फरार गुन्हेगार व गावठी कट्ट्यांसाठी ‘एलसीबी’ ऍक्शन मोडमध्ये! दीर्घकाळ फरार असलेले 68 आरोपी गजाआड; ऑपरेशन ‘ऑल आऊट’ची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी अहमदनगरची स्थानिक गुन्हे शाखा ऍक्शन मोडमध्ये आली आहे. त्या अनुषंगाने गेल्या आठ दिवसांत गुन्हे शाखेच्या पथकांनी जिल्हाभर छापासत्र राबवून न्यायालयाकडून फरार घोषीत झालेल्या आरोपींसह स्टँडींग वॉरंटमधील आरोपींची धरपकड मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत जिल्ह्यातील 68 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या, तर मंगळवारी दोन ठिकाणी छापे घालीत शाखेने कट्टा तस्करीलाही लगाम घालण्याचा प्रयत्न केला. या कारवायांमध्ये संगमनेर तालुक्यातील 13 आरोपींचा समावेश असून दरम्यानच्या काळात त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. जिल्ह्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्थेची घडी लक्षात घेवून गुन्हे शाखा ऍक्शन मोडमध्ये दिसत असली तरीही पोलिसांनी पुन्हा एकदा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील काही महिन्यांत जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच नद्यांचे काठ लाभलेल्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बेसुमार वाळूतस्करी सुरु झाल्याने त्यातून तस्करांच्या संघटीत टोळ्या निर्माण होवून त्यांच्यात एकमेकांवर वरचढ होण्याची स्पर्धा लागल्याने जिल्ह्यातील बेकायदा गावठी कट्ट्यांची संख्याही वाढली आहे. याशिवाय गांजा, दारु अशा अंमली पदार्थांसह चोर्‍या, दरोडे, घरफोड्या, सोनसाखळ्या लांबविण्याचे प्रकारही वाढीस लागल्याने एकंदरीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी काहीशी विस्कळीत झाल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच गेल्या चार-सहा दिवसांत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोरी आणि तालुका पोलीस ठाण्यातील ऑडिओ बॉम्बमुळे पोलीस दलातील वातावरणच गढूळ बनले आहे.

त्यावर मात करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आता कंबर कसली असून विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आलेल्या पंधरा जणांसह न्यायालयांनी वॉरंट बजावूनही हजर न झालेल्या स्टँडींग वॉरंटमधील 51 व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षा कायम केलेल्या एकाला मोठ्या शिताफीने अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना यश आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या धडाकेबाज कारवाई दरम्यानच मंगळवारी (ता.1) राहुरी फॅक्टरी (ता.राहुरी) व शेंडी (ता.नगर) येथे छापे घालीत गुन्हे शाखेने जिल्ह्यातील गावठी कट्टा तस्करीतील तिघांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून चार गावठी कट्ट्यांसह बारा जिवंत काडतुसेही हस्तगत केली आहेत. या कारवायांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात हडकंप निर्माण झाला आहे.


जिल्ह्यातील विविध न्यायालयांनी विविध प्रकरणात सहभागी असलेल्या जिल्ह्यातील 45 जणांना फरार घोषित केले होते. तसेच न्यायालयाचे वॉरंट प्राप्त होवूनही प्रत्यक्ष न्यायालयात हजर न झालेल्यांची व त्यामुळे त्यांच्यावर स्टँडींग वॉरंट बजावलेल्या आरोपींची संख्याही तब्बल 168 झाली होती. यातील बहुतेक आरोपी खून, दरोडे, घरफोड्या, जबरी चोर्‍या, मारहाण अशा प्रकरणातील असल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना आदेश बजावून यासर्व आरोपींचा शोध घेवून त्यांना गजाआड करण्यास फर्मावले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने गेल्या 18 जानेवारीपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे घालण्यास सुरुवात केली आणि त्यातून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कायद्याच्या बेड्यांपासून दूर असलेल्या 68 आरोपींचा शोध घेण्यात आला.

यात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात 2008 साली दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार अकिल्या पाप्या चव्हाण (रा.कोपरगाव) याला अटक करण्यात आली, तर याच गुन्ह्यात सहआरोपी असलेला त्याचा बाप पाप्या हिरामन चव्हाण मयत झाल्याचे समोर आले. याशिवाय घारगाव पोलीस ठाण्यात 2013 साली मारहाण प्रकरणात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी विजय तबाजी काळे यालाही गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे. यासोबतच जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दितील फरार असलेल्या बारा जणांचाही गुन्हे शाखेने शोध घेतला. त्यात सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2005 सालच्या गुन्ह्यात दिलीप बाबुराव शिंदे (रा.वांंबोरी), 2007 सालच्या खून प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब उर्फ अनिल ज्ञानदेव पवार, तोफखाना पोलीस ठाण्यात 2009 सालच्या चोरीच्या गुन्ह्यातील सुनील छबुराव लोणारे (रा.नेप्ती), शेवगाव पोलीस ठाण्यात 2012 साली दाखल गुन्ह्यातील आरोपी सोमनाथ ज्ञानदेव गायकवाड (रा.कामरगाव), जामखेड पोलीस ठाण्यात 2009 साली दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बाळू उर्फ अमोल सहदेव डोंगरे, कर्जत पोलीस ठाण्यात 2013 साली दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी भाऊसाहेब चंद्रकांत भोसले,

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 2016 साली दाखल फसवणूकीच्या प्रकरणातील आरोपी प्रदीप जगन्नाथ देवकर, पारनेर पोलीस ठाण्यात 2017 साली दाखल अपहरण प्रकरणातील आरोपी सागर अनंत साळवे (रा.दैठणे गुंजाळ), भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 2017 सालच्या चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी सागर अजित काळे (रा.भिंगार) व नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दित हुंड्यासाठी छळ केल्याच्या प्रकरणातील आरोपी अजिनाथ गणपत चौरे, 2019 मधील चोरीच्या प्रकरणातील आरोपी सुनील राजेंद्र पालवे (रा.मेहकरी) व चोरी आणि सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानदेव हरीभाऊ भगत (रा.कोल्हेवाडी) अशा एकूण 15 फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

यासोबतच गुन्हे शाखेच्या पथकांनी न्यायालयाने वॉरंट बजावल्यानंतरही न्यायालयासमोर हजर न झालेल्या व त्यांच्यावर स्टँडींग वॉरंट बजावण्यात आलेल्या 51 जणांचाही शोध घेतला. त्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील 21 वर्षांपासून हजर न झालेला आरोपी योगेश नारायणसिंग परदेशी (रा.साळीवाडा), 17 वर्षांपासून पसार असलेला आनंदा लक्ष्मण गुंजाळ (मयत, रा.रामनगर झोपडपट्टी), 15 वर्षांपासून पसार असलेला पोपट विठ्ठल कानवडे (मयत, रा.निमगाव पागा), 13 वर्षांपासून पसार असलेला हरकचंद त्रिलोकचंद ललवाणी (मयत, रा.राहाता) व वर्षभरापूर्वी दाखल गुन्ह्यातील आरोपी राजू महादेव काकडे (मयत, रा.शेळकेवाडी).

घारगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी सखाराम खुशाबा हांडे (रा.वनकुटे), नंदू सुखदेव जोर्वेकर (रा.साकूर), आश्वी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी भाऊसाहेब उर्फ भाऊराव रखमाजी कदम (रा.पानोडी), विशाल सुरेश रुपवते (रा.कोंची) व गोरख लहानू सूर्यवंशी (रा.मांची) यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय नेवासा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी रामनाथ लक्ष्मण पवार (रा.प्रवरासंगम), अण्णासाहेब उर्फ अनिल नामदेव पवार (रा.निंबोरी), बाळ्या उर्फ बयंक सुदमल काळे (गेवराई), नानासाहेब अभिमन्यू जाधव (रा.वळण) व रामसिंग त्रिंबक भोसले (रा.सलाबतपूर), शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणातील आरोपी विश्वनाथ बारकू जिरे (रा.सडे), शंकर स्वामी (रा.शिर्डी) व शेखर रमेश मानकर (रा.शिर्डी), सोनई पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणातील संभाजी जगन्नाथ धनवटे (रा.वाघवाडी), कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील जिंद सालाजीत चव्हाण (रा.वैजापूर),

राहुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील प्रशांत प्रकाश वराळे (रा.राहुरी बु.), सुनील छगनराव लोणारे (रा.नेप्ती), सखाराम भगवान माळी (रा.राहुरी), पंढरीनाथ सीताराम वाबळे (रा.राहुरी), दीपक नाना बर्डे (रा.राहुरी), रविंद्र बापू तेलोरे (रा.ब्राह्मणी), दीपक नाना बर्डे (रा.राहुरी), सुनील सुरेश बिवाल (रा.राहुरी), अक्षय नंदू दळवी (रा.राहुरी), कृष्णा बाबुराव फुगारे (रा.राहुरी), रहिमान इस्माईल शेख (रा.गुहा) व योगेश सावळेराम मांजरे (रा.मातापूर, ता. श्रीरामपूर), कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय गोपाळराव ढाळे (रा.गंजबाजार), एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणातील नवनाथ भाऊसाहेब पवार (रा.देहरे), बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील सिराज बशीर शेख (रा.बेलवंडी), राहाता पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणातील नम्रता हरकचंद ललवाणी, भूषण हरकचंद ललवाणी (दोन्ही रा.राहाता), अझगर निजामुद्दीन शेख, संदीप अंबादास वाळुंज (दोघे रा.वैजापूर), किशोर प्रेमराज पवार (रा.लिंंबगाव), अमित विजय सांगळे (रा.श्रीरामपूर), प्रशांत बाळासाहेब घनवटे (रा.रामपूर),

नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात सुनील छगनराव लोणारे (रा.नेप्ती), श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील जमीर हसन सय्यद (रा.मांडवगन), तोफखाना पोलीस ठाण्यातील प्रकरणात सय्यद सलीम दगडू (रा.सर्जेपुरा), पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात लक्ष्मण मुरलीधर पवार (रा.आडगाव), श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी गणेश रावसाहेब शेजूळ (रा.निमगाव खैरी) व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षा कायम केलेला मात्र फरार असलेला पारनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी सुरेश महादू दूधवडे (रा.वाडेगव्हाण) आदी गुन्हेगारांना गेल्या आठ दिवसांत छापे घालीत अटक करण्यात आली आहे.

याशिवाय मंगळवारी (ता.1) अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने राहुरी फॅक्टरीवरील विठामाधव चित्रपटगृहाजवळ सापळा लावून किशोर बाळासाहेब खामकर (वय 32, रा.राजुरी, ता.राहाता) व किशोर साईनाथ शिणगारे (वय 28, रा.नेवासा) या दोघांना अटक करीत त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, बारा जिवंत काडतुसे व एक मोपेड हस्तगत केली. तर दुसरी कारवाई अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास चौकात करण्यात आली. या कारवाईत कुख्यात आरोपी अभय अशोक काळे (वय 24, रा.शिरसगाव) याला अटक केली. तर विवेक लक्ष्मण शिंदे (रा.टाकळीभान) व सागर रोहिदास मोहिते (रा.शिरसगाव) हे दोघे मात्र पसार झाले.

गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील गुन्हेगार व त्यांच्याकडून होणार्‍या गुन्हेगारी घटनांसह गांजा, वाळू, गुटखा, बेकायदा दारुच्या अवैध तस्करीत मोठी वाढ झाली आहे. त्यातून तस्करांच्या टोळ्या निर्माण झाल्याने गावठी कट्टे बाळगण्याची नवी फॅशन समोर येवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्याची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेने केलेल्या या धडक कारवायांना महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र जिल्ह्यात वाढलेल्या बेकायदा कट्ट्यांची संख्या व नेवासा परिसरात पुन्हा उभे राहु पहात असलेले कट्ट्यांचे दलाल पाहता जिल्ह्यात पुन्हा एकदा ऑपरेशन ऑल आऊट राबवून जिल्ह्यातील गुन्हेगारीचे उच्चाटण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवून जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचण्याचा अभिनव प्रयोग राबविला होता. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेसह विविध ठिकाणच्या पोलीसांनी राबविलेल्या धडक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे, तलवारी, कोयते, चाकू यासारख्या प्राणघातक हत्यारांसह कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या हाती सापडले होते. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात तशीच अवस्था निर्माण झाली असून नागरिकांकडून ‘ऑपरेशन ऑल आऊट’च्या पुनरावृत्तीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *