राजूर पोलीस ठाणे राज्यात ठरले सर्वोत्कृष्ट! विविध निकषांच्या आधारे राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधून निवड..

नायक वृत्तसेवा, अकोले
गुणात्मक पातळीवर परस्परांशी निकोप स्पर्धा व्हावी, त्यातून आपापल्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेसह गुन्हे प्रतिबंध, गुन्ह्यांचा तपास व दोषसिद्धीत सुधारणा व्हाव्यात यासाठी केंद्रीयस्तरावर सर्वोत्कृष्ट पोलीस दहा पोलीस ठाणी निवडण्यात येतात. या राष्ट्रीय स्पर्धच्या अनुषंगाने राज्यपातळीवर झालेल्या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलीस ठाण्याने पहिल्या पाचात बाजी मारली आहे. वाळुंज (औरंगाबाद), बाभुळगाव (यवतमाळ), सेवली (जालना) व जोडभावी (सोलापूर) या अन्य पोलीस ठाण्यांचा उर्वरीत चार पोलीस ठाण्यात समावेश आहे. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व विद्यमान स. पो. नि. नरेंद्र साबळे यांनी केलेल्या सुयोग्य नियोजनातून जिल्ह्याला हा बहुमान मिळाल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कौतुक केले आहे. सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

विविध निकषांच्या अनुसरुन पोलीस दलातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी केंद्रीय पातळीवरुन अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात देशभरातील पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्याच अनुषंगाने राज्याच्या गृहविभागाने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांसाठी अशाच प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करुन अधिकारी व अंमलदारांच्या कार्य गुणांकनात सुधारणा करणारी स्पर्धा आयोजित केली होती. यासाठी गुणांकन, निकष व नियमावली तयार करुन त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांचे मूल्यमापन करुन त्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीने जिल्ह्यातील दोन पोलीस ठाण्यांची निवड करुन त्यांचे प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाकडे व त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिक्षेत्रनिहाय समितीकडे पाठविण्यात आले. राज्यभरातून आलेल्या या सर्व प्रस्तावातून राज्यातील पाच सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली. क्रमानुसार त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज पोलीस ठाणे अव्वलस्थानी आहे. दुसर्‍यास्थानी यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव पोलीस ठाणे, तिसर्‍या क्रमांकावर जालना जिल्ह्यातील सेवली पोलीस ठाणे, चौथ्या क्रमांकावर सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे व पाचव्या स्थानी अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात असलेले राजूर पोलीस ठाणे जिल्ह्यातील सतत व्यस्त राहणार्‍या ठाण्यांपैकी एक आहे. जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांसह नाशिक व ठाणे जिल्ह्याला भिडणार्‍या सीमा आणि दूरवर पसरलेल्या जंगलीभागामूळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वावराचे भयही या भागात नेहमी असते. आदिवासी भागात शिक्षणाच्या अभावासह गुन्हेगारीचा स्तरही मोठा असल्याने अशा भागात काम करणे आव्हानात्मक असते. मात्र तत्कालीन सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील व विद्यमान प्रभारी नरेंद्र साबळे या दोन्ही अधिकार्‍यांनी या परिसरात आपली छाप निर्माण केली. अतिशय सचोटीने कायदा व सुव्यवस्था राबविण्यासह सहकारी अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये उत्साह निर्माण करुन परस्पर सहकार्याची भावना भरली. त्याचा परिणाम गुन्हेगारी नियंत्रणात येण्यासोबतच गुन्ह्यांच्या तपासालाही गती मिळाली. पोलीस ठाण्यातील सकारात्मक वातावरण कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढवणारे ठरल्याने जिद्दीने तपास झाले, त्यामुळे न्यायालयात दोष सिद्ध होवून गुन्हेगारांना शिक्षाही होवू लागल्या. यासर्व बाबी राजूरसारख्या आदिवासी भागातील पोलीस ठाण्याला राज्यातील पहिल्या पाच पोलीस ठाण्यांच्या पंक्तित घेवून गेल्या. राजूर पोलिसांनी मिळविलेल्या या यशाबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्वाती भोर, तत्काकालीन अप्पर अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी (संगमनेर) राहुल मदने यांनी राजूर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.


समर्पित वृत्तीने काम करताना सकारात्मकता आपोआप येते. राजूर पोलीस ठाण्यातील माझा अनुभवही असाच आहे. पाटील साहेबांनी सुरु केलेले गुणात्मक काम मला पुढे सुरु ठेवता आले. कर्मचार्‍यांची चांगली साथ मिळाली, त्यांच्या घरांच्या अडचणी सोडवित्या आल्या. पोलीस ठाण्याचा परिसर भयावह न वाटता प्रसन्न भासावा यासाठी इमारतीची डागडूजी व रंगकाम केले, परिसरातील स्वच्छतेवर सतत लक्ष ठेवले, यासोबत कायदा व व्यवस्था, गुन्हेगारी, तपास या गोष्टींही तितक्याच गांभिर्याने घेतल्या, नागरिकांशी सलोख्याचे संबंध निर्माण झाल्याने त्याचाही चांगला परिणाम अनुभवायला मिळाला. यासर्व घटकांचे या पुरस्कारामागे हात आहेत.
– नरेंद्र साबळे
सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *