, लक्ष्मण गांगड यांसह नागरिक उपस्थित होते.

घाटघर येथील देवीचा घाट-चोंडे हा घाट फोडला गेला तर अकोले – राजूर – शेंडी – घाटघर – चोंडे – शहापूर – मुंबई असा दळणवळणासाठी वाहतूक मार्ग तयार होणार आहे. हा मार्ग शोधण्याचे काम सागर नेहे या अकोल्याच्या भूमीपुत्राने केले आहे. या जिल्हा मार्गामुळे आदिवासी बांधवांच्या जीवनाला कलाटणी मिळणार असून दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागून अकोले तालुक्याचे नंदनवन होणार आहे. यामुळे अकोले ते मुंबई हे अंतर अवघ्या तीन तासांत पार होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केला. तर अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा ठाणे व अहमदनगर जिल्ह्यांना एकत्र करणारा हा रस्ता भंडारदर्‍याच्या पर्यटनात वाढ करण्यास महत्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असून साई पालखींनाही सोपा मार्ग उपलब्ध होणार असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी उद्गार काढले. तर दशरथ सावंत यांनीही या रस्त्यामुळे नक्कीच तालुक्याचा विकास होणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी सागर नेहे या युवकासह सर्वेक्षण कार्यक्रमासाठी जमलेल्या प्रमुख व्यक्तींचा घाटघर ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *