चंदनापुरी शिवारातील जावळे वस्ती परिसरात एकाचा खून! श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण; वरीष्ठ अधिकार्‍यांची संगमनेरात धाव..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील घारगाव शिवारात घडलेल्या एटीएम फोडीची चर्चा सुरु असतांनाच आता तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितून धक्कादायक वृत्त हाती आले आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणातून चंदनापुरी शिवारातील जावळे वस्तीनजीक असलेल्या एका पंक्चर दुकान चालकाचा निर्घृण खून झाला आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. अब्दुल मोहम्मद युनुस कादीर असे मयत झालेल्या व्यक्तिचे नाव असून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक राहुल मदने व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी धाव घेतली.


याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील जावळे वस्तीनजीक मयत अब्दुल मोहम्मद युनुस कादीर यांचे पंक्चरचे दुकान आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्या परिसरात राहणार्‍या एका व्यक्तिला दुकानचालक आपल्या दुकानातच अस्ताव्यस्त पडल्याचे दिसल्याने त्याने थोडे पुढे जावून त्याला आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याचा संशय बळावल्याने त्याने याबाबत चंदनापुरीचे पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे यांना फोन करुन माहिती दिली.


त्यानंतर अवघ्या काही वेळातच पोलीस पाटील घटनास्थळी आले, त्यांनी सदर दुकानात जावून पाहणी केली असता पंक्चर दुकानदार कादीर हा मयत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी लागलीच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडूरंग पवार यांना याबाबत माहिती कळविली. काही वेळातच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्या दुकानात जावून पाहणी केली असता मयत कादीर याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूने रक्त येत असल्याचे व त्या लगतच रक्ताने माखलेली लोखंडी टामी व एक सुरा आढळून आला. सोबतच दुकानाच्या बाजूच्या पत्र्यावरही रक्ताचे डाग आढळल्याने प्रथमदर्शनी मयताचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.


घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी मयताचे शव उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. या बाबत मुख्यालयाला माहिती देण्यात आल्यानंतर श्रीरामपूर उपविभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेरचे उपअधीक्षक राहुल मदने, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी घारगावातील एटीएम फोडीच्या प्रकरणी श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञाचे पथकही संगमनेरात असल्याने त्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. यावेळी मयताची ओळख पटविली असता मयताचे नाव अब्दुल मोहम्मद युनुस कादीर (वय 27, रा.रहुआ, जि.वैशाली, बिहार) असे असल्याचे समोर आले. पोलीस तपासातून सदर व्यक्तिचा कोणीतरी अज्ञात इसमाने खून केल्याचेही स्पष्ट झाले.


यावरुन पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी घारगावातील स्टेट बँकेचे एटीएम फोडून तब्बल 19 लाख रुपयांची रोकड लांबविण्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडालेली असतांना आता त्यात खुनाचाही प्रकार समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *