साई मंदिरातील तिसर्‍या क्रमांकाचे प्रवेशद्वार झाले खुले संस्थानच्या निर्णयाचे साईभक्तांसह ग्रामस्थांकडून स्वागत

नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापन मंडळाने तिसर्‍या क्रमांकाचे प्रवेशद्वार भाविकांना हनुमान मंदिर व चावडीमध्ये दर्शनाकरिता जाण्यासाठी खुले करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे. व्यवस्थापन मंडळाच्या निर्णयानुसार रविवारी (ता.30) सायंकाळी 7 वाजता हे प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे. साईसंस्थानच्या या निर्णयाचे शिर्डी ग्रामस्थ व भाविकांनी स्वागत केले आहे.

गेल्या वर्षी करोनाच्या संकटामुळे 17 मार्च, 2020 रोजी श्रींचे समाधी मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर 14 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या शासन आदेशान्वये 16 नोव्हेंबर, 2020 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आले होते. त्यावेळेस शासनाच्या आदेशान्वये मंदिरामध्ये प्रवेशासाठी व बाहेर जाण्याची स्वतंत्र गेट असावे, मार्गदर्शक सूचना होत्या. त्यानुसार द्वारकामाई, श्री साईबाबांची समाधी, गुरुस्थान, ग्रामदैवत गणपती, शनिदेव, महादेव, लेंडीबागेतील श्री दत्त व नंदादीपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकाच रांगेतून व्यवस्था करण्यात आलेली होती.

दर्शन घेतल्यानंतर भाविकांना मंदिर परिसरातून बाहेर जाण्यासाठी 4 व 5 क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून व्यवस्था करण्यात आलेली होती. यापूर्वी करोना विषाणूच्या संकटामुळे दोनदा राज्य शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा श्री साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले तेव्हा साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांकडून द्वारकामाई मंदिराचे दक्षिण बाजूचे प्रवेशद्वार व हनुमान मंदिर, चावडीमध्ये जाण्यासाठी तिसर्‍या क्रमांकाचे प्रवेशद्वार खुले करावे, अशी मागणी वारंवार होत होती. त्यानुसार संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व विश्वस्त मंडळाने 26 डिसेंबर, 2021 रोजीच्या सभेत द्वारकामाईकरीता स्वतंत्र मंदिर समजून त्याची स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्याचा व हनुमान मंदिर तसेच चावडीमध्ये दर्शनाकरिता जाणेसाठी तिसर्‍या क्रमांकाचे प्रवेशद्वार खुले करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. त्यानुसार 20 जानेवारी रोजी द्वारकामाई मंदिराचे दक्षिण बाजूचे प्रवेशद्वार खुले करुन स्वतंत्र दर्शन रांग सुरु करण्यात आलेली आहे. तसेच रविवारी (ता.30) धुपारतीनंतर विश्वस्त मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत हे प्रवेशद्वार भाविकांना बाहेर जाण्यासाठी खुले करण्यात आले. याप्रसंगी विश्वस्त अनुराधा आदिक, डॉ. एकनाथ गोंदकर, महेंद्र शेळके, अ‍ॅड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, सुरेश वाबळे, जयवंत जाधव, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.

तिसर्‍या क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून भाविकांना फक्त बाहेर जाता येईल. या प्रवेशद्वारातून कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व भाविक व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी. तसेच या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा व साईभक्तांसह शिर्डी ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *